मातृभाषेतून ज्ञानाची होणारी उकल अधिक सुलभ आणि महत्वाची – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यपालांनी साधला विभाग प्रमुखांशी संवाद
Summary
नांदेड (जिमाका) दि. 5 :- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्त्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत असलेले शिक्षणाचे प्रवेशद्वार मातृभाषेतून उपलब्ध केल्यास प्रत्येक विषयातील होणारी सहज उकल विद्यार्थ्यांसाठी अधिक सहाय्यभूत ठरेल. यात मातृभाषेच्या […]
नांदेड (जिमाका) दि. 5 :- बदलत्या काळानुरुप ज्ञानशाखा, विषय बदलत चालले आहेत. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचेही महत्त्व वाढले आहे. अभियांत्रिकी, वैज्ञानिक व इतर क्षेत्राशी निगडीत असलेले शिक्षणाचे प्रवेशद्वार मातृभाषेतून उपलब्ध केल्यास प्रत्येक विषयातील होणारी सहज उकल विद्यार्थ्यांसाठी अधिक सहाय्यभूत ठरेल. यात मातृभाषेच्या अभिमानासमवेत शिक्षणाचा होणारा विस्तार आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणारा आत्मविश्वास लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांची उपस्थिती होती.
देशातील काही राज्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण आपआपल्या मातृभाषेतून सुरु केले आहे. यात महाराष्ट्राचाही सहभाग आहे. शिक्षणाच्या दृष्टीने काळानुरुप होणारे बदल हे विद्यापीठाने अंगिकारून विद्यार्थ्यांना तात्काळ तशा सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला पाहिजे. व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची अधिक जोड असेल तर स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना त्याची अधिक मदत होईल या दृष्टीकोनातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सुरु केलेल्या अभ्यासक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मराठवाडा ही संतांची भूमी आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजी, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या योगदानातून ही भूमी पुनित झाली आहे. या भूमीत येऊन या संतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासमवेत येथील नवनवीन प्रयोगाची पाहणी करता यावी, येथे जे काही चांगले आहे ते इतरत्र सांगता यावे या भूमिकेतून मला येथे उपस्थित राहताना आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. यात प्रामुख्याने जैवविविधता, जलपुनर्भरण, आरटीपीसीआर लॅब, क्रीडाक्षेत्र व उपक्रम याविषयी सादरीकरण केले.
विद्यापीठातील प्राध्यापक व विभाग प्रमुखांशीही राज्यपालांनी संवाद साधला व अडचणी जाणून घेतल्या. डॉ. राजाराम माने, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. घनश्याम यळणे, डॉ. गजानन झोरे, डॉ. सिंकू कुमार सिंह, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हासबे आदींनी राज्यपालांशी चर्चेत सहभाग घेतला. यानंतर राज्यपालांनी विद्यापीठातील परिसराला भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. प्रारंभी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासमवेत जिल्ह्यातील विकासकामांबाबत चर्चा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी आभार मानले.