मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे – वनमंत्री सुधीर मुनंगटीवार तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
चंद्रपुरातून जागतिक स्तरावर व्याघ्र संरक्षणाचा संदेश
चंद्रपूर, दि. २: ‘वाघ तिथे वन आहे….वन तिथे जल आहे….जल तिथे मानवसृष्टी आहे.’ पर्यावरणाच्या जीवनचक्राचा महत्वाचा घटक असलेला वाघ वाचला तरच जंगल आणि जीवनसृष्टी वाचेल. त्यामुळे मानवी जीवन आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी आपण सर्व जण एकत्र येऊन वाघ वाचविण्याचा संकल्प करूया, असा संदेश वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
महाराष्ट्र शासन आणि वन विभागाच्यावतीने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.
देश-विदेशातील पर्यटकांमध्ये सर्वांत लोकप्रिय असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ताडोबा महोत्सव’ शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. सर्वांना संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेत आम्ही केवळ आमच्या मौल्यवान जैवविविधतेचे रक्षणच करीत नाही तर स्थानिकांसाठी आर्थिक प्रगतीच्या संधीही निर्माण करतो. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय शोकेसमध्ये नेण्याचा हा प्रयत्न आहे.
पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सिंगापूरच्या धर्तीवर आता चंद्रपुरात सफारी सुरू करण्यात येईल. यात न्युझीलंड, ऑस्ट्रेलियाचे प्राणी बघायला मिळतील. विशेष म्हणजे सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. ताडोबा हे जगातील सर्वांत उत्तम व्हावे, असा प्रयत्न आहे. गत काळात वृक्षलागवडीतून राज्यात 2 हजार 550 चौरस किलोमीटर हरीत आच्छादन वाढले आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. ताडोबा महोत्सवात तीन दिवस विविध महत्वाच्या विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे, नागरिकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
तत्पूर्वी दीप प्रज्वलन आणि आदिवासी नृत्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी बल्लारपूर येथील जयशिवराय ग्रुपने वाघनृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी ताडोबा प्रकल्पाविषयी तसेच या आयोजनामागची भूमिका विशद केली.
०००
वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा – रविना टंडन
वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारले स्वप्न
जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन
चंद्रपूर, दि.२- वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे. राष्ट्रीय संपदा, माणसं आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड चालली आहे, त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व, वनविभागातील कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि जंगलातील गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे साकार होऊ शकले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व वन्यजीव सद्भावना दूत रविना टंडन यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदि मान्यवरांची उपस्थिती होती .
या प्रसंगी बोलताना रविना टंडन भावूक झाल्या. ‘माझं ताडोबाशी फार जवळचं आणि भावनिक असं नातं आहे. मी अनेकदा इथे येते. ताडोबाच्या जंगलातील वाघ आणि त्यांचे परिवार ओळखता यावेत इतकी भटकंती मी ताडोबात केली आहे. ताडोबा हे प्रेमाचं जंगल आहे. इथे आलं की माणूस या जंगलाच्या मोहात पडतो,’ अशा भावना व्यक्त करतानाच, पर्यावरण, जंगल आणि वाघांच्या संवर्धनासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आपल्या भाषणात रविना टंडन यांनी वनसंवर्धनाचं काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांपासून तर जिप्सी चालक, गाईड आणि गावकरी सर्वांना श्रेय बहाल करत, असंच काम करत राहण्याचं आवाहन केलं. एखाद्या वाघिणीने पिलाला जन्म दिल्याची बातमी जशी आनंद देऊन जाते, तसेच एखाद्या वाघाच्या मृत्यूची घटना तेवढीच वेदनादायी असते. पण एक मात्र खरं आहे की ताडोबाच्या जंगलाची जादू जगात कुठेही बघायला मिळत नाही. म्हणूनच या टायगर कॅपिटलची महती मी जगाला सांगणार आहे. जगाच्या पाठीवर जिथे जाईल तिथे ताडोबाचा झेंडा फडकावणार असल्याची ग्वाही देखील रविना टंडन यांनी यावेळी दिली.
०००
चंद्रपूरच्या ‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहायचा योग – ज्युलिया मॉर्ले
तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन
चंद्रपूर, दि. २ : ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या. चंद्रपुरातील व्याघ्र संवर्धनाचा मूलमंत्र आपापल्या देशात घेऊन जाण्याचा निर्धार करीत पुन्हा एकदा ताडोबाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकारातून तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन्यजीव सद्भावना दूत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रविना टंडन, विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.
ज्युलिया मॉर्ले म्हणाल्या, ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अतिशय सुदंर वाघ आहेत. वाघांना वाचविले तरच आपण आपले पर्यावरण आणि सृष्टीचे भविष्य सुरक्षित करू शकतो.’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमंत्रित केल्याबद्दल मॉर्ले यांनी आभार मानले. जमील अजमल सैद्दी म्हणाले, ‘वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहण्याचे सौभाग्य लाभले. ताडोबा एक वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन हेच जीवन आहे, असे मानून आपले भविष्य सुरक्षित करा.’
2015 मधील ‘मिस इंडीया’ नवीनी देशमुख म्हणाल्या, ‘वाघ हे दुर्गामातेचे वाहन आहे. वाघ धैर्याचे प्रतिक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाले म्हणून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.’ विश्वसुंदरी स्पर्धेतील कॅरोलिना व्हेरिस्का म्हणाल्या, ‘वाघांचे संरक्षण या प्रकल्पाबद्दल ऐकून खूप आनंद झाला. येथे कुटुंबासह वाघ बघण्याचा योग आला. वाघ हा सृष्टीच्या जीवनचक्राचा महत्वाचा भाग आहे. सन 2021 आणि 2022 मधील मिस इंडिया सिनी शेट्टी म्हणाल्या, चंद्रपुरात येऊन आज अतिशय आनंद झाला. वाघांचे संरक्षण या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.’
ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टिन लाइज यांनी ‘सेव्ह द टायगर प्रोजेक्ट’ ही अतिशय महत्वाची आणि तेवढीच सुंदर संकल्पना असल्याचे म्हटले. इंग्लडच्या जेसिका म्हणाल्या, ‘येथे येऊन स्वत:ला भाग्यशाली समजत आहे. या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनू शकलो, याचा आनंद आहे. स्पेनच्या पोला म्हणाल्या, वाघ हे धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे. जैवविविधतेसाठी वाघ महत्वाचा घटक असून अशा उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण होईल.’
पटनायक यांचा सॅण्ड आर्ट शो :
प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक आणि त्यांच्या चमूने सॅण्ड आर्ट शो मधून ‘वाघ वाचवा’ असा संदेश दिला. यावेळी त्यांनी वाळूचे अतिशय उत्कृष्ट शिल्प साकारले. उपस्थितांनीही त्यांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुस्तकांचे प्रकाशन :
वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जैवविविधता मॅप ऑफ ताडोबा कॉफी टेबल बुक, ताडोबा डायरीज, प्रमुख गवत प्रजाती, सी.एस.आर. बुकलेट, ट्रिज ऑफ मेळघाट, महाराष्ट्रातील वने आणि वनवार्ता या न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले.
०००