विधानसभा लक्षवेधी पिलीव येथील यात्रेसाठी योग्य नियोजन करण्याचे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Summary
मुंबई, दि. 27 : “माळशिरस परिसरातील पिलीव येथे महालक्ष्मी यात्रा दरवर्षी भरते. यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून यात्रेचे योग्य नियोजन करण्याचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या देण्यात येतील”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले. पिलीव येथील महालक्ष्मी देवस्थान […]
मुंबई, दि. 27 : “माळशिरस परिसरातील पिलीव येथे महालक्ष्मी यात्रा दरवर्षी भरते. यात्रेच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून यात्रेचे योग्य नियोजन करण्याचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या देण्यात येतील”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
पिलीव येथील महालक्ष्मी देवस्थान येथे दरवर्षी भरणाऱ्या यात्रेत मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना सदस्य राम सातपुते यांनी मांडली होती.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित करून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच देवस्थानच्या जमिनीसंदर्भात माहिती घेऊन अतिक्रमण हटविण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
*****
गौण खनिजांबाबत लवकरच धोरण – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 27 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी लवकरच गौण खनिज धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य महेश बालदी यांनी पनवेल – उरण तालुक्यात झिरो रॉयल्टी पासेसचा गैरवापर करून गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांवर तातडीने कारवाईबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येईल. याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. अधिवेशन संपल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व सिडकोचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेतला.
*****
बुलढाणा जिल्ह्यातील थकीत पीक विम्यासंदर्भातील अहवालाची फेरतपासणी होणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 27 : बुलढाणा जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर जवळपास तीन लाख शेतकरी पीक विम्यास पात्र ठरले होते, मात्र पीक नुकसानाची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत न कळवल्याने किंवा अन्य कारणांनी 11 हजार शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही किंवा अत्यंत त्रोटक विमा रक्कम मिळाली. याबाबत संपूर्ण नुकसानाच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात येईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य श्वेता महाले यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.मुंडे म्हणाले की, राज्यात यावर्षी शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा राज्य शासनाने निर्माण केली असून याद्वारे आजपर्यंत 1 कोटी 14 लाख शेतकऱ्यांनी आपला विमा भरला आहे.
शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा आपत्कालीन काळात शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमानुसार 72 तासांच्या आत त्यांची ऑनलाईन तक्रार करणे बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार करण्याचा अवधी 72 तासांवरून वाढवून किमान 92 तास इतका देण्यात यावा, याबाबत आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.
*****
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करणार – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुंबई, दि. 27 : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
सदस्य दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या ९९६ आजारांचा समावेश असून त्याची संख्या १ हजार ३५६ केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठित करण्यात येईल असेही मंत्री श्री.सावंत यांनी सांगितले.
*****