हीरक महोत्सव व्याख्यानमालेद्वारे राज्याच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न – सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप
Summary
नवी दिल्ली ,१५ : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्याच्या विविध क्षेत्रांचा इतिहास जागवत, उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न महाराष्ट्र परिचय केंद्राकडून झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज काढले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित […]
नवी दिल्ली ,१५ : महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या माध्यमातून राज्याच्या विविध क्षेत्रांचा इतिहास जागवत, उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्याचा उत्तम प्रयत्न महाराष्ट्र परिचय केंद्राकडून झाल्याचे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज काढले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा समारोप आज डॉ. पांढरपट्टे यांच्या भाषणाने झाला. या व्याख्यानमालेचे अंतिम ६१वे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
यावर्षी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला ६१ वर्ष पूर्ण झाली तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रालाही ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन्ही घटनांचे औचित्य साधून दिल्लीतील महाराष्ट्राचे दूतावास असणाऱ्या महाराष्ट्र परिचय केंद्राने महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा अभिनव उपक्रम राबवून एकूण ६१ व्याख्याने आयोजित केली. राज्याचे समाजकारण, राजकारण, तर्कवाद अशा विविध विषयांना या व्याख्यानमालेच्या माध्यमातून उजाळा देण्याचे कार्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर, खासदार कुमार केतकर, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.शरण कुमार लिंबाळे, डॉ.विजया वाड, राजू परुळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साहित्य,संस्कृती,कला, शिक्षण, अशा विविध विषयांवर आपले विचार मांडले. या व्याख्यानमालेद्वारे राज्यातील विविध क्षेत्रांच्या इतिहासाला उजळा देऊन भविष्याचा वेध घेणारी महत्त्वपूर्ण मांडणी करण्यात आली व ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला संतांची मोठी पंरपरा आहे. संतांनी भक्ती मार्गासह राज्याच्या पुरोगामी वाटचालीचे बीज रोवले. परिणामी, संतांपासूनच महाराष्ट्राच्या प्रागतिक वाटचालीला सुरुवात झाली. महाराष्ट्राने निर्मितीपासूनच पुरोगामित्वाची कास धरली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला प्रागतिक,पुरोगामी व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोण दिला. हा वारसा आपण पुढे नेत आहोत. राज्य काही बाबतीत पुढारलेले असले तरी काही बाबतीत आपल्याला बराच पल्ला गाठायचा असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
सामाजिक अभिसरणाच्या चळवळीची दीर्घ पंरपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक अभिसरणातून महाराष्ट्रात झालेल्या विविध वैचारिक चळवळीचा सार मांडताना,
“ जगाची झोकुनी दु:खे ,स्वत:शी भांडतो आम्ही !
स्वत:च्या झाकुनी भेगा मनुष्य सांधतो आम्ही!!”
हा कवीश्रेष्ठ सुरेश भटांचा शेर त्यांनी उद्धृत केला. राज्याच्या सामाजिक अभिसरणात सहभागी मंडळींनी जगातील सर्व दु:खे आपल्याकडे घेतली व प्रसंगी प्राणाची आहूती दिली. या थोर मंडळींचा आत्मविश्वास व्यक्त करणारा, “कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला, तिथे नांदतो विठू जिथे झेंडा रोवतो आम्ही. ” हा शेरही त्यांनी यावेळी सादर केला.
राज्यात झालेल्या वैचारिक क्रांतीमुळेच या मातीतील लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. म्हणूनच राज्याने कोरोना महामारी,चक्रीवादळ, पूर परिस्थिती यांसारख्या संकटांना न डगमगता नेटाने सामना केला व परिस्थिती आटोक्यात आणली. संकटांचा सामना करण्याच्या महाराष्ट्रातील जनतेच्या धाडसाविषयी भावना व्यक्त करताना “शौक से आये बुरा वक्त अगर आता है, हमको हर हाल में जीनेका हुनर आता है.” हा शेर सादर केला.
महाराष्ट्राच्या निर्मितीपूर्वी व निर्मितीनंतरही सामाजिक अभिसरणाचे प्रयोग झाले. यात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, गोपाळ गणेश आगरकर अशा अनेक मंडळी आहेत व त्यांच्या विचारांचा मोठा वारसा राज्याला मिळाला. अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार व त्यातून उभे राहिलेले राज्यातील कार्य उल्लेखनीय आहे. राज्यात समाजातील सर्व स्तरांतील जनतेला न्याय देण्याचे काम झाले आहे. समाजातील घटक वंचित राहू नये याची खबरदारीही महाराष्ट्राने घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांची मोठी फळी राज्यात निर्माण झाल्याचे सांगत कृषी, उद्योग ,शिक्षण आदी क्षेत्रात महाराष्ट्राने मोगठी प्रगती केली आहे व देशाला नेतृत्व दिल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्याच्या नाटक, संगीत,साहित्याच्या उज्ज्वल पंरपरेवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. नाटक हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठीत दर्जेदार नाटकांचे सादरीकरण होत आलेले आहे. प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीने मराठी नाटकांमध्ये नवीनता आल्याचेही त्यांनी नमूद केले. नाटकांप्रमाणेच मराठी साहित्यालाही मोठी पंरंपरा आहे. दया पवार यांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनाने मराठी साहित्यात क्रांती घडवली. थोर लेखक भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्याला वेगळी दिशा दिली. मराठी साहित्यात नाविन्यपूर्ण प्रयोग सुरु असून हे आश्वासक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी चित्रपटक्षेत्राने मोठी झेप घेतली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये मराठी चित्रपट अग्रस्थानी असतात. मराठी चित्रपटांचा तांत्रिक दर्जा व गुणवत्ता वाढत आहे व ही परंपरा भविष्यात विस्तारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांची झालेली प्रगती भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, प्र.के.अत्रे यांसारख्या थोर पत्रकारांची पंरपरा राज्याला लाभली आहे. बहुतांश राजकीय नेते हे पत्रकारही होते असा उल्लेखही त्यांनी केला. राज्यातील पत्रकारितेला कृतिशील विचारवंतांची परंपरा आहे. आजही मराठी पत्रकारितेचे जनमानसात आदराचे स्थान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्र हे विविध क्षेत्रात प्रयोग करणारे व ते प्रयोग यशस्वी करणारे राज्य आहे. विविध क्षेत्रात कार्यरत राज्यातील जनतेनेही स्वत:च्या प्रगतीबद्दल संतुष्ट न राहता, आप-आपल्या क्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करण्याचा शोध व वेध घेत राहावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
“उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही.” अशा शब्दात त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाची महती वर्णन केली. “धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा माझा विचार नाही.” या ओळींद्वारे महाराष्ट्र कोणत्याही संकटाला न डगमगता विविध क्षेत्रात आपले ध्येय प्राप्त करेल, असा विश्वास डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी व्यक्त केला.