BREAKING NEWS:
नई दिल्ली संपादकीय हेडलाइन

या सम हाच बुधवार, २५ डिसेंबर २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

Summary

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर दि. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन योजले होते. या संमेलनातच जनता पार्टीतून विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आला. आणिबाणी उठल्यानंतर जनता पार्टीची स्थापना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून झाली होती. जनता पार्टीत काँग्रेसविरोधी पक्ष […]

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर दि. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन योजले होते. या संमेलनातच जनता पार्टीतून विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आला. आणिबाणी उठल्यानंतर जनता पार्टीची स्थापना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेतून झाली होती. जनता पार्टीत काँग्रेसविरोधी पक्ष सामील झाले होते. जयप्रकाश यांचे १९७९ मध्ये निधन झाले, त्यानंतर जनता पार्टीला ग्रहण लागले. जनता पार्टीचा प्रयोग फसला. जनता पार्टीतील समाजवादी नेत्यांनी दुहेरी सदस्याचा मुद्दा उपस्थित करून जनसंघाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एकाचवेळी जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे संबंध ठेवता येणार नाहीत, असे समाजवादी नेते बजावू लागले. जनसंघाकडे सर्वाधिक कार्यकर्ते व केडर असल्याने भविष्यात जनता पार्टीवर जनसंघ कब्जा मिळवेल अशी भीती त्यांना वाटत होती. जनता पार्टीत जाऊन जनसंघाच्या पदरी निराशा पडल्यामुळेच जनता पार्टीतून बाहेर पडण्याचा जनसंघाला निर्णय घ्यावा लागला. दि. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनसंघाचा जन्म झाला. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले-चला पुन्हा दीप उजळू द्या. अटलजींच्या घोषणेने कार्यकर्त्यांमध्ये जोश आला. ऊर्जा निर्माण झाली. तेव्हा पक्षाकडे लाखों कार्यकर्ते होते, पण संघटन नव्हते. त्या सभेत अटलजी म्हणाले-संघ का और हमारा रिश्ता माँ बेटे का है, हम सत्ता छोडेंगे, किंतु माँ को नहीं, संघ आमचे जीवन आहे.
नवीन पक्ष बांधण्याचा श्रीगणेशा पुन्हा सुरू करावा लागणार होता. जनसंघाचा वारसा असणारे अनुशासित व समर्पित कार्यकर्ते ही पक्षाची मोठी आजही ताकद आहे. नव्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून वाजपेयींनी सूत्रे हाती घेतली व लालकृष्ण अडवाणी यांनी महासचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली. भाजपाचे पहिले अधिवेशन दि.२८ ते ३० डिसेंबर १९८० रोजी मुंबईत झाले. एप्रिल ते डिसेंबर या काळात पक्षाची २५ लाख सदस्य नोंदणी झाली. मुंबईतील अधिवेशन स्थळाला समतनगर असे नाव दिले होते. देशभरातून या अधिवेशनाला ५५ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाच्या या पहिल्या अधिवेशनात वाजपेयी आपल्या भाषणात म्हणाले, ‘जे लोक पद, अधिकार व संपत्तीसाठी हपापलेले आहेत, ज्यांच्यामध्ये साहस आणि स्वाभिमान नाही आणि जे दिल्लीच्या सत्तेपुढे नतमस्तक होतात त्यांना भाजपामध्ये स्थान नाही. आम्ही हुकूमशाही व अराजकतेविरूद्ध संघर्ष करण्यासाठी कटिबद्ध आहोत. एका हातात भारताचे संविधान आणि दुसऱ्या हातात समतेचा ध्वज घेऊन आपण संघर्ष करायला सिद्ध होऊ या. आपण छत्रपती शिवाजी महारांजांपासून प्रेरणा घेतली पाहिजे आणि सामाजिक न्यायाच्या युद्धात आपण महात्मा जोतिबा फुलेंना आदर्श मानले पाहिजे. वाजपेयींनी ३४ वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईतील पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात सांगता, कमल का फूल खिलेगा, या घोषणेने केली. ते म्हणाले,’मुंबईच्या सागर किनारी उभा राहून मी भविष्याचा वेध घेत आत्मविश्वासाने म्हणू शकतो, अंधार मावळेल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल’. अटल बिहारी वाजपेयी यांची देशाचे सर्वसमावेशक नेते, माजी पंतप्रधान, कवी, साहित्यिक, उत्तम संघटक, मुत्सद्दी व प्रभावी वक्ते, भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्व जगताला ओळख आहे.
अटलजी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावरील ते सर्वाधिक उजळणारा तारा होते. विरोधकांचा आदर करणारे होते. कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करणारा देशाचा हा उत्तुंग नेता होता. पक्षात किंवा संघ परिवारातच नव्हे, तर विरोधी पक्षातही अटलजी सर्वांना आपले वाटत असत. दुसऱ्याची भूमिका समजावून घेणे, निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणे आणि विरोधकांना बरोबर घेऊन विविध जटील प्रश्नांवर तोडगा काढणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अटलजी ९ वेळा लोकसभेवर व २ वेळा राज्यसभेवर निवडून गेले. राज्यशास्त्र व कायद्याचे ते विद्यार्थी होते. उत्तम संसदपटू होतेच पण विरोधी पक्षनेता व परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. काळाची गरज म्हणून त्यांनी १९९८ मध्ये दोन डझन राजकीय पक्षांना बरोबर घेऊन केंद्रात सरकार चालवले, त्यावेळी त्यांनी देश हिताचा व्यापक विचार करून अनेक गोष्टी सहन केल्या. पण एकमताने सरकार पडल्यानंतर कोणतीही अनैतिक राजकीय तडजोड न करता, राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सादर केला. अटलजींचे ग्वाल्हेरवर खूप प्रेम होते, त्यांची ग्वाल्हेरमध्ये सभा म्हटल्यावर अख्खे शहर सभेला लोटायचे. ग्वाल्हेरच्या एका सभेत ते म्हणाले, ग्वालियर मेरा मायका है. अटलजींच्या वक्तव्याने सारी सभा खूश झाली. मात्र आपल्या अविवाहित असण्यावर मिष्किलपणे बोलताना ते पुढे म्हणाले, लेकीन ससुराल का पता नहीं यह बात अलग है… पंडित नेहरूंच्या धोरणांना व भूमिकेला आज भाजपा कठोर विरोध करीत आहे, पण नेहरूंच्या निधनानंतर मे १९६४ मध्ये त्यांना आदरांजली अर्पण करताना वाजपेयींनी केलेले भाषण अविस्मरणीय आहे. अटलजी म्हणाले, ‘एक स्वप्न भंगले आहे. एक गाणे शांत झाले आहे. एक ज्योत अनंतात विलिन झाली आहे. हे निर्भय व संपन्न जगाचे स्वप्न होते. ती रात्रभर जळणाऱ्या दिव्याची ज्योत होती. जिने प्रत्येक अंधाराबरोबर लढाई केली. आम्हाला मार्ग दाखवला. मृत्यू निश्चित आहे. शरीर अल्पकालीन आहे. पण मृत्यू इतका चोर पावलांनी का यावा? जेव्हा मित्र झोपलेले होते आणि पहारेकरी सुस्त होते, तेव्हा आमच्या जीवनातील अमूल्य भेट हिरावून नेली’. (विशेष म्हणजे, अटलजी या देशाचे एक दिवस पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी स्वत: पंडित नेहरूंनीच केली होती.)
दि.१२ डिसेंबर २००१ मुंबईतील रेसकोर्सचे मैदान तुडुंब भरलेले होते. शरद पवारांच्या षष्ठ्याब्दीपूर्ती समारंभाला अटलजी आवर्जून उपस्थित होते. तेव्हा भाषणात ते म्हणाले, हमरा लोकतंत्र बहुदलीय है, सबके रास्ते अलग है, किंतु लक्ष् एकही होना चाहिए, राष्ट्र की सर्वांगिण उन्नती. त्याच भाषणात म्हणाले, ‘सत्ता के मोहसे वो दिन आनेवाला है की राजनैतिक नेता एक दुसरे से बात करने में कतराने लगेंगे’, इतनी कटुता बढ जायेगी. संसद अब मछली बाजार बन गयी है, अटलजी एका पत्रकार परिषदेत बोलले. खरोखरच असे बोलले का, नाही तर अशी बातमी प्रसिद्ध केल्यावर संसदेकडून हक्कभंगाची कारवाई होईल अशी भीती एका संपादकांना वाटली. बातमी लिहिणाऱ्या पत्रकाराने अटलजींना फोन केला. आपण असे म्हटले म्हणून मी देऊ शकतो ना, असे त्याने त्यांना विचारले. त्यावर अटलजींनी त्या पत्रकाराला विचारले, हमनें फिश मार्केट कहा है ना. त्यावर पत्रकार म्हणाला, येस सर, यू सेड इट, त्यावर अटलजी म्हणतात हमने कहा है, आपने सुना है, तो फिर समाचार छपवाने में दिक्कत क्या है. दुसऱ्या दिवशी सर्वत्र संसदेचा मासळी बाजार अशी मथळ्यासह बातमी प्रसिद्ध झाली. गोविंदाचार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. नंतर भाजापाचे महासचिव झाले. संघ व भाजपा यांच्यात समन्वय ठेवण्याची जबाबादारी त्यांच्यावर होती. १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात गोविंदाचार्य यांच्या नावाने वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली. वाजपेयी हे भाजपाचा एक मुखवटा आहेत, पक्षाचे खरे अध्यक्ष अडवाणी आहेत. या बातमीने वाजपेयी अस्वस्थ झाले. त्यांनी गोविंदाचार्य यांना पत्र पाठवून विचारणा केली. गोविंदाचार्य यांनी आपण वाजपेयी हे भाजपाचा मुखवटा आहेत, असे मुळीच म्हटले नाही असा खुलासा केला. ते म्हणाले, मला विचारण्यात आले की, भाजपाचे नेतृत्व कोण करील? त्यावर मी म्हटले वाजपेयी हे भाजपाचे सर्वाधिक लोकप्रिय व सर्वाधिक स्वीकारार्ह असलेला चेहरा आहेत. पक्षाने त्यांना पुढे केले तर निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळेल. पण मीडियाच्या एका वर्गाने चेहरा हा शब्द बदलून मुखवटा असे छापले, त्यामुळे आपल्या बोलण्याचा अर्थच बदलला. या खुलाशाने वाजपेयींचे समाधान झाले नाही. नंतर गोविंदाचार्यांना राजीनामा द्यावा लागला. वाजपेयी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून तीन वेळा शपथ घेतली.
१९९६ मध्ये त्यांचे सरकार केवळ तेरा दिवसांत पडले. तेव्हा भाजपाला शिवसेना व अकाली दल हे जुने मित्र वगळता कोणीच साथ दिली नाही. दुसरा कार्यकाळ १९९८ मध्ये तेरा महिने टिकला. तेव्हा केवळ एका मताने सरकार कोसळले. १९९९ मध्ये तिसऱ्यांदा वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले व पाच वर्षे चालले. वाजपेयी हे देशातले पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण करणारे बिगर काँग्रेसचे पहिले पंतप्रधान ठरले. (आता नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन केली) दि. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्टेशनवर कार सेवकांना घेऊन येणाऱ्या साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. एक हजारांवर लोकांचा मृत्यू झाला व तीन हजार जखमी झाले. तेव्हा राज्यात नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते व केंद्रात वाजपेयी पंतप्रधान होते. गोध्राची घटना व त्यानंतर भडकलेल्या दंगलीवर देशभर व संसदेत पडसाद उमटले. तेव्हा एका पत्रकाराने वाजपेयींना विचारले, दंगलीच्या मुद्द्यावर आपण मोदींना काय संदेश देणार? त्यावर वाजपेयी म्हणाले, मोदींनी राजधर्माचे पालन करायला हवे. सत्ता मे बैठे किसी व्यक्ती के लिए इसका अर्थ है की वह समाज के उंचे या नीचें या किसी भी धर्म के लोगों के साथ भेदभाव न करें. त्यावर मोदींनी उत्तर देताना म्हटले, हम भी वही कर रहे है. वाजपेयी त्यावर लगेच म्हणाले, मुझे विश्वास है, नरेंद्र भाई वही कर रहें है. पण वाजपेयींच्या राजधर्म वक्तव्याचा आधार घेऊन देशातील मीडियातून वाजपेयी व मोदी यांच्यात तणाव निर्माण झाल्याची मोहीमच सुरू झाली. मोदींनी राजधर्माचे पालन केले पाहिजे एवढेच वाजपेंयीचे वक्तव्य वारंवार मीडियातून देशापुढे मांडले गेले, पण मला विश्वास आहे की मोदी हेच करीत आहेत हे वाक्य मात्र दाखवले गेले. एक मात्र खरे की अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, अशा विविध विचारांच्या ३२ नेत्यांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार चालवले हे सर्व अद्भूत होते. कारण त्या नेत्यांचाच नव्हे, तर देशातील जनतेचा विश्वास अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वावर होता. म्हणूनच अटलजी म्हणजे, या सम हाच… अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *