गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहोचवा – पालकमंत्री जयंत पाटील येत्या काळात जीवनातील महत्त्वाच्या निर्णयात आमूलाग्र बदल होऊन चांगल्या प्रकारची व्यवस्था दिसेल
सांगली. दि. 21 (जि. मा. का ) : गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्षार जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहोचवावीत. येत्या काळात जीवनातील महत्त्वाच्या निर्णयात आमूलाग्र बदल होऊन आणखी चांगल्या प्रकारची व्यवस्था दिसेल असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मिरज तालुक्यातील कर्नाळ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, महानगरपालिका विरोधीपक्ष नेता उत्तम साखळकर, सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच युवराज पाटील, नगरसेवक हरिदास पाटील, पंचायत समिती सदस्या छायाताई हत्तीकर, पृथ्वीराज पाटील, अविनाश पाटील, संजय बजाज, माजी नगरसेवक शेखर माने, राजू पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, क्षार जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी 20 टक्के लोकांनी व 80 टक्के रक्कम शासनाने घालून सछिद्र पाईपलाईनव्दारे जमिनी खालचे क्षार घालविण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी सर्व्हेक्षणाचे कामही करण्यात आले आहे. या माध्यमातून क्षार जमिनीचा प्रश्न सुटेल. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 141 शाळांमध्ये उत्तम भौतिक सुविधा देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक दर्जाही उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील टप्प्यात उर्वरित शाळांमध्येही हे काम हाती घेण्यात येईल. सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सर्व शिक्षकांच्या सहकार्याने उत्तमात उत्तम करणे व त्यांना भौतिक सुविधा चांगल्या पध्दतीने देण्याचे काम पुढील काळात करू. जिल्ह्यात सातबारा दुरूस्ती, शाळेत जाऊन जातीचे दाखले देण्याची मोहिम काही ठिकाणी राबविण्यात आली. पुढील काळात विद्यार्थ्याचे जात पडताळणीचे अर्ज शाळेतच भरून घेवून 12 वी चा निकाल येण्याअगोदरच जात पडताळणी करून विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात जातीचे दाखले देण्याची योजना ठरविलेली आहे. जातीचे दाखले मिळविण्यासाठी खूप अडचणींचा सामना गोरगरीबांना करावा लागतो. रेशनकार्ड वितरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. सामान्य माणसाला कोणतीही अडचण येवू नये यासाठी महसूल विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना काळात आपल्या जीवाभावाची माणसे गमावली आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे कसे जायचे याचा विचार करणे आवश्यक आहे. मागचे काही दिवस फार मोठ्या संकटात घालवले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, लॉकडाऊनमुळे फार मोठी संकटे घराघरात उभी राहतात. परंतु मोठ्या लोकसंख्येला वाचविणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शासनाने जारी केलेल्या निर्णयांची कठोर अंमलबजावणी करण्याबरोबरच गावात कोरोनाचे शुन्य रूग्ण राहतील यासाठी प्रयत्न करून सर्तकता बाळगावी. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करावे. एखादा रूग्ण आढळल्यास त्याला तात्काळ आयसोलेट करावे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांची मदत घेऊन घराघरात लोकांची तपासणी करून पॉझिटीव्ह रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवून उपचार केले तर तिसऱ्या लाटेला सक्षमपणे सामोरे जाऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात 60 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन अँम्बुलन्स देण्याची व्यवस्था केलेली आहे. लोकांच्या सेवेसाठी ही व्यवस्था सुस्थितीत असणे आवश्यक आहे.काही ठिकाणी कार्डिॲक ॲम्बुलन्स आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सरपंच संध्या कांबळे, राजू पाटील, पृथ्वीराज पाटील, शेखर माने यांनी मनोगत व्यक्त करून कर्नाळ गावाचा विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.
प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कर्नाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा, शहीद एकनाथ माने अर्धाकृती पुतळा, कै. शामराव कदम अर्धाकृती पुतळा आदि कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच एकता चौक रस्ता, मगदूम नगर रस्ता, कर्नाळ ते बिसूर रस्ता, जलशुध्दीकरण केंद्र दुरूस्ती, जिल्हा परिषद मराठी शाळा व अंगणवाडी रंगकाम व दुरूस्ती, वली हजरत अंबरसो दर्गा आदि कामांचा शुभारंभ व ए.टी.एम. चे उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविकात अमोल पाटील यांनी कर्नाळ येथील विविध विकास कामांबद्दल सविस्तर माहिती देवून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कर्नाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.