मंथन. स्टेटलाइन. डॉ. सुकृत खांडेकर. ओबीसींना आरक्षण देणारा पहिला नेता
सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे दिवंगत समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले. साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी किंवा उल्लेखनीय राष्ट्रसेवा केलेल्या व्यक्तीला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो.
बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व इतर मागासवर्गीय (ओबीसी) राजकारणाचे एकेकाळी सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कर्पूरी ठाकूर यांना सरकारने मरणोत्तर भारतरत्न हा सन्मान दिला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रभवनातून ही घोषणा केली गेली. बिहारच्या राजकारणात आणि ओबीसी समाजात कर्पूरी ठाकूर हे पहिले बिगर काँगेसी असे नेता होते की, ते डिसेंबर १९७० ते जून १९७१ आणि डिसेंबर १९७७ ते एप्रिल १९७९ या काळात बिहारचे मुख्यमंत्री होते. दि. १७ फेब्रुवारी १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. कर्पूरी ठाकूर यांच्या अगोदर सन २०१९ मध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते.
कर्पूरी ठाकूर शाळेत असताना त्या काळातील मॅट्रिकमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या गावातील पाच मुले मॅट्रिक उत्तीर्ण झाली होती. कर्पूरींचे वडील व्यवसायाने नाभिक होते. ते गावातील एका श्रीमंताकडे त्यांना घेऊन गेले व आपला मुलगा मॅट्रिक प्रथम श्रेणीत पास झाल्याचे सांगितले. तेव्हा त्या श्रीमंताने टेबलावर पाय ठेवला व म्हणाला – “तू प्रथम श्रेणीत मॅट्रिक झालास का, माझे पाय दाब…” हाच किस्सा कर्पूरी ठाकूर यांनी मुख्यमंत्री असताना बिहारचे त्यावेळी मुख्य सचिव असलेल्या यशवंत सिन्हा यांना सांगितला होता…
कर्पूरी विद्यार्थीदशेपासूनच चळवळीत सक्रिय होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समस्तीपूरच्या कृष्णा टॉकीजमध्ये सभा झाली. त्यात कर्पूरी यांना बोलायची संधी मिळाली. ते म्हणाले – “आपल्या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे की, ब्रिटिश राजवटीवर थुंकले तरी ती वाहून जाईल…” या भाषणाबद्दल त्यांना एक दिवस कारावास व ५० रुपये दंडाची शिक्षा झाली होती.
दि. ९ ऑगस्ट १९४२ रोजी, दरभंगा येथे विद्यार्थ्यांची सभा झाली. त्यात कर्पूरी यांनी क्रांतिकारी भाषण केले. त्याचा परिणाम अनेक इमारतींवर व सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकू लागला. नंतर रेल्वेचे रूळ उखडण्याचे आंदोलनही इतरत्र पसरले. पोलीस त्यांचा शोध करू लागले, तेव्हा ते नेपाळमध्ये जाऊन भूमिगत आंदोलनात सहभागी झाले. बंदूक चालवणे, बॉम्ब बनवणे, यांचेही त्यांनी तेथे प्रशिक्षण घेतले. “हमे बदला नहीं, बदलाव चाहिए, हमें युद्ध की कला नहीं, क्रांती का विज्ञान सीखना है”, ही जयप्रकाश नारायण यांची शिकवणूक कर्पूरी ठाकूर यांनी नेहमीच आचरणात आणली.
कर्पूरी यांनी समस्तीपूरमधील एका शाळेतूनच स्वातंत्र्यांची चळवळ चालवली होती. रात्री २ वाजता पोलिसांनी शाळेला वेढा घातला व कर्पूरी यांना अटक केली. त्यावेळी त्यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. कर्पूरी यांनी तुरुंगातूनही आंदोलन चालूच ठेवले. तेथे अन्य कैद्यांना संघटित करून तुरुंगातच धरणे आंदोलन सुरू केले. इंग्रज सरकारने त्यांना नंतर भागलपूरच्या तुरुंगात हलवले. पण तिथे त्यांनी उपोषण सुरू केले.
कर्पूरी ठाकूर हे काँग्रेस समाजवादी पक्षाचे सदस्य होते. “कमानेवाला खाएगा, लुटनेवाला जाएगा, नया जमाना आएगा”, अशा घोषणा तेव्हा दिल्या जात असत. तेव्हा हिंद किसान पंचायतीचे ते काम करीत असत. बिहारमध्ये ही संघटना लोकप्रिय होती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बिहारमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीतच कर्पूरी ठाकूर आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसचा पराभव केला. सोशॅलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून समस्तीपूरमधील ताजपूर मतदारसंघातून ते लढले. सायकलवर फिरून आणि पायी चालून त्यांनी प्रचार केला. तेव्हापासून १९८८ पर्यंत ते बिहारच्या राजकारणात केंद्रस्थानी होते.
बिहारमध्ये कर्पूरी ठाकूर हे जननायक म्हणून ओळखले जात असत. आमदार झाल्यावर ते एका शिष्टमंडळाबरोबर ऑस्ट्रियाला गेले. तेथून युगोस्लाव्हियाला गेले. तेथे मार्शल टिटो यांनी त्यांच्या अंगावरचा फाटलेला कोट बघितला. त्यांनी कर्पूरी यांना नवा कोट भेट दिला.
कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी आपला मुलगा रामनाथ याला पत्र लिहिले, त्यात लिहिले, “तुम इससे प्रभावित नहीं होना, कोई लोभ लालच देगा, तो उस लोभ में मत आना,
मेरी बदनामी होगी…”
माजी पंतप्रधान चरणसिंह हे एकदा कर्पूरी ठाकूर यांच्या घरी गेले. घराचा दरवाजा लहान होता, चरणसिंह यांच्या डोक्याला जखम झाली. चरणसिंह त्यांना म्हणाले, “कर्पूरी, जरा घराचा दरवाजा उंच करून घे…” त्यावर कर्पूरी म्हणाले, “जोवर बिहारच्या गरिबांना घर मिळत नाही, तोवर माझे घर उभारून काय होणार?”
१९६७ मध्ये कर्पूरी उपमुख्यमंत्री असताना शिक्षण खाते त्यांच्याकडे होते. त्यांनी शाळांमधील इंग्रजी विषयाची सक्ती काढून टाकली. त्या निर्णयावर टीकाही झाली. परीक्षेच्या निकालात इंग्रजीत नापास, पण मॅट्रिक पास असे विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले. अशा विद्यार्थ्यांना
कर्पूरी डिव्हिजनमधून उत्तीर्ण झाले, असे लोक म्हणू लागले.
१९७० मध्ये कर्पूरी ठाकूर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांचे सरकार १६३ दिवस चालले. १९७७ मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, तेव्हा एससी-एसटी व्यतिरिक्त
ओबीसींना आरक्षण देणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले.
दि. १२ जुलै २०२२ रोजी बिहार विधानसभा भवनाला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजद नेता तेजस्वी यादव यांनी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. गेली काही वर्षे जनता दल युनायटेड कर्पूरी ठाकूर यांची जयंती उत्साहाने साजरी करीत आहे. या वर्षी पाटण्यातील मिलर हायस्कूलचे मैदान कर्पूरी ठाकूर जयंती कार्यक्रमासाठी भाजपाने अगाऊ नोंदवले होते. पण ऐनवेळी ते मैदान जनता दल युनायटेड पक्षाला दिले गेले, असा आरोप बिहार प्रदेश भाजपाने केला आहे.
गेल्या वर्षी २०२३ मध्ये बिहार सरकारने केलेल्या जातीगणना पाहणीत राज्यात अतिमागास वर्गीय (इबीसी) ३६.०२ टक्के आहे. इतर मागासवर्गीय २७.१३ टक्के, तर अनुसूचित (एससी) १९.६६ टक्के लोकसंख्या आहे. कर्पूरी ठाकूर हे ईबीसी वर्गातील होते.
कर्पूरी ठाकूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर साधे घरही नव्हते. अंगावर सफेद कुर्ता व धोतर. साधी राहणी व समाजवादी विचारसरणी ही त्यांची जीवनपद्धती होती. भाजपा आणि कर्पूरी ठाकूर यांची विचारसरणी भिन्न आहे हे सर्वश्रूत आहे. त्यामुळेच मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान दिल्याने सर्वच राजकीय पक्ष आश्चर्यचकित झाले आहेत.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in