BREAKING NEWS:
नाशिक महाराष्ट्र हेडलाइन

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामे करण्यावर भर द्यावा – पालकमंत्री दादाजी भुसे

Summary

नाशिक, दि.19 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा […]

नाशिक, दि.19 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान व जलजीवन मिशन या विभागांच्या आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपवनसंरक्षक उमेश वावरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, नाशिक व कळवण चे सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान, विशाल नरवाडे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मनरेगा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये घरकुल, सार्वजनिक शौचालय, विहिरी या व्यतिरिक्त इतर कामे देखील घेण्यात यावीत. त्यात आदर्श शाळा, शाळांच्या संरक्षक भिंती, साखळी बंधारे अशा विविध कामांचा समावेश या कामांमध्ये करण्यात यावा. मनरेगा अंतर्गत 101 कोटींचा खर्च केला त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व मजुरांनी केलेल्या कामाचे कौतुक पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी केले.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून गावांचा व कामांचा क्रम ठरविण्यात यावा. तसेच ज्या ठिकाणी कमी जागेत जास्त पाणीसाठा होईल, अशा जागा निश्चित कराव्यात. या अभियानाच्या माध्यमातून जमिनीची पाणी पातळी वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तेथे जलयुक्त शिवार अभियानातून बंधारे बांधण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. त्याचप्रमाणे संबंधित विभागांनी या अभियानाच्या कामांचा एकत्रितपणे विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश ही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यावेळी म्हणाले की, शासनाच्या योजना राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांच्या उद्घाटन प्रसंगी देखील लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे. जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण असलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच पूर्ण झालेल्या गावनिहाय कामांची सद्यस्थिती व वस्तुस्थितिदर्शक अहवाल संबंधित यंत्रणेने सादर करावा अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बैठकीदरम्यान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जलयुक्त शिवार अभियानाबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते व जलजीवन मिशन बाबत जिल्हा परिषदेचे ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *