लाव रे तो व्हीडिओ, कपाटात… बुधवार, १७ एप्रिल २०२४ संपादकीय इंडिया कॉलिंग डॉ. सुकृत खांडेकर
Summary
मी सगळ्या गोष्टींकडे बारकारईने पाहतो, तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्रना सांगितले, राज्यसभा नको. विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मनसे, महायुतीला फक्त नरेंद्र मोदींसाठीच पाठिंबा देत आहे… गुढीपाडव्याला मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण […]
मी सगळ्या गोष्टींकडे बारकारईने पाहतो, तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी काही गोष्टी ठरवाव्या लागतील. मी देवेंद्रना सांगितले, राज्यसभा नको. विधान परिषद नको. पण देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मनसे, महायुतीला फक्त नरेंद्र मोदींसाठीच पाठिंबा देत आहे…
गुढीपाडव्याला मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विराट मेळावा झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे मुंबईत आल्यावर काहीही बोललेले नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे महायुद्ध सुरू असताना राज हे कोणती नेमकी भूमिका घेतात, याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. राज हे सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते आहेत हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.
राज ठाकरे यांनी केवळ मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा का दिला, या प्रश्नाचा त्यांनी आपल्या भाषणातून ऊहापोह केला नाही. राज यांचा निर्णय मोदींच्या विरोधकांना आवडला नाही, मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत असे ज्यांना वाटते त्यांना पसंत पडला नाही. म्हणूनच राज ठाकरे यांची मोदी-शहांपुढे शरणागती, राज यांच्या भाजपापुढे लोटांगण अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. काँग्रेसने तर वाघ गवत खाऊ लागला, वाघाची शेळी झाली अशी प्रतिक्रिया दिली. बिनशर्त पाठिंबा कशासाठी? गेल्या निवडणुकीच्या वेळी अमित शहा हे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी करण्यासाठी मुंबईत येऊन मातोश्रीवर भेटायला गेले होते, त्यानंतर अविभाजित शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी राज ठाकरे हे अमित शहा यांना भेटायला दिल्लीला गेले. या भेटीत भाजपाबरोबर समझोता झाला का, या प्रश्नाचे अजूनही गूढ कायम आहे. बिनशर्त पाठिंब्याच्या बदल्यात मनसेला काय मिळाले, याचे उत्तर शिवतीर्थावर मिळाले नाही.
सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १२१ आमदार निवडून आले होते. मोदी लाट असूनही भाजपाला बहुमत मिळाले नव्हते. तेव्हा अविभाजित शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी भाजपाने तीन महिने तंगवले होते. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही हे लक्षात येताच तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यासाठी प्रफुल पटेल हे भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी टीव्हीच्या कॅमेरापुढे धावत आले होते. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला की फेटाळला हे कधीच कोणाला समजले नाही.
राज ठाकरे यांना मोदींना बिनशर्त पाठिंबा द्यायचा होता, तर त्यासाठी एवढी मोठी विराट सभा कशासाठी घेतली, साधे ट्वीट केले असते तरी चालले असते, अशी टीका चोहोबाजूंनी झाली. राज यांच्याकडे सत्ता नाही. केंद्रात, राज्यात, अगदी स्थानिक स्वराज संस्थातही त्यांचा पक्ष कुठे सत्तेत नाही तरीही शिवतीर्थावर लाख-दीड लाखांची तरुणाई लोटते हे भाग्य शिवसेनाप्रमुखांशिवाय अन्य कुणाला लाभले आहे? खंबीर नेतृत्वासाठी आपण मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहोत हे जाहीरपणे सांगण्याची हिंमत राज यांनी दाखवली. सर्व मराठी वृत्तवाहिन्यांवरून त्याचे थेट प्रक्षेपण झाले. राज यांनी मनसैनिकांना अंधारात ठेऊन आपली भूमिका मांडलेली नाही, आपल्याला जे पटले तेच त्यांनी स्पष्टपणे मांडले. मनसेची महाराष्ट्रात जी काही दोन-चार टक्के मते आहेत ही आता भाजपाकडे जातील.
ईडी-सीबीआय चौकशीचा धाक दाखवून राज यांना भाजपाने घाबरवले व मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर करायला भाग पाडले, अशी पुडीही सोशल मीडियावर सोडण्यात आली. पाच वर्षांपूर्वी हेच राज ठाकरे, लाव रे तो व्हीडिओ म्हणत मोदी सरकारचे जागो-जागी वस्त्रहरण करीत होते, त्यानंतर राज यांना ईडीला घेरता आले असते. ईडी, सीबीआयचा ससेमिरा मागे लागला असता, तर राज ठाकरे पाच वर्षे मोकळेपणे फिरू शकले असते का? पण तसे काहीच घडले नाही.
