लॉकडाऊन पश्चात अधिकाधिक पीक कर्ज मेळावे घ्यावेत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे खरिप पीक आढावा बैठकीत निर्देश
Summary
नागपूर, १८ मे – पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क ला मिळालेल्या माहितींनुसार शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी लॉकडाऊन पश्चात कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा सहकारी बँकांनी जास्तीतजास्त पीक कर्ज मेळावे घ्यावे, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन […]
नागपूर, १८ मे – पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क ला मिळालेल्या माहितींनुसार शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी लॉकडाऊन पश्चात कालावधीमध्ये राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा सहकारी बँकांनी जास्तीतजास्त पीक कर्ज मेळावे घ्यावे, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
नागपूर जिल्ह्याची खरिप पीक आढावा बैठक आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. यावेळी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सुद्धा चर्चा झाली. या बैठकीला पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल, आमदार राजू पारवे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर उपस्थित होते.
खरिप पीक हंगामामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा व योजनांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार रहावे, असे सांगून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, जुलै व ऑगस्ट महिण्यामध्ये शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, त्याकरीता जिल्ह्याला जास्तीत जास्त युरिया बफर स्टॉक मिळण्याकरीता पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध होईल, या दृष्टिकोणातून नियोजन करावे. त्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सुध्दा आवश्यक ते बदल करावे. शेतकऱ्यांना चांगले व प्रमाणित वाण मिळण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे बियाणे व खते मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांची तपासणी करण्यात यावी व कुठेही बोगस किंवा अप्रमाणित बियाणे, खतांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी जास्तीत जास्त नमुने काढण्यात यावे. भरारी पथकाच्या मार्फत जास्तीत जास्त धाडी टाकण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टिने पीक पध्दतीमध्ये बदल करावा, अशी सूचना डॉ. राऊत यांनी दिली. कमी कालावधीचे वाण लावण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती करावी. जेणेकरुन रब्बी क्षेत्र वाढण्यास मदत होईल. सोयाबीन बियाणांची कमतरता लक्षात घेता, महाबीज व खाजगी कंपन्यांकडे नियमित पाठपुरावा करुन आवश्यक ते बियाणे उपलब्ध होईल त्याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच शेतकऱ्यांकडील बियाणांची उगवण शक्ती तपासून पेरणी करण्याबाबत जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातुन जाणीव जागृती करण्यासाठी कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
*पीक विमा योजनेसाठी विशेष बैठक*
पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फायदा होत नाही, उलट शेतकऱ्यांची लूट केली जाते, या मुद्यावर आजच्या बैठकीत अनेक लोकप्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले. पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी/अडचणी असतात. त्या सोडविण्यासाठी विमा कंपनीने जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करावा, अशी सूचनाही डॉ. राऊत यांनी केली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी कंपनीकडे नियमीत पाठपुरावा करावा, असेही डॉ. राऊत यावेळी म्हणाले.
*कालवे दुरुस्ती*
पाऊस कमी आल्यास सिंचनाद्वारे शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची गरज पडते, असे सांगून डॉ. राऊत म्हणाले, ओलितासाठी सिंचन विभागाने कालव्यांची दुरुस्ती व डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. खरिप हंगामापूर्वी ते काम प्राधान्याने करावे, पावसाळ्यात कालवे दुरुस्तीच्या कामात अडचणी येऊ शकतील. यासंदर्भात सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्देश जारी करावेत, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.
*तात्काळ वीज जोडणी द्यावी*
ज्या शेतकऱ्यांनानी कृषी पंपासाठी वीज जोडणीचे पैसे भरलेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना वीज जोडणी तात्काळ द्यावी. काही शेतकऱ्यांनी पहिल्या योजने अंतर्गत पैसे भरलेले आहेत. परंतु नवी योजना लागू झाल्याने त्या
शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. नागपूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी रक्कम अदा केलेली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी यावेळी दिले.
श्री राकेश ज्ञानहर्ष
नागपुर
विभागीय प्रमुख संवाददाता
8484874218