BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण – डॉ.नितीन राऊत

Summary

125 मेट्रीक टन साठवणूक क्षमतेच्या ऑक्सिजन टँक शहरात आज दाखल कोविड तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा नागपूर, दि. 19 :   कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून लहान मुलांसाठीच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्ह्याला 480 मेट्रीक टन […]

125 मेट्रीक टन साठवणूक क्षमतेच्या

ऑक्सिजन टँक शहरात आज दाखल

कोविड तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

नागपूर, दि. 19 :   कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून लहान मुलांसाठीच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जिल्ह्याला 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेवून उपलब्धताबाबतचे नियोजन करण्यात आले आहे. आज तामिळनाडू येथून 125 मेट्रीक टन साठवणूक क्षमता असलेल्या ऑक्सिजन जम्बो टँक आज शहरात दाखल होत आहेत. हे जम्बो टँक शासकीय मनोरुग्णालय परिसरात स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोनासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, लसीकरण तसेच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात घ्यावयाची खबरदारी याबाबतचा आढावा पालकमंत्री डॉ. राऊत यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. भृशूंडी, डॉ. सरनाईक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, महापालिका उपायुक्त राम जोशी, उद्योग सहसंचालक श्री. धर्माधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना करताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, शहरात तसेच जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आहे. परंतु संभाव्य परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्याला 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेवून तामिळनाडू येथून 125 मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज टँक मनोरुग्णालयात बसविण्यात येणार असून आज जम्बो टँक शहरात दाखल झाला आहे. 1 कोटी 96 लक्ष रुपये यासाठी खर्च येणार असून येत्या 15 दिवसात ऑक्सिजन साठवणूकीची व्यवस्था पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

डेंग्यूच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्या

शहरात तसेच जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून यासाठी प्रत्येक घरांची तपासणी करुन डेंग्यूच्या रुग्णांवर तात्काळ उपचार सुरु करण्याचे निर्देश देताना पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, ग्रामीण भागात 118 रुग्ण तर शहरात 87 रुग्ण आढळून आले आहे. डेंग्यू रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी जिल्ह्यात लोक जागृती मोहिम राबवून ‘कोरडा दिवस’ पाळण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

कोरोना रुग्ण नियंत्रणात असले तरी लसीकरण मोठ्याप्रमाणात सुरु करावे. विशेष घटकांसोबतच सर्व औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी मोठ्या उद्योग समुहांकडून यासाठी लागणाऱ्या सुविधा तसेच लस खरेदीसाठी मदत घ्यावी, अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात 1 लाख 75 हजार विविध क्षेत्रातील कामगार असून त्यांचे लसीकरणासाठी कालबध्द नियोजन करण्याचे निर्देश यावेळी दिले.

लसीकरणासाठी आवश्यक मात्रांची मागणी नोंदवितांना 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या पहिल्या लसीकरणासोबत दुसऱ्या डोसचेही लसीकरण वाढवावे. जिल्ह्यात साधारणत: 11 लाख 42 हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून 3 लाख 20 हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून ऑक्सिजन बेडची संख्या, आवश्यक वैद्यकीय सुविधा व औषध आदी पूर्ततेबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर व नगरपालिका क्षेत्रातील कोविड हॉस्पिटलचे फॉयर ऑडिट तात्काळ पूर्ण करावे तसेच बकरी ईदनिमित्त करावयाच्या आवश्यक उपाययोजनाबाबत माहिती दिली. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शहरात 156 केंद्रावर लसीकरण सुरु असून शहरात दररोज 25 ते 30 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. शहरासाठी 1 लाख डोस मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा व लसीकरणाबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *