BREAKING NEWS:
आर्थिक कृषि नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

हमीभावासाठी विक्री व्यवस्थापनाला बळकटी देणार : कृषीमंत्री दादाजी भुसे

Summary

नाशिक दि. 25 जून 2021 (जिमाका वृत्तसेवा) : ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून  शेतमालास योग्य हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विक्री व्यवस्थापन व्यवस्थेला बळकटी देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री […]

नाशिक दि. 25 जून 2021 (जिमाका वृत्तसेवा) : ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेच्या माध्यमातून  शेतमालास योग्य हमीभाव मिळण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विक्री व्यवस्थापन व्यवस्थेला बळकटी देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज  दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित ‘विकेल ते पिकेल’ अभियाना अंतर्गत शेतमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन राजस्तरीय कार्यशाळेत मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, दूरदृश्यप्रणालीद्वारे आमदार सरोज अहिरे, कृषी सभापती संजय बनकर, कृषी विभागाचे आयुक्त धीरजकुमार, अतिरिक्त सचिव रवींद्र शिंदे, आत्माचे संचालक किसनराव मुळे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, स्मार्ट प्रकल्प व्यवस्थापक दशरथ तांबाळे यांच्यासह सर्व उप विभागीय कृषी अधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकरी राजा शेतात कुटूंबासह राबत असतो, त्याची  प्रगती साधण्याच्या दृष्टीने विकेल ते पिकेल अभियानांतर्गत वाणाच्या बाजारातील मागणीनुसार शेतकऱ्यांनी शेतात पिक घ्यावे जेणेकरून, उत्पन्नास योग्य हमीभाव मिळेल. शेतकरी ते थेट ग्राहक या दृष्टीने विक्री व्यवस्थापन बळकट करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून एक धोरण निश्चित  केले जाणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने  केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी बीड मॉडेल सादर करण्यात आले आहे. तसेच द्राक्ष व सिताफळ या पिकांना विमा कवच देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीत शेतकरी, फार्मर प्राड्युसर कंपनी व शेतीमाल प्रक्रिया उद्योजक यांच्या सहभागाने महाराष्ट्रव्यापी एक दिवसीय ऑनलाईन शिबीराचे आयोजन केले जाणार असल्याचेही  मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले आहे.

गतवर्षी देशभरात एकूण 58 हजार 76 कोटी शेतमालाच्या निर्यातीपैकी  13 हजार 877 कोटींची निर्यात एकट्या महाराष्ट्रातून झाली असून 24 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, ही आपल्या सर्वांसाठी  अभिमानास्पद बाब आहे. आगामी काळात गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी विभागामार्फत एकाच छाताखाली शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरीता सिंगल विंडो प्रणालीची व्यवस्था संकेतस्थळावर करण्यात आली आहे. यात 30 टक्के योजना या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले आहे.

राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व मृदा पुजनाने करण्यात आले. या कार्यशाळेत 53 शेती गटांनी  शेतमाल प्रदर्शनाद्वारे सहभाग घेतला. कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते विकेल ते पिकेल पोस्टर, संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान, पंतप्रधान  सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग निर्दीष्टीकरण योजना या घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. निर्यातदार डॉ. केदार थेपडे, नाशिक मिटकॉनचे जिल्हा समन्वयक मदन लोणारे, देवळा कांदा एफ.पी.ओ. स्वप्नील पाटील, मुंबई मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे शंतनु जगताप यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित शेतकऱ्यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *