BREAKING NEWS:
नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

महाराष्ट्राने देशाला संविधान जागरूकतेबाबत दिशा दिली – माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

Summary

नवी दिल्ली, दि. ७ :  महाराष्ट्राने देशात संविधान जागरूकतेची सुरुवात करून दिशादर्शक कार्य केले आहे, असे मत माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी आज व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “स‍ंविधान आणि जागरूकता” विषयावर ५१वे पुष्प गुंफताना श्री . खोब्रागडे बोलत होते. ‘भारतीय […]

नवी दिल्ली, दि. ७ :  महाराष्ट्राने देशात संविधान जागरूकतेची सुरुवात करून दिशादर्शक कार्य केले आहे, असे मत माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत “स‍ंविधान आणि जागरूकता” विषयावर ५१वे पुष्प गुंफताना श्री . खोब्रागडे बोलत होते.

‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ अशा शब्दात भारतीय संविधान सभेने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. देशात संविधान लागू झाल्यानंतरही अनेकांना भारतीय संविधानाबद्दल फारशी माहिती नसल्याचे चित्र होते. अशात, संविधान म्हणजे काय? ही माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राने संविधान जागरूकतेची सुरुवात केली. राज्यात २००८ पासून २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा होवू लागला. हे कार्य फार मोठे असून या माध्यमातून देशाला दिशा देण्याचे  मोलाचे कार्य महाराष्ट्राने केले आहे,असे श्री. खोब्रागडे म्हणाले.

संविधानसभेने २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये  भारतीयांना  संविधान अर्पण केले. २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा होतो. पुढे २६ जानेवारी १९५० मध्ये हे संविधान देशात लागू झाले आणि  २६ जानेवारी  हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो.

२६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून राज्यभर साजरा व्हावा असा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महाराष्ट्र शासनाकडे देण्यात आला. पुढे २४ नोव्हेंबर २००८ रोजी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भात शासनादेश काढला व २००८ पासून २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून  राज्यभर साजरा होवू लागला, असे श्री खोब्रागडे यांनी सांगितले.

२००६-०७ मध्ये महाराष्ट्रात शालेय पुस्तकांमध्ये भारतीय संविधानाची प्रास्ताविका प्रकाशित करण्यात आली . हा उपक्रमही देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानेच राबविला आहे. ४ फेब्रुवारी २०१३ मध्ये राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आदेश निर्गमीत करून  राज्यातील सर्व शाळांमधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन,संविधान जागरूकतेविषयी विविध स्पर्धा घेण्याचे निर्देश दिले. शाळा महाविद्यालयांमध्ये संविधानाचे वाचन व्हावे व त्याची मूलभूत चर्चा व्हावी असा कार्यक्रम राज्याने राबविला. या उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला दिशाच दिली. पुढे २०१५ मध्ये केंद्र शासनानेही २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. देशातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिवस साजरा होतो.

देश घडविण्याचे व माणसं जोडण्याचे कार्य संविधान करते म्हणून त्याविषयी जागरूकता होण्याची गरज आहे. संविधान जागरूकता हे राष्ट्रनिर्माणाचे कार्य असून संविधान जागरूकतेचा पहिला प्रयोग २००५ मध्ये नागपूर जिल्हयातील शाळांमधून झाला. मुलांवर शालेय जीवनातच संविधान मुल्यांचे संस्कार व्हावेत या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना, त्यांनी नागपूर जिल्हयातील सर्व शाळांमधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून घेतल्याचे श्री खोब्रागडे यांनी सांगितले. शाळांच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका लिहीणे तसेच प्रार्थनेच्यावेळी संविधानाची प्रास्ताविका वाचून घेणे, संविधान दिवस साजरा करणे असा उपक्रम नागपूर जिल्हयातील शाळांमधून सुरु झाला.पुढे  वर्धा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना वर्धा जिल्हयातही  त्यांनी हा उपक्रम राबविला. सामाजिक न्याय विभागात आयुक्त असतांना २००८ मध्ये याच विभागाच्यावतीने निर्णय घेवून राज्यभर २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचे आयोजन केल्याचेही  त्यांनी नमूद केले.

संविधानाची प्रास्ताविका बोलकी असून त्यात संविधानाचे संपूर्ण सार आहे. यात संविधानाचे ध्येय व उदिष्टये नमूद आहेत. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधानसभेची पहिली बैठक झाली. १३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरु यांनी संविधानाचे ध्येय आणि उद्दिष्टे काय असतील याचा प्रस्ताव संविधानसभेत ठेवला. सदरील  प्रस्तावात थोडया दुरुस्त्या व चर्चा होवून संविधानाची प्रास्ताविका म्हणून यास मान्यता मिळाल्याचे श्री खोब्रागडे यांनी अधोरेखित केले.

स्वातंत्र्यानंतर संविधानिक मुल्यांच्या आधारावर सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही देश घडविण्यासाठी तसेच देशातील नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांना सामाजिक, आर्थिक  व राजकीय न्याय देण्याचा विचार प्रास्ताविकेत आहे. जात, भाषा, प्रदेश, लिंग असा कोणताही भेद न करता, न्याय, समता, स्वातंत्र व बंधुता हे मूलतत्व देशातील नागरिकांना देवून देश एकजूट व मजबूत करायचा आहे हे प्रास्ताविकेत नमूद आहे.

संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे व तो सर्वांसाठी आहे.  म्हणून त्याची जाणीव देशातील प्रत्येकाला असली पाहिजे. समता, स्वातंत्र, बंधुता, न्याय आणि व्यक्तीची प्रतिष्ठा हे संविधानाचे मूलभूत तत्व आहेत.  मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे तसेच संविधानाची अंमलबजावणी करणारे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय पालिका याचीही माहिती संविधानात सविस्तर दिली आहे. लोकांच्या मूलभूत गरजा भागविणे ,त्यांना मूलभूत सुविधा देणे व त्यांना  सर्वप्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास करणे यासाठी संविधान राबविले जाते.

देशातील प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण होण्यासाठी सर्वांनी मूलभूत कर्तव्याचे पालन करावे, त्यासाठी सर्वांना संविधानाची माहिती असणे आवश्यक आहे.  सर्वांनी संविधान वाचलेच पाहिजे, समजून घेतले पाहिजे आणि त्याचे अनुकरण केले पाहिजे ,असे आवाहन श्री खोब्रागडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *