BREAKING NEWS:
नई दिल्ली हेडलाइन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवाद आणि संयुक्त महाराष्ट्र विषयक विचार बळकट केले – प्रसिध्द लेखक व वक्ते श्री जयदेव डोळे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

Summary

नवी दिल्ली, दि. १ : साहित्यातून साम्यवादाचा प्रचार करण्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी सहभाग घेतला. कामगार व दलित मुक्तीप्रमाणेच त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी आपली लेखनी, वाणी आणि आयुष्य झुगारून दिले असे मत, प्रसिध्द लेखक व वक्ते जयदेव डोळे यांनी आज […]

नवी दिल्ली, दि. १ : साहित्यातून साम्यवादाचा प्रचार करण्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी सहभाग घेतला. कामगार व दलित मुक्तीप्रमाणेच त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी आपली लेखनी, वाणी आणि आयुष्य झुगारून दिले असे मत, प्रसिध्द लेखक व वक्ते जयदेव डोळे यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ४५वे पुष्प गुंफताना “अण्णाभाऊ साठे : साम्यवादी,महाराष्ट्रवादी” या विषयावर श्री डोळे बोलत होते.

‘साम्यवाद’ हा अण्णाभाऊ साठेंच्या लेखनाचा व विचाराचा गाभा होता. साहित्यातून साम्‍यवादाचा प्रचार करतानाच ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर होते.आंतरराष्ट्रीय कामगार एकजुटीचे प्रवक्ते असणारे अण्णाभाऊ साठे हे भाषेच्या आधारावर राज्य निर्माण व्हावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उतरले  हे या चळवळीचे व अण्णाभाऊंच्या विशालतेचे मोठ उदाहरण आहे, असे श्री. डोळे म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदान तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्यातील निवडक साहित्याचा श्री. डोळे यांनी आढावा घेतला. अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणात इतिहास आणि वस्तुस्थितीदर्शक मोडतोड केलेली दिसत नसल्याची नोंद करून श्री. डोळे यांनी अण्णाभाऊ लिखित, ‘स्टालिन ग्राडचा पोवाडा’ हा आंतरराष्ट्रीय राजकारणाची दखल घेणारा मराठी साहित्याचे अजोड लेणे असल्याचे सांगितले. अण्णाभाऊंनी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भान ठेवून देशाला ग्रासणाऱ्या संकटांवर वस्तुस्थिती निदर्शक काव्य केले ‘पंजाब दिल्लीचा दंगा’ हा पोवाडा  त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे श्री डोळे म्हणाले.

अण्णाभाऊंच्या काव्यात मुंबई, मुंबईतील कामगार, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास व परंपरा अशा असंख्य गोष्टी येतात. ‘जगबदल घालुनी घाव, सांगूनि गेले मज भिमराव …’  या रचनेवर प्रकाश टाकताना श्री. डोळे म्हणाले ,अण्णाभाऊंच्या या काव्य रचनेची सुरुवात कार्लमार्क्सच्या जगप्रसिध्द उदाहरणाचे वाक्य असून घाव घालून जग बदलायचा संदेश देणारे आहे  तर तो घाव कोणता घालयचा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून जातात.

अण्णाभाऊंनी द्वंद्वात्मक विश्लेषण पध्दतीचा लेखनात प्रयोग केला म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या एकूण कांदबऱ्यांपैकी १२ कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झाले आहेत. त्यांची नाटके कमालीची संवादात्मक आहेत त्यांची तुलना ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘तृतीय रत्न’ या महात्मा फुलेंच्या नाटकांसोबत करू शकतो असे श्री डोळे यांनी सांगितले. अण्णाभाऊ हे संवाद लिहून कथानक पुढे सरकवत न्यायचे पण प्रसंगनिर्मिती फार करीत नसत, यामुळेच त्यांनी लिहीलेल्या नाटकातील संवादात्मकरित्या कथानकाचा भाग पुढे जायचा असे श्री डोळे म्हणाले.

अण्णाभाऊ साठेंच्या नाट‌्य, लघू नाट्य आणि वगाचा गाभा डायलेक्टिक होता तोच त्यांच्या कथा, कांदबऱ्यांतूनही दिसतो. तसेच, अण्णाभाऊ हे निसर्गचित्रण करणारे श्रेष्ठ लेखक असल्याचे सांगून श्री डोळे यांनी अण्णाभाऊंच्या ‘संघर्ष’, ‘चित्रा’ या कादंबरीतील उताऱ्याचे वाचन करून त्यातील निसर्ग चित्रणावर प्रकाश टाकला. १९५० ते १९६० च्या दशकात अण्णाभाऊंनी स्त्रीमुक्ती चळवळीला मोठे साहित्य दिले तसेच अश्पृष्यता विरूध्द आणि दलित मुक्तीच्या चळवळीला साहित्य दिले असे सांगून त्यांनी ‘निळू मांग’ या लघूकथेतील उतारा वाचन केले व त्यातील प्रसंगचित्रणाचे विश्लेषणही केले.

‘पृथ्वी  शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती  दलित, कष्टकरी, कामगारांच्या तळहातावर उभी आहे’ हे पहिल्या दलित साहित्य संमलेनाचे उद्घाटन करताना अण्णाभाऊंचे विधान म्हणजे साम्यवादाचा सिध्दांत व सर्व जग कष्टाच्या बळावर उभे असल्याचा विचार मांडणारे आहे हेच वास्तववादी विचार त्यांच्या वेगवेगळया साहित्य रचनांतूनही दिसून येतात.

अण्णाभाऊ साठे यांनी कामगार दलित मुक्तीसाठी जशी साहित्य निर्मिती केली तसेच स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी त्यांनी आपली लेखनी, वाणी, आयुष्य झुगारून दिले याचे स्मरण ठेवून, कला, साहित्य, राजकारण यांच्या संयुक्त प्रयत्नातून  महाराष्ट्राची प्रगती होत राहो, अशा भावना श्री डोळे यांनी यावेळी व्यक्त केल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *