यंत्रणांनी शासकीय योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री नवाब मलिक
गोंदिया, दि.26 : शासनाद्वारे विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची यंत्रणांनी सक्षमपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.
26 जून रोजी तिरोडा येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले, येणाऱ्या काही दिवसात संभाव्य कोरोना तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे आणि कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांना घातक असल्यामुळे परिपूर्ण नियोजन करुन तिरोडा तालुक्यात जास्तीत जास्त टेस्टींग वाढविण्यात यावे तसेच गावोगावी जाऊन कोविड लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यात यावी. वीज देयक प्रलंबीत असल्यामुळे ग्रामीण भागातील वीज कनेक्शन अथवा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला असेल तर अशा योजनांची 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून तातडीने भरावी. याबाबत वीज वितरण महामंडळासोबत समन्वय साधून ग्रामीण भागातील वीज कनेक्शन अथवा पाणी पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यत्रणेला दिल्या.
पालकमंत्री श्री मलिक पुढे म्हणाले, तिरोडा तालुक्यातील नदी काठावरील असलेल्या गावात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी मुबलक प्रमाणात धान्य साठा, औषध साठा साठवणूक करुन ठेवावे. जी कामे सुरु आहेत ती कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावी. कोविड-19 च्या अनुषंगाने ऑक्सीजनची पाईप लाईन करुन घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तिरोडा तालुक्यातील कोविड-19 पॉझिटिव्ह केसेस, टेस्टींग, कोविडमुळे मृत्यू, व्हॅक्सीनेशन, शिवभोजन केंद्र, मोफत धान्य पुरवठा, धानाची भरडाई, तालुक्यातील गुन्हेगारीचे प्रमाण, विशेष सहाय्य योजना, गृहभेट आपुलकीची मोहिम, सात-बारा संगणकीकरण, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, धान खरेदी केंद्र, खरीप हंगाम, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, अपूर्ण कामे, सेल्फवरील कामे, पालकमंत्री शेत पांदन रस्ते योजना, ई-मस्टर, मनुष्य दिवस/साध्य, नैसर्गीक आपत्ती पुर्वतयारी, खरीप हंगाम बियाणे मागणी व वापर, खरीप हंगाम करीता रासायनिक खताची मागणी व मंजूर आवंटन मे.टन, ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरीता 5 ब्रास रेती वितरण, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील वस्तीचा विकास करणे योजना, लसीकरण मोहीम, नगरपरिषदेमार्फत स्वच्छता, धापेवाडा उपसा सिंचना योजना टप्पा-1 व टप्पा-2 ची सद्यस्थिती आदी कामांबाबत यावेळी पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.
तिरोडा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 76 हजार 254 आहे. तालुक्याचा भौगोलिक क्षेत्रफळ 48194.94 हे.आर. असून तिरोडा तालुक्यात चक्रधर स्वामी देवस्थान, सुकडी, चोरखमारा तलाव, बोदलकसा तलाव, अदानी पॉवर प्लान्ट, गुमाधावडा, उपसासिंचन कवलेवाडा इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. तालुक्यात 95 ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात 29 ऑक्सीजन बेड आहेत. नॉन ऑक्सीजन बेड 22 आहेत. 5 व्हेंटीलेटर आहेत. जंबो सिलेंडर 63 आहेत. बी.पाईप सिलेंडर 27 आहेत. बाय पॅप मशीन 2 आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलासांठी 5 बेडचे पेडियाट्रीक वार्ड तयार करण्यात आले आहे. बी.एम.केअर फंडातून 200 लिटर पर मिनिट ऑक्सीजन क्षमतेचा ऑक्सीजन प्लान्ट तयार करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सीजनची समस्या दूर होणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उपजिल्हा रुग्णालय सज्ज आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, पोलीस शिपाई इरफान शेख, पोलीस पाटील अरविंद चौरे, अंगणवाडी सेविका मिनाक्षी पटले, सफाई कामगार मनोज लारोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहित हरिणखेडे व डॉ.तुलसी भगत, आरोग्य सेविका श्वेता गाढवे यांचा कोराना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. तर जिया पटले, माही कावळे, हीर बिसने, आवी पटले, सानवी बिसेन, उर्वि डोंगरे, नवश्री टेंभरे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते माझी कन्या भाग्यश्री योजनेचे प्रशस्तीपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमास तहसिलदार प्रशांत घोरुडे, नायब तहसिलदार राजेंद्र वाकचौरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हिंमत मेश्राम, गट विकास अधिकारी सुनिल लिल्हारे, तालुका आरोग्य अधिकारी शितल मोहने, तालुका कृषि अधिकारी के.एन.मोहाडीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी केले. संचालन करुन उपस्थितांचे आभार अनुपकुमार भावे यांनी मानले.