महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानसभा लक्षवेधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अपघात कमी करण्यासाठी सुविधांची संख्या वाढविणार – मंत्री दादाजी भुसे

Summary

मुंबई, दि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी […]

मुंबई, दि. २५ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात महामार्गावरील सुविधांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य सुनील केदार यांनी, या महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. भुसे यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे आता कार्यान्वित झाले आहेत. या मार्गावर दररोज किमान १७-१८ हजार वाहने प्रवास करतात. आतापर्यंत ३३ लाखांहून अधिक वाहनांनी या मार्गावरून प्रवास केला आहे. अजून दोन टप्पे बाकी असून त्यातील एक टप्पा सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि शेवटचा टप्पा मे -२०२४ पर्यंत कार्यान्वित होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर जे अपघात झाले त्यामध्ये विहीत मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवणे, वाहन चालविताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हर टेकिंग करणे, लेन शिस्त न पाळणे, सुस्थितीत वाहने नसणे, वाहन अवैधरित्या पार्क करणे, वाहतूक सुरक्षततेविषयी काळजी न घेणे तसेच ड्रायव्हिंग करताना चालक सतर्क नसणे, वाहनामध्ये तांत्रिक बिघाड होणे, टायर फुटणे, वाहन चालकाचा डोळा लागणे, वाहनावरचे नियंत्रण सुटणे, व्यसन करून वाहन चालविणे, आग लागणे, मागून दुसऱ्या वाहनाने धक्का मारणे, वाहनाचा तोल जाऊन उलटणे ही  अपघात होण्याची प्रमुख कारणे असल्याचे ते म्हणाले.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, हा महामार्ग इंडियन रोड काँग्रेसच्या संबंधित मार्गदर्शक तत्वानुसारच संकल्पित केला असून वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, महामार्ग पोलिसांमार्फत व आर.टी.ओ. मार्फत अपघात होऊ नये यादृष्टीने वाहन चालकांना वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांवर दंड आकारणी करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, क्रॅटआईज व डेलिनेटर्स लावण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

समृध्दी महामार्गावर वाहनांचे टायर तपासणी करिता पथकर नाक्यांवर आर.टी.ओ विभागास जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या महामार्गावर रहदारी आणि घटना नियंत्रणासाठी इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्ट‍िम (ITS) स्थापित केली जाणार असल्याची माहितीही मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

सुरक्षिततेच्या अनुषंगाने आणि अपघातग्रस्तांना तातडीने सहाय्य करण्यासाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने, रुग्णवाहिका, गस्त वाहने, क्रेन, उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सदस्य संजय गायकवाड, ज्ञानराज चौगुले आदींनी यावेळी चर्चेत भाग घेतला.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *