वारकरी संत चळवळ आणि बुद्ध
================ =======
उत्तर भारतात संतांनी विषमते विरुद्ध चळवळ केली तिला ‘भक्ती चळवळ’, तर महाराष्ट्रात या चळवळीस ‘वारकरी चळवळ’ म्हणतात. इ.स. बाराशेच्या दरम्यान या चळवळीचा पाया संत नामदेवांनी रचला. संत नामदेव हे महाराष्ट्रातील असले, तरी त्यांचा प्रभाव उत्तर भारतातील भक्ती चळवळ आणि शीख धर्मावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. वारकरी चळवळ म्हणजे हिंदू धर्मातील एक सुधारणावादी पंथ होय. आपण वारकरी चळवळीच्या अंगाने जेव्हा विचार करतो, तेव्हा वारकरी चळवळीतील संतांचे आणि सामान्य लोकांचे प्रेरणास्थान – दैवत म्हणजे पांडुरंग (विठ्ठल). हिंदू धर्मातील बहुतांश दैवते (देव) बघितले तर, त्यांच्या हातात कोणतेतरी शस्त्र दिसेल, त्यांनी कोणत्या तरी राक्षसाचा वध केला, दोन पेक्षा अधिक हाथ, कोणाचे डोके एकापेक्षा अधिक, कोणाची शरीर यष्टी मानवापेक्षा वेगळीच, काहींचे वाहन सुद्धा आजच्या विज्ञान युगातील कल्पनेपलीकडल. तर पांडुरंगाचे वर्णन बघितले तर साक्षात मानवासारखा. रंग सावळा, दोन हात- दोन पाय असणारा, हातात कोणते शस्त्र नाही आणि कोणाचा वध केलेला नाही, कल्पनेपलिकडील वाहन नाही; म्हणजे मानवापेक्षा वेगळा नाही. पांडुरंग जणू समतेचा प्रतीकच. बुद्ध सुद्धा तसाच, पांडुरंगासारखा. बुद्धाने सुद्धा कोणते शस्त्र हाती न घेता आपल्या समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता व प्रेमाच्या विचारांचा प्रसार करून जगातील मानवाच्या मनावर राज्य केलं. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “हाती तलवार न घेता, बुद्ध राज्य करी जगावर |
त्यासी कारण एक, प्रचार प्रसार ||”
बुद्ध आणि पांडुरंग हे समतेचे – मानवतावादाचे प्रतीक असल्यामुळेच वारकरी चळवळीतील संत नामदेवा पासून ते तुकडोजी महाराजापर्यंत या सर्वांना बुद्ध सुद्धा खूप जवळचा वाटला; म्हणून त्यांच्या साहित्यात बुद्धाचा उल्लेख आढळतो.
बुद्धाच्या विचाराचे जसे, सर्व जातीचे, विविध व्यावसायिक, आणि सामान्य माणसापासून ते चक्रवर्ती राजा पर्यंतचे लोक अनुयायी होते; तसेच पांडुरंगाचे आहे. बुद्धासी निगडित अनेक बाबी वारकरी चळवळीने स्वीकारल्याचे दिसते. जसे…..
++ *भगवा :-* वारकरी पंथाचा ध्वज झेंडा भगव्या रंगाचा. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्याचे ध्वज हे भगव्या रंगाचे निवडले. हा भगवा रंग बुद्धाची ओळख सांगणार आहे. बुद्धाचे चिरव व भिक्खूंचे वस्त्र हे भगव्या रंगाचेच होते. पुढे सांगायचे झाल्यास बुद्धाचे नावच भगवान होते आणि म्हणून बुद्धाने जे वस्त्र परिधान केले ते त्यांच्या नावाने ओळखल्या गेले. भगवा हे नाव बुद्धांनी दिलेले नाव आहे.
++ *अहिंसा :-* बुद्धाने हिंसा वर्ज्य केली. त्यांनी अहिंसेचा स्वीकार केला. अहिंसेच्या मार्गाने झालेले परिवर्तन चिरकाल टिकणारे असते तर शस्त्राच्या माध्यमातून झालेले परिवर्तन हे अल्पजीवी असते. बुद्धाने सांगितलेला अहिंसेचा मार्गच वारकरी संप्रदायाने स्वीकारला.
++ *संतांचा मार्ग :-* 1) ज्ञान समाजाच्या खालच्या वर्गापर्यंत पोहोचायला हवा. 2) उच्च – नीच न मानता समाजातील सर्व वर्गाला चळवळीत सामावून घेणे. 3) लोकांना समजेल अशा त्यांच्या लोकभाषेत ज्ञान पोहोचविणे. या त्रिसूत्रीवर वारकरी चळवळीने जे काम केले ते बुद्धाच्या कार्याशी निगडित असल्याचे दिसते; कारण त्यांनी सुद्धा ज्ञान देताना कोणताही भेदाभेद केला नाही. तसेच सामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचविण्याकरता लोक भाषेची (पाली) निवड केली. त्यांच्या संघात स्त्री-पुरुषासह सर्व वर्गातील लोक होते.
अलीकडे वारकरी शब्दाचा अर्थ वार करणारा तो वारकरी असा सांगितल्या जात आहे. परंतु ‘वारीकरी’ हा मूळ शब्द आहे. वारकरी संप्रदायात जेव्हा कोणी व्यक्ती प्रवेश करायचा तेव्हा तुळशीची माळ घालून त्याला शपथ घ्यावी लागायची. ही शपथ बुद्धाच्या पंचशीलासी साम्य असणारी आहे.
बुद्धाची आणि वारकरी चळवळीशी संबंधित असे अनेक साम्य सांगता येतील. आपण जसे – जसे या दोन्ही विषयांच्या खोलात जाऊन अभ्यास कराल तेव्हा आपणास हे समजेल. वारकरी चळवळीतील अनेक संतांच्या साहित्यात बुद्धाचा उल्लेख आलेला आहे. त्यातील काही संतांनी बुद्धाचा केलेला उल्लेख बघूया…..
“नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लाव जगी ||”
असा ज्ञानाचा संदेश देणारे वारकरी संप्रदायाचे संस्थापक संत नामदेव महाराज म्हणतात…..,
“बौद्ध अवतारी, आम्ही झालो संत |
वर्णावया मात, नामा म्हणे ||”
वर्णव्यवस्थेवर मात करण्यासाठी आम्ही बौद्ध अवतारात संत झालो असे म्हणतात.
वारकरी चळवळीचा कळस, तसेच या चळवळीतील सर्वात विद्रोही संत म्हणून ज्यांचा उल्लेख केल्या जातो. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, तुकाराम महाराज म्हणतात,
“तोडावया अवघ्या, चेष्टांचा संबंध |
सुद्धापासी सुद्ध, बुद्ध व्हावे ||”
पुढे पुन्हा ते एका अभंगात म्हणतात,
“बौद्ध अवतार, माझ्या अदृष्ट |
मौनी मुखी निष्ठा धरीयेली ||
संत एकनाथ महाराज म्हणतात,
“नववा पबैसे स्थिररूप , तया नाम बुद्धरूप |
संत तया दारी, तिष्टताती निरंतरी ||”
पुढे एका भारुडात एकनाथ महाराज म्हणतात,…… बौद्ध अवतार घेऊन
विटेसम चरण ठेऊन
पुंडलिक दिवटा पाहून
त्याचे द्वारी गोंधळ मांडिला
दार उघड बया दार उघड
बौद्धाई बया दार उघड.
संत एकनाथांनी जणू पांडुरंगालाच बुद्धाचे रूप मानले आहे; कारण जो स्थिर रूपात बसलेला आहे, त्याचे नावच बुद्ध रूपातील आहे असे ते म्हणतात. संत तुकाराम महाराजांची शिष्य बहिणाबाई पाठक म्हणतात,
“कलियुगी हरी | बुद्ध रूप धरी |
तुकोबा शरीरी | प्रवेशला || l”
बहिणाबाई तर तुकाराम महाराजांमध्येच बुद्ध बघत होत्या. माञ आम्ही ज्या पांडुरंगाला मानतो, त्या संतांच्या ओव्या आणि अभंगाचे वाचन – गायन करून सुद्धा आम्ही बुद्धाला जवळ करण्याचा प्रयत्न करत नाही. हे वारकरी चळवळीच्या विचारांची प्रताळ्नाच म्हणावी लागेल. संत जनाबाई म्हणतात,
“होऊनिया, कृष्णा कंस | वधियला ||
आता, बुद्ध झाला | सखा ||
आधुनिक युगातील वारकरी चळवळीतील ज्या दोन संतांचा उल्लेख केल्या जातो ते म्हणजे एक गाडगेबाबा व दुसरे तुकडोजी महाराज. गाडगेबाबांचे आयुष्य बघितले तर ते बुद्धाच्या आयुष्याशी जोडणारे वाटते. संसार त्याग, कोणतीही संपत्ती नाही, पोटाला लागेल तेवढे खाण्यासाठी मागणे. तुकडोजी महाराजांनी तर बुद्धाची 2500 वी जयंती 100 ठिकाणी विविध उपक्रम घेऊन साजरी केली. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहताना ते लिहितात,
“अब आया है, साम्ययोग यह बता दिया, तुमने सबको|
चाहता है भगवान बुद्ध यह गुंजा दिया सारे नभ को||
बुद्धाने शारीरिक दृष्ट्या पुनर्जन्म नाकारलेला आहे. वारकरी चळवळीतील लोक संत अवतार परंपरा मानत असले, तर त्या मागचं त्यांचा बुद्धाविषयीच्या उदात्त हेतू आपण समजून घेणे आवश्यक आहे. कारण हिंदू हे नाव पुढे करत ब्राह्मणांनी बौद्ध धम्मातील काही तत्वे व आचार विचारांची सरळ – मिसळ करून बुद्ध अनुयायांना आपल्या विचारात गुंतवण्याचा प्रयत्न केला. भिक्खू ऐवजी भिक्षुकशाही (पुरोहितशाही /भटशाही) निर्माण करून, सामान्य जनतेवर त्यांच्या सनातनी विचारांचे वर्चस्व लादले, असे असले तरी संख्येने अल्प असलेली, काही सामान्य जनता बौद्ध धम्माचे आचरण करीत होती. ही परंपरा, संत नामदेवापासून तुकडोजी महाराजांपर्यंत चालत आल्याचे त्यांच्या साहित्यातून दिसते. वारकरी आणि बौद्ध धम्म या दोन्ही चळवळींनी, कोणी एक पाऊल मागे तर कोणी एक पाऊल पुढे करत सोबत आले तर मानवाच्या विकासात, परिवर्तनास मोठाच हातभार लागेल. बुध्द जयंतीला ती अपेक्षा करण्यास काही हरकत नसावी.
======= अनिल भुसारी =======
8999843978
संदर्भ – विद्रोही तुकाराम, हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ
प्रा शेषराव येलेकर
सह. संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क