मराठी भाषा भवनात अभिजात मराठी दालनासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची तज्ज्ञांसोबत चर्चा
मुंबई, दि. 27 : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या मराठी भाषा भवनमध्ये अभिजात मराठी भाषा दालनाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. हरी नरके, मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी व मराठी भाषा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मराठी भाषा मंत्री श्री. देसाई म्हणाले की, मराठी भाषा भवनामध्ये अभिजात मराठीचा परिचय करून देणारे स्वतंत्र असे दालन तयार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. या दालनातून देश-विदेशांतील लोकांना मराठी भाषेची महती व ऐश्वर्य कळेल, अशा स्वरुपाचे साहित्य या ठिकाणी ठेवले जाईल. अभिजात मराठीची महती सांगणारे सर्व साहित्य व पुरावे या दालनात ठेवले जाईल. या निमित्ताने मराठी माणसांच्या मनामध्ये मराठीविषयी विश्वास निर्माण केला जाईल.
यावेळी प्रा. डॉ. हरी नरके यांनी काही सूचना केल्या. २२५० वर्षांपूर्वी तमिळ संगम ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आलेला आहे. १२८५ मध्ये कन्नड विद्यापीठात मराठी भाषा शिकवली जात असल्याचे पुरावे आहेत. तामिळनाडूत काम करणारे कारागिर मराठी भाषेतून संवाद साधत असल्याचेही पुरावे आहेत, ही सर्व माहिती दालनात समाविष्ट करण्यात यावी. याशिवाय भंडारकर प्राच्यविद्या संस्थेकडे ८५ दुर्मिळ ग्रंथ असून त्याचाही या दालनात समावेश करण्याची सूचना करण्यात आली. मराठीच्या ५२ बोलीभाषा असून त्याचाही या दालनात समावेश करण्यात यावा. इतर भाषांनी देखील मराठीसाठी खूप मोठे योगदान दिले आहे, त्याचा देखील या दालनात समावेश करावा अशा सूचना प्रा. नरके यांनी केल्या.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, ११ वी १२ वीच्या अभ्यासक्रमात प्राकृत समावेश करण्याची गरज आहे. मराठी भाषेच्या विकासातील विविध टप्प्यांचा या दालनात समावेश करावा, यासोबत महानुभाव व्याख्यान पद्धतीचाही यात समावेश करण्यात यावा.
श्री.श्रीधर दीक्षित म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या दालनात सर्व संतांच्या कार्यकालाचा कालसुसंगत समावेश असावा. राजभाषा, ज्ञानभाषा, लोकभाषा अशी क्रमाने मराठीची ओळख करून द्यावी. सर्व भाषाविषयक साहित्य एका दालनात उपलब्ध करून द्यावे. भाषाविषयक सर्व पुरावे, साहित्य या दालनात असावे. महाराष्ट्र विश्वरूप दर्शन या ठिकाणी घडावे. भाषेची सर्व रुपे, बोली, महानुभाव लिपीची तीन पातळीवर मांडणी व्हावी. मराठीसह इंग्रजी व हिंदी भाषेत सूचनांचा दालनात समावेश असावा.