BREAKING NEWS:
धुळे महाराष्ट्र हेडलाइन

पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत लाभ मिळवून द्या सोंडले येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

Summary

धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत योजनांचे लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश राज्याचे कृषी […]

धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत योजनांचे लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

कृषी विभागातर्फे सोंडले, ता. शिंदखेडा येथे आज सकाळी रिसोर्स बँक शेतकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा, पीक पाहणी आणि अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, शिरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, शिंदखेड्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे (शिंदखेडा), जी. के. चौधरी (धुळे), सोंडलेच्या सरपंच मंगलबाई पवार आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रास भेट देत आहे. धुळे जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची तूट आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर पर्यायी उपाययोजनांसह बि- बियाणे, रासायनिक खतांची पुरेशी उपलब्धता राहील, असे नियोजन करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. आता शेतकऱ्यांनीही कमी कालावधीत येणारी पिके घेण्यावर भर द्यावा.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कालबध्द विशेष अभियान राबवावे. एमआरईजीएस योजनेंतर्गत राज्यात 38 हजार हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड करण्यात आली आहे. या वर्षी 60 हजार हेक्टर क्षेत्राचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे वळावे. सेंद्रीय शेतीचे मानांकन, प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. त्याची कार्यवाही सुरू असून लवकरच अंमलबजवाणी करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपनी, गटशेती, प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही करावी. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेंतर्गत निर्धारित उद्दिष्टाची पूर्तता करावी. या योजनेंतर्गत रोपवाटिका कार्यान्वित कराव्यात. शेतकऱ्यांना पीक कर्जाचा वेळेत पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे आढावा घ्यावा, असेही निर्देश कृषिमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असतानाही पाचशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण झाले. यावर्षीही पीक कर्ज वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच कृषी प्रक्रिया आधारित उद्योग आणि पूरक व्यवसाय सुरू करावेत, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात 4 लाख 16 हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे क्षेत्र आहे. आतापर्यंत 1 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. त्यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसाचे आगमन झाल्यास पेरणीचे क्षेत्र वाढेल. जिल्ह्यात पुरेसे बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध आहेत. युरियाचा बफर स्टॉक करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कृषी संजीवनी सप्ताह, एक गाव एक वाण या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यावेळी ॲड. प्रकाश पाटील, सतीश माळी, श्रीराम पाटील, संदीप गिरासे, मिलिंद पाटील आदी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी पीक कर्ज वेळेत मिळावे, पीक विमा योजना, मल्चिंग पेपर, उत्पादन दर, धान्य खरेदी,ठिबक सिंचन, शेतकरी प्रशिक्षण याविषयी मुद्दे उपस्थित केले.

शेतकऱ्यांशी संवाद, पीक पाहणी

तत्पूर्वी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सरवड शिवारात भेट देऊन पीक पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉ.  बांदल, तहसीलदार श्री. सैंदाणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *