भोलेबाबा नामानिराळा… इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबाच्या सत्संगसाठी जमलेल्या तीन लाख भक्तांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जण मृत्युमुखी पडले व एकमेकांच्या अंगावर पडून आणि श्वास गुदमरून ३१ जखमी झाले. २ जुलै रोजी झालेल्या घटनेनंतर पुढे आठवडाभर एकाच प्रश्नाची चर्चा होती की, भोलेबाबाचे नाव एफआयआरमध्ये का नाही? पोलिसांनी भोलेबाबाला अटक का केली नाही? भोलेबाबाला देवाचा अवतार मानणारे उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्लीमध्ये लक्षावधी अनुयायी आहेत, त्यांच्या भव्य व आलिशान आश्रमांची सर्वत्र मालिकाच वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मग परमेश्वराचा अवतार असलेल्या भोलेबाबाला अटक कशी होणार, हा प्रश्न लाखमोलाचा आहे. एवढेच नव्हे तर सत्संग झाल्यावर घडलेल्या मृत्यूकांडावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली, मृतांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वत: गेले, मृतांच्या परिजनांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून मागणी झाली, सारे राजकीय पक्ष भोलेबाबाच्या लक्षावधी अनुयायांकडे व्होट बँक म्हणून बघत असल्याचे जाणवले, म्हणूनच भोलेबाबाला खलनायक ठरवायला कोणी धजावत नाही. केंद्रात व उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. योगी आदित्यनाथसारखे दिग्गज व कडवट हिंदू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तरीही उत्तर प्रदेशचे पोलीस भोलेबाबाच्या बाबतीत गुळमुळीत भूमिका का मांडत आहेत? गरज पडली तर त्यांची चौकशी करू असे सांगून वरिष्ठ पोलीस अधिकारी वेळ मारून नेत आहेत.
देशभर बाबा, बुवा आणि महाराज यांची प्रवचने, सत्संग, असे कार्यक्रम सर्वत्र चालू असतात. हजारो- लाखो लोक अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. मन:शांतीसाठी किंवा श्रद्धा म्हणून हे भक्तगण बाबा- बुवांच्या कार्यक्रमाला जात असतात. पण त्यांची काळजी घेणे हे आयोजकांचे कामच आहे. त्यांची आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, मोकळी हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा व्यवस्था या किमान गोष्टी हव्यातच. कार्यक्रम कोणताही असो किंवा सत्संग. त्यासाठी गर्दी जमविणे, लोकांना नेण्या-आणण्यासाठी वाहन व्यवस्था, देणग्या जमविणे, त्याचा हिशेब ठेवणे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेटेस उभारणे, भाविकांसाठी मंडप व्यवस्था करणे, वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, वीज पुरवठा, जनरेटर्स, स्वच्छता हे सर्व काम आयोजन समिती व सत्संग समितीने करायचे आहे. हाथरसला भोलेबाबाच्या मागे धावण्यासाठी व त्यांना चरणस्पर्श करण्यासाठी हजारो भाविक एकाच वेळी धावत सुटले तेव्हा अनेकांचा तोल गेला, मोठी चेंगराचेंगरी झाली, एकमेकांच्या अंगावरून भाविक धावले, लहान मुले चिरडली गेली, भक्त महिलांना तुडवत लोक धावत होते, अशा बेशिस्त व बेलगाम गर्दीला आवरणारी कोणतीही यंत्रणा तिथे नव्हती. तासभर तिथे गोंधळच गोंधळ होता. लक्षावधी भक्तांना वाऱ्यावर सोडून भोलेबाबा त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून वाहनांचा ताफा घेऊन निघून गेले.
ज्या मैदानावर भोलेबाबाचा सत्संग योजला होता, तेथे ८० हजार जणांची बसण्याची व्यवस्था होऊ शकते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगीही घेतली होती. मग तिथे तीन लाखांवर भाविक आले, याचा अगोदर अंदाज कुणालाच कसा आला नाही? क्षमतेपेक्षा अडीच पट गर्दी झाली, तेव्हाच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवे होते. तेथे पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी होती आणि भोलेबाबाच्या सेवेकऱ्यांनी या तीन लाख भक्तांना सत्संग संपल्यावर मोकळे सोडले. उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी तर हाथरसमधील मृत्यूकांडानंतर पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये पहिले नाव भोलेबाबाचे नोंदवायला हवे होते, असे म्हटले आहे. आयोजन समिती ही भोलेबाबाची, सत्संग समिती ही भोलेबाबाची, सेवेकरी हे सुद्धा भोलेबाबाचे. मग १२१ भाविकांच्या मृत्यूनंतर भोलेबाबा नामानिराळा कसा राहू शकतो? भोलेबाबाला अटक होऊ नये यासाठी राजकीय दबाब आहे का? योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात बेकायदा बांधकामांवर व अतिक्रमणांवर बिनधास्त बुलडोझर फिरवले जात असताना, १२१ भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यावरही कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्तीबद्दल पोलीस व प्रशासन काहीच बोलणार नसेल तर हे गूढ म्हणायचे की आणखी काही? भोलेबाबाचे जिथे जिथे सत्संग झाले तिथे किमान एक लाखांवर भाविक जमतात, हा आजवरचा अनुभव आहे. हाथरसमधील सत्संगला तीन लाख लोक येतील हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला कळाले नव्हते का? एवढ्या मोठ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर्स किंवा सीसीटीव्ही का नव्हते? असतील तर त्यांचे फुटेज काय दाखवते? हे सर्व न्यायालयीन चौकशीत पुढे यायला हवे. आजवर पोलिसांनी कुंभ, अर्ध कुंभ, निवडणुकांच्या सभा, मिरवणुका, रोड शो, मोर्चे, आंदोलने, कावड यात्रा, व्हीआयपी ड्युटी आपल्या कामाचा भाग म्हणून अनेक वेळा हाताळले असतीलच. मग भोलेबाबाच्या सत्संगाला एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना नियंत्रणाखाली का ठेवता आले नाही?
हाथरसमध्ये सत्संग आयोजित करणाऱ्या समितीचा प्रमुख व एफआयआरमध्ये नोंदवलेला मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला पोलिसांनी अटक केली आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे इनाम जाहीर केले होते. तो स्वत: पोलिसांपुढे शरण आला. भोलेबाबाच्या कार्यक्रमासाठी तो देणग्या गोळा करण्याचे काम करीत होता. भोलेबाबाचे कोणत्या राजकीय पक्षाशी व कोणत्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत, याची चौकशी चालू आहे. एका सत्संगमध्ये अखिलेश यादवबरोबरचे भोलाबाबाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. भोलेबाबाच्या बँक खात्यांची व मुदत ठेवींची चौकशी चालू आहे. हाथरसमध्ये ज्यांनी अराजक घडविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी दिला आहे. चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूकांडाची न्यायालयीन चौकशी करण्याचाही त्यांनी आदेश दिला असून समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हाथरस येथे फुलारी मुगल गढी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९१ लगतच्या मैदानावर बाबाचा सत्संग आयोजित केला होता. तेथून जिल्हा रुग्णालय ४० किमी अंतरावर आहे. सत्संगसाठी सकाळी ७ वाजल्यापासून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. स्वत: भोलेबाबा दुपारी १२.३० नंतर आला व १.४५ वाजता परत निघाला. त्याच्या निघालेल्या मोटारीच्या टायरखालील माती स्पर्श करून कपाळाला लावावी किंवा प्रसाद म्हणून घ्यावी यासाठी हजारो भाविक त्याच्या मोटारी मागे धावत होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये आग्रा, मथुरा, पिलभित, कासगंज, अलिगड येथील बाबाचे अनुयायी असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी प्रयागराज कुंभ मेळ्यात ४० भाविकांचा मृत्यू झाला होता. रतनगडच्या नवरात्री उत्सवात ११५ जणांचा मृत्यू झाला होता. भाजपा नेते लालजी टंडन यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना झालेल्या साड्या वाटप कार्यक्रमात २१ महिलांचा मृत्यू झाला होता. आयोजक पोलिसांची कार्यक्रमासाठी परवानगी घेतात, पण गर्दीचे नियोजन, भाविकांची व्यवस्था व सुरक्षा याकडे लक्ष दिले जात नाही. हाथरसमध्ये तीन लाखांवर भविकांनी गर्दी केली होती, पण तेथे पोलिसांची संख्या केवळ ४० ते ५० होती, हे जर खरे असेल तर पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही, असे म्हणावे लागेल.
५८ वर्षांचा भोलेबाबा हा दलित परिवारातून आलेला आहे. त्याचे नाव सुरजपाल सिंह जाटव. कासगंज जिल्हा. पटियाली, बहादूरपूर गावचा निवासी. १९९७ मध्ये पोलीस दलात नोकरी सुरू केली. लैंगिक शोषण केल्याच्या त्याच्याविरोधात तक्रारी आल्याने त्याचे निलंबन झाले होते. त्याच्यावर एफआयआर नोंदवला गेला होता. त्याने कोर्टापुढे माफी मागितल्याने त्याला पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात आले. दहा वर्षे पोलीस सेवेत काढली. १८ पोलीस ठाण्यात व स्थानिक गुप्तचर विभागात त्याने नोकरी केली. नंतर त्याने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली व अध्यात्माकडे वळला. निवृत्तीनंतर सत्संग सुरू केला. आपल्या कामाचा व कार्यक्रमाचा प्रचार व्हावा यासाठी त्याने पगारी एजंट नेमले. बाबाच्या चमत्काराविषयी एजंट लोक लोकांना गोष्टी सांगायचे व बाबाकडे आकर्षित करायचे. बाबाच्या हातात चक्र आहे, बाबाच्या हाती त्रिशूळ आहे, असे ते पसरवत असत. बाजूच्या राज्यात जाऊन बाबाचे महात्म्य ते लोकांना सांगत असत. भोलेबाबाच्या सत्संगाला गर्दी वाढविण्याचे काम एजंट करीत असत. भोलेबाबाचे २४ आश्रम आहेत, ५० महागड्या गाड्यांचा ताफा आहे, जवळपास शंभर कोटींची मालमत्ता आहे. १२१ भाविकांच्या मृत्यूकांडानंतरही भोलेबाबा नामानिराळा आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.inउत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबाच्या सत्संगसाठी जमलेल्या तीन लाख भक्तांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जण मृत्युमुखी पडले व एकमेकांच्या अंगावर पडून आणि श्वास गुदमरून ३१ जखमी झाले. २ जुलै रोजी झालेल्या घटनेनंतर पुढे आठवडाभर एकाच प्रश्नाची चर्चा होती की, भोलेबाबाचे नाव एफआयआरमध्ये का नाही? पोलिसांनी भोलेबाबाला अटक का केली नाही? भोलेबाबाला देवाचा अवतार मानणारे उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्लीमध्ये लक्षावधी अनुयायी आहेत, त्यांच्या भव्य व आलिशान आश्रमांची सर्वत्र मालिकाच वेगवेगळ्या ठिकाणी आहे. मग परमेश्वराचा अवतार असलेल्या भोलेबाबाला अटक कशी होणार, हा प्रश्न लाखमोलाचा आहे. एवढेच नव्हे तर सत्संग झाल्यावर घडलेल्या मृत्यूकांडावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली, मृतांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्वत: गेले, मृतांच्या परिजनांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून मागणी झाली, सारे राजकीय पक्ष भोलेबाबाच्या लक्षावधी अनुयायांकडे व्होट बँक म्हणून बघत असल्याचे जाणवले, म्हणूनच भोलेबाबाला खलनायक ठरवायला कोणी धजावत नाही. केंद्रात व उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. योगी आदित्यनाथसारखे दिग्गज व कडवट हिंदू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तरीही उत्तर प्रदेशचे पोलीस भोलेबाबाच्या बाबतीत गुळमुळीत भूमिका का मांडत आहेत? गरज पडली तर त्यांची चौकशी करू असे सांगून वरिष्ठ पोलीस अधिकारी वेळ मारून नेत आहेत.
देशभर बाबा, बुवा आणि महाराज यांची प्रवचने, सत्संग, असे कार्यक्रम सर्वत्र चालू असतात. हजारो- लाखो लोक अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. मन:शांतीसाठी किंवा श्रद्धा म्हणून हे भक्तगण बाबा- बुवांच्या कार्यक्रमाला जात असतात. पण त्यांची काळजी घेणे हे आयोजकांचे कामच आहे. त्यांची आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, मोकळी हवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा व्यवस्था या किमान गोष्टी हव्यातच. कार्यक्रम कोणताही असो किंवा सत्संग. त्यासाठी गर्दी जमविणे, लोकांना नेण्या-आणण्यासाठी वाहन व्यवस्था, देणग्या जमविणे, त्याचा हिशेब ठेवणे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेटेस उभारणे, भाविकांसाठी मंडप व्यवस्था करणे, वाहनांसाठी पुरेसे पार्किंग, वीज पुरवठा, जनरेटर्स, स्वच्छता हे सर्व काम आयोजन समिती व सत्संग समितीने करायचे आहे. हाथरसला भोलेबाबाच्या मागे धावण्यासाठी व त्यांना चरणस्पर्श करण्यासाठी हजारो भाविक एकाच वेळी धावत सुटले तेव्हा अनेकांचा तोल गेला, मोठी चेंगराचेंगरी झाली, एकमेकांच्या अंगावरून भाविक धावले, लहान मुले चिरडली गेली, भक्त महिलांना तुडवत लोक धावत होते, अशा बेशिस्त व बेलगाम गर्दीला आवरणारी कोणतीही यंत्रणा तिथे नव्हती. तासभर तिथे गोंधळच गोंधळ होता. लक्षावधी भक्तांना वाऱ्यावर सोडून भोलेबाबा त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून वाहनांचा ताफा घेऊन निघून गेले.
ज्या मैदानावर भोलेबाबाचा सत्संग योजला होता, तेथे ८० हजार जणांची बसण्याची व्यवस्था होऊ शकते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी पोलिसांची परवानगीही घेतली होती. मग तिथे तीन लाखांवर भाविक आले, याचा अगोदर अंदाज कुणालाच कसा आला नाही? क्षमतेपेक्षा अडीच पट गर्दी झाली, तेव्हाच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाय योजायला हवे होते. तेथे पोलिसांची संख्या अत्यंत तोकडी होती आणि भोलेबाबाच्या सेवेकऱ्यांनी या तीन लाख भक्तांना सत्संग संपल्यावर मोकळे सोडले. उत्तर प्रदेशचे निवृत्त पोलीस महासंचालक विक्रम सिंह यांनी तर हाथरसमधील मृत्यूकांडानंतर पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये पहिले नाव भोलेबाबाचे नोंदवायला हवे होते, असे म्हटले आहे. आयोजन समिती ही भोलेबाबाची, सत्संग समिती ही भोलेबाबाची, सेवेकरी हे सुद्धा भोलेबाबाचे. मग १२१ भाविकांच्या मृत्यूनंतर भोलेबाबा नामानिराळा कसा राहू शकतो? भोलेबाबाला अटक होऊ नये यासाठी राजकीय दबाब आहे का? योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात बेकायदा बांधकामांवर व अतिक्रमणांवर बिनधास्त बुलडोझर फिरवले जात असताना, १२१ भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यावरही कार्यक्रमाच्या प्रमुख व्यक्तीबद्दल पोलीस व प्रशासन काहीच बोलणार नसेल तर हे गूढ म्हणायचे की आणखी काही? भोलेबाबाचे जिथे जिथे सत्संग झाले तिथे किमान एक लाखांवर भाविक जमतात, हा आजवरचा अनुभव आहे. हाथरसमधील सत्संगला तीन लाख लोक येतील हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला कळाले नव्हते का? एवढ्या मोठ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर्स किंवा सीसीटीव्ही का नव्हते? असतील तर त्यांचे फुटेज काय दाखवते? हे सर्व न्यायालयीन चौकशीत पुढे यायला हवे. आजवर पोलिसांनी कुंभ, अर्ध कुंभ, निवडणुकांच्या सभा, मिरवणुका, रोड शो, मोर्चे, आंदोलने, कावड यात्रा, व्हीआयपी ड्युटी आपल्या कामाचा भाग म्हणून अनेक वेळा हाताळले असतीलच. मग भोलेबाबाच्या सत्संगाला एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना नियंत्रणाखाली का ठेवता आले नाही?
हाथरसमध्ये सत्संग आयोजित करणाऱ्या समितीचा प्रमुख व एफआयआरमध्ये नोंदवलेला मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर याला पोलिसांनी अटक केली आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे इनाम जाहीर केले होते. तो स्वत: पोलिसांपुढे शरण आला. भोलेबाबाच्या कार्यक्रमासाठी तो देणग्या गोळा करण्याचे काम करीत होता. भोलेबाबाचे कोणत्या राजकीय पक्षाशी व कोणत्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत, याची चौकशी चालू आहे. एका सत्संगमध्ये अखिलेश यादवबरोबरचे भोलाबाबाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. भोलेबाबाच्या बँक खात्यांची व मुदत ठेवींची चौकशी चालू आहे. हाथरसमध्ये ज्यांनी अराजक घडविण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी दिला आहे. चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूकांडाची न्यायालयीन चौकशी करण्याचाही त्यांनी आदेश दिला असून समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हाथरस येथे फुलारी मुगल गढी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९१ लगतच्या मैदानावर बाबाचा सत्संग आयोजित केला होता. तेथून जिल्हा रुग्णालय ४० किमी अंतरावर आहे. सत्संगसाठी सकाळी ७ वाजल्यापासून लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. स्वत: भोलेबाबा दुपारी १२.३० नंतर आला व १.४५ वाजता परत निघाला. त्याच्या निघालेल्या मोटारीच्या टायरखालील माती स्पर्श करून कपाळाला लावावी किंवा प्रसाद म्हणून घ्यावी यासाठी हजारो भाविक त्याच्या मोटारी मागे धावत होते. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये आग्रा, मथुरा, पिलभित, कासगंज, अलिगड येथील बाबाचे अनुयायी असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी प्रयागराज कुंभ मेळ्यात ४० भाविकांचा मृत्यू झाला होता. रतनगडच्या नवरात्री उत्सवात ११५ जणांचा मृत्यू झाला होता. भाजपा नेते लालजी टंडन यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना झालेल्या साड्या वाटप कार्यक्रमात २१ महिलांचा मृत्यू झाला होता. आयोजक पोलिसांची कार्यक्रमासाठी परवानगी घेतात, पण गर्दीचे नियोजन, भाविकांची व्यवस्था व सुरक्षा याकडे लक्ष दिले जात नाही. हाथरसमध्ये तीन लाखांवर भविकांनी गर्दी केली होती, पण तेथे पोलिसांची संख्या केवळ ४० ते ५० होती, हे जर खरे असेल तर पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही, असे म्हणावे लागेल.
५८ वर्षांचा भोलेबाबा हा दलित परिवारातून आलेला आहे. त्याचे नाव सुरजपाल सिंह जाटव. कासगंज जिल्हा. पटियाली, बहादूरपूर गावचा निवासी. १९९७ मध्ये पोलीस दलात नोकरी सुरू केली. लैंगिक शोषण केल्याच्या त्याच्याविरोधात तक्रारी आल्याने त्याचे निलंबन झाले होते. त्याच्यावर एफआयआर नोंदवला गेला होता. त्याने कोर्टापुढे माफी मागितल्याने त्याला पुन्हा नोकरीत सामावून घेण्यात आले. दहा वर्षे पोलीस सेवेत काढली. १८ पोलीस ठाण्यात व स्थानिक गुप्तचर विभागात त्याने नोकरी केली. नंतर त्याने स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली व अध्यात्माकडे वळला. निवृत्तीनंतर सत्संग सुरू केला. आपल्या कामाचा व कार्यक्रमाचा प्रचार व्हावा यासाठी त्याने पगारी एजंट नेमले. बाबाच्या चमत्काराविषयी एजंट लोक लोकांना गोष्टी सांगायचे व बाबाकडे आकर्षित करायचे. बाबाच्या हातात चक्र आहे, बाबाच्या हाती त्रिशूळ आहे, असे ते पसरवत असत. बाजूच्या राज्यात जाऊन बाबाचे महात्म्य ते लोकांना सांगत असत. भोलेबाबाच्या सत्संगाला गर्दी वाढविण्याचे काम एजंट करीत असत. भोलेबाबाचे २४ आश्रम आहेत, ५० महागड्या गाड्यांचा ताफा आहे, जवळपास शंभर कोटींची मालमत्ता आहे. १२१ भाविकांच्या मृत्यूकांडानंतरही भोलेबाबा नामानिराळा आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in