मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
Summary
छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला […]
छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले.
मतदान केंद्रांवर द्यावयाच्या सुविधांबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांसमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच अन्य विभागप्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.
मतदान केंद्रांवर उपलब्ध करावयाच्या पाळणाघरांमध्ये बालकांसाठी आहाराची सोय, पाणी, खेळणी यांच्या उपलब्धतेसह अंगणवाडी सेविका, सहाय्यक इ. यांनी उपस्थिती आवश्यक आहे. ही सगळी तयारी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि.१२ रोजी सायंकाळपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. त्याचा आढावा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी घेऊन तसा अहवाल जिल्हास्तरावर द्यावयाचा आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक पाळणाघरावर बालकांना द्यावयाचे पाणी तसेच अन्य आहार विषयक सुविधा उपलब्ध ठेवण्याविषयीही सुचना देण्यात आल्या. पाळणा घरातील तसेच मतदान केंद्रावरील अन्य सुविधांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले स्वतःचे मतदानही करावयाचे आहे. त्यादृष्टीने त्यांना एक अन्य सहकारी ही बदलीसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.
०००००