शिवसेनेला २००९ मध्ये भाजपा चांगली वाटत होती व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष त्यांच्या दृष्टीने वाईट होते. सन २०१४ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपा वाईट ठरवली व युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. निकालानंतर त्यांना पुन्हा भाजपा चांगली वाटू लागली व भाजपाबरोबर ५ वर्षे सत्ता उपभोगली. २०१९ मध्ये उद्धव यांना विधानसभा निवडणूक लढवताना भाजपा चांगली वाटली. पण निकालानंतर मुख्यमंत्रीपदाची ऑफर येताच त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष जास्त चांगले वाटू लागले. सन २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे शिवसैनिक हे चांगले वाटू लागले व एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या शिवसैनिकांना त्यांनी गद्दार ठरवले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राजकीय भूमिका अनेकदा बदलल्या, पण त्यावर कोणी आकांड- तांडव केले नाही. पण राज ठाकरेंवर सोशल मीडियातून अनेक जण कसे तुटून पडत आहेत, याचाच अनुभव साऱ्या महाराष्ट्राला येतो आहे.
राज यांनी २०१९ मध्ये मोदी-शहा यांना देशाच्या राजकीय क्षितिजावरून हटवले पाहिजे अशी भूमिका मांडली तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला खूप आनंद होत होता. आता २०२४ मध्ये मोदींना पाठिंबा जाहीर करताच या दोन्ही पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला आपला वाटा दिला नव्हता किंवा मनसेला सन्मानही दिला नव्हता. आता राज यांच्या नव्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी भाजपाचे नेते वेगाने सरसावलेले दिसतात, त्याचा राग काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा सेना व छटुक फुटूक इंडिया समर्थकांना का येतो आहे? लोकसभा निवडणूक लढविण्यात राज हे फारसा रस घेत नाहीत हे प्रत्येक वेळी दिसून आले. २०१४ मध्ये त्यांनी मोदींना पाठिंबा दिला तेव्हा मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. २०१९ मध्ये मोदींना विरोध केला तेव्हाही लोकसभा लढवली नाही आणि २०२४मध्ये मोदींना पाठिंबा दिला, पण चला विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला. प्रत्येक निवडणूक ही मतदारांपर्यंत पक्ष आणि पक्षाचे चिन्ह पोहोचविण्याची संधी असते. पण राज यांची त्यासंबंधी गणिते वेगळी असावीत.
राज यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला असता व मोदींवर टीकेची झोड उठवली असती, तर ते मोदी विरोधकांना खूप आवडले असते. जेव्हा उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर राहिले तेव्हा राज हे मोदींवर टीका करीत होते, आता उद्धव ठाकरे हे काँग्रेस-शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आहेत तेव्हा त्यांच्यामागे राज यांनी मम म्हणत फिरावे, अशी मोदी विरोधकांची अपेक्षा होती का?
लाव रे तो व्हीडिओ ते बिनशर्त पाठिंबा ही बदललेली भूमिका आश्चर्यकारक किंवा अनेकांना धक्कादायक आहे. नितीशकुमार हे अगोदर भाजपाच्या छावणीत होते, भाजपाच्या पाठिंब्यानेच त्यांनी केंद्रात व राज्यात सत्तेची मोठी पदे उपभोगली. मध्यंतरी ते भाजपाचे कडवट विरोधक बनले. लालू यादव व काँग्रेसबरोबर मोट बांधून त्यांनी भाजपाच्या विरोधात राजकारण केले. पण नंतर त्यांचे डोळे उघडले तेव्हा भाजपाच योग्य असा त्यांना साक्षात्कार झाला. नितीशकुमार यांचा एनडीएमध्ये प्रवेशही सन्मानाने झाला व त्यांचे मुख्यमंत्रीपदही कायम राहिले. राज ठाकरे यांनीही मोदींवर यापूर्वी ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत धारदार व जोरदार टीका केली आहे, पण ती टीका वैयक्तिक नव्हती, तर मुद्द्यांवर होती, याचे भान भाजपाला आहे. पण मोदी विरोधकांना राज यांनी मोदींना दिलेला पाठिंबा म्हणजे फार मोठे पाप वाटते आहे.
भाजपाबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहेच. रामदास आठवले हे तर अगोदरपासूनच आहेत. आता मनसैनिकांचीही त्यात भर पडली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या विभागांत मनसेची व्होट बँक आहे. शिवाय राज यांच्यासारखा प्रभावी व आक्रमक वक्ता आहे, त्याचा लाभ महायुतीला निश्चितच होईल. लाव रे व्हीडिओ कपाटात बंद झाला आणि मोदींच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा मिळाला. गुढीपाडव्याला भाजपाला मिळालेली ही मोठी भेट आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in