भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात महाराष्ट्रातील उत्पादनांना मागणी मसाले, गूळ, हळद, मध, पैठणी, मनुका, कोल्हापुरी चप्पल खास मागणी
Summary
नवी दिल्ली, दि.24 : कोल्हापूरचा मसाला, गुळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, पैठणची पैठणी यासह राज्यातील विविध पारंपरिक वस्तुंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात वाढती मागणी मिळत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर […]
नवी दिल्ली, दि.24 : कोल्हापूरचा मसाला, गुळ, चप्पल, सांगलीची हळद, मनुका, चटई, नागपूरचे संत्रे, महाबळेश्वरचे मध, पैठणची पैठणी यासह राज्यातील विविध पारंपरिक वस्तुंना भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात वाढती मागणी मिळत आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने भारतीय उद्योग प्रोत्साहन संस्था अर्थात आयटीपीओच्या वतीने देशाची राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्याचे दरवर्षी 14 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान आयेाजन करण्यात येते. या मेळ्यात विदेशