लोकशिक्षकाच्या भूमिकेतून मतदानाच्या कर्तव्य पालनाचे भान द्या! – डॉ. विपीन इटनकर यांची सोशल मीडिया इन्फ्लुएर्न्स्सना साद जिल्ह्यात स्विप अंतर्गत मतदारांच्या जागृती व मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन
Summary
नागपूर, दि. 21 : लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र असलेल्या मतदारांनी मतदान करणे हे अभिप्रेत आहे. प्रत्येक नागरिकाच्या राष्ट्रीय कर्तव्याच्या तो भागही आहे. यावर्षी राज्यात सर्वाधिक युवा मतदारांनी नोंदणी करुन नागपूर मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रत्येक मतदारांमध्ये मतदानासाठी येत […]
नागपूर, दि. 21 : लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येक पात्र असलेल्या मतदारांनी मतदान करणे हे अभिप्रेत आहे. प्रत्येक नागरिकाच्या राष्ट्रीय कर्तव्याच्या तो भागही आहे. यावर्षी राज्यात सर्वाधिक युवा मतदारांनी नोंदणी करुन नागपूर मतदार संघाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्रत्येक मतदारांमध्ये मतदानासाठी येत असलेले जबाबदारीचे भान आता प्रत्यक्ष मतदानामध्ये परावर्तीत झाले पाहिजे. यासाठी प्रत्येक मतदारांना मतदान करण्यासाठी कर्तव्याचे भान द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसरांना केले.
नागपूर मतदार संघात 75 टक्केपेक्षा अधिक मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वरिष्ठ अधिकारी व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांची उपस्थिती होती. युवा पिढीला भूरळ घालणाऱ्या इन्स्टाग्राम, रिल्स, फेसबुक पेज, रेडिओ जॉकिज असे सोशल मीडियावर प्रभुत्व असलेल्या इन्फ्लुएंसर यांना या बैठकीसाठी विशेष निमंत्रित केले होते.
आजची युवा पिढी ही रिल्स व इतर सोशल मीडियावरील संदेशांना तात्काळ प्रतिसाद देते. यातील सामाजिक आशय आणि संदेशाचा भाग लक्षात घेतला तर एका अर्थाने इन्फ्लुएंसर हे लोकशिक्षकच आहेत. आपल्या देशाच्या लोकशाहीला सक्षम करणाऱ्या मतदान जनजागृती मोहिमेत आपले उत्तरदायीत्व लक्षात घेवून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी स्वीप अंतर्गत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांनी ही एक देशसेवाच आहे असे सांगून आम्हाला याची संधी मिळाल्याबद्दल उत्स्फूर्त तत्परता दर्शविली.
जिल्ह्यात स्विप अंतर्गत मतदारांच्या जागृती व मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन
जिल्हयामध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागांमध्ये मतदारांचे पध्दतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रम (SVEEP) प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विशेष पुरस्कारही यासाठी ठेवण्यात आले आहे. रिल मेकींग कॉम्पीटेशन (Reel Making Competition), 18 वर्षावरील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांसाठी माझे पहिले मत देशासाठी, मी स्वाभिमानी मतदार, स्पर्धा, अपार्टमेंट/ हाऊसिंग सोसयटीसाठी तीन श्रेणीमध्ये स्पर्धा, औद्योगिक क्षेत्रासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सर्व गटातील युवा व इतर मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.
अशा आहेत स्पर्धा
नवमतदारसाठी रिल मेकींग कॉम्पीटेशन
या स्पर्धेचा विषय ” मेरा पहिला वोट देश के लिए ” व “मी आहे स्वाभिमानी मतदार” असा आहे. यामध्ये नागपूर जिल्हयातील सर्व १८ ते ३० वयोगटातील युवक युवतींना सहभागी होता येईल. आपल्या सोशल मिडिया अकॉऊंटमध्ये रिल्स व इतर निर्मिती अपलोड करतांना यामध्ये चुनाव का पर्व, देश का गर्व, वोट करेगा नागपूर, मेरा पहिला वोट देश के लिए या हॉशटॅगचा वापर करावा. नागपूर स्विप आणि जिल्हा निवडणूक कार्यालय इंस्टाग्राम (डिईओ नागपूर), फेसबुक(डिईओ नागपूर), व्टिटर (डिईओ नागपूर) यांना टॅग करावे. या कार्यक्रमाचा कालावधी ३१ मार्च २०२४ राहील. आणि ज्या रिलला सर्वात जास्त प्रतिसाद मिळेल अश्या रिल जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन आफिशियल रिल म्हणून प्रसिध्द होणार आहे. आपली नोंदणी सोबत दिलेल्या sveepngp2024@gmail.com या ईमेलवर व https://rb.gy/tlddtv या लिंकवर अपलोड करण्यात यावी. नागपूर विद्यापीठ अंतर्गत शाळा व महाविद्यालयात व्होटींग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर विद्यापीठ अंतर्गत स्पर्धा
या स्पर्धेचा विषय मेरा पहिला व्होट देश के लिए व आय एम प्राऊड व्होटर असा राहील. ही स्पर्धा नागपूर जिल्हयातील शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षावरील विद्यार्थ्यांकरिता आहे. या स्पर्धेत दिलेले उपक्रम दिनांक २१ एप्रिल पर्यंत करावे लागतील. सर्व शैक्षणिक शाळा आणि कॉलेज मधील युवा मतदारांनी १०० टक्के मतदान करण्यासाठी शपथ घेणे. शैक्षणिक संस्थामधील पालक-शिक्षक समितीने “आपले बुथ ओळखा” हा उपक्रम राबविणे. पालक वर्गाला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रेरित करणे, खाजगी शिकवणी वर्गामधील नवीन मतदारांना सहभागी करणे, विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृती वाढविण्यासाठी शाळा व कॉलेज यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे हे उपक्रम यात आहेत. याच बरोबर युवा वर्ग आणि सांस्कृतीक कार्यक्रमांमध्ये SVEEP उपक्रम राबविणे, पूर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान राबविणे, जास्तीत जास्त नाव नोंदणी करणे, त्यांना मतदानाकरिता प्रोत्साहीत करणे व मतदानाची टक्केवारी वाढवून जास्तीत जास्त मतदान होईल याकरिता प्रयत्न करणे आदी बाबी अंतर्भूत असतील. ज्या शाळा व कॉलेजला सर्वात जास्त मतदान होईल त्यामधील तीन शाळा व कॉलेज जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन त्यांचा स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येईल. नोंदणी https://rb.gy/grxvem या गुगल ड्राईव्ह लिकला करण्यात यावी. नोंदणी करतांना काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडीवर अडचण नोंदविता येईल.
इमारत उच्च श्रेणी मतदार स्पर्धा
शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी असल्याने हाऊसिंग सोसायटीमध्ये इमारत उच्च श्रेणी मतदार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिका किंवा जिल्हयात वेगवेगळ्या नगरपरिषद, नगरपंचायत तसेच पेरी अर्बन ग्रामपंचायतीमध्ये अपार्टमेंट, कॉम्पलेक्स, हाऊसिंग सोसायटी, हॉय राईसेसमध्ये स्पर्धा खालील तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.
प्रथम गट- 50 पर्यंत कुटुंब संख्या असलेल्या फ्लॅट , अपार्टमेंट , हाऊसिंग सोसायटी. द्वितीय गट- 50 पेक्षाजास्त व 100 पेक्षा कमी कुटूंब संख्या असलेल्या फ्लॅट,अपार्टमेंट,हाऊसिंग सोसायटी तर तृतीय गट- 100 पेक्षाजास्त कुटुंब संख्या असलेल्या फ्लॅट, अपार्टमेंट, हाउसिंग सोसायटी असे आहेत.
वरील तिन्ही गटामधील सर्व 18 वर्षावरील मतदार यांना सहभागी होता येईल. सदर स्पर्धेचा अंतीम दिनांक २१ एप्रिल राहील. प्रत्येक गटामधील ज्या फ्लॅट, अपार्टमेंट, हाउसिंग सोसायटीमध्ये सर्वात जास्त मतदान होईल, त्या प्रत्येक गटामधील तीन फ्लंट, अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटीमधील मतदारांनी केलेल्या मतदानाचे प्रमाण लक्षात घेवून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत निवड केली जाईल. विजेत्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
वरील वर्गवारीत मोडणाऱ्या सर्व फ्लॅट अपार्टमेंट, हाउसिंग सोसायटी यांनी आपली नोंदणी https://rb gy/1i94co या गुगल लिंकवर करणे अनिवार्य राहील. नोंदणी करतांना काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडी वर आपली अडचण नोंदवू शकतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त फ्लॅट, अपार्टमेंट, हाऊसिंग सोसायटी मधील मतदार या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
उद्योग क्षेत्रातील कामगारासाठी मतदान स्पर्धा
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कारखान्यात काम करणाऱ्या कामगारासाठी मतदान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय आय ॲम प्राऊड वोटर अर्थात मी स्वाभिमानी मतदार असा राहील. यामध्ये नागपूर जिल्हयातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात काम करणाऱ्या ५० पेक्षा जास्त संख्या असलेल्या कामगारांना सहभाग घेता येईल. १८ वर्षावरील औद्योगिक क्षेत्रात कारखान्यात काम करणारे मतदारांना यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेचा अंतीम 21 एप्रिल असा आहे.
यामध्ये पुढील या बाबींचा समावेश असेल. सर्व औद्योगिक घटक व विविध कामगार संघटना यांनी सहभाग नोंदवावा. पात्र कामगार मतदारांचे नाव नोंदणी करणे, मतदानाविषयी शपथ घेणे, जनजागृती करणे, विविध स्पर्धा आयोजित करणे, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहीत करणे व मतदानाची टक्केवारी वाढवून जास्तीत जास्त मतदान होईल यादृष्टीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करणे आदी बाबी यात अंतर्भूत असतील.
ज्या औद्योगिक क्षेत्रात व कारखान्यात सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी होईल. त्यामधील तीन औद्योगिक घटकांना जिल्हा निवडणूक विभागामार्फत अंतिम करुन त्यांना स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येईल.
आपली नोंदणी Registration https://rb gy/n80jv9 या गुगल ड्राईव्ह लिंकवर अपलोड करण्यात यावी. काही अडचण निर्माण झाल्यास sveepngp२०२४@gmail.com या ई-मेल आयडी वर आपली अडचण नोदविता येईल.
00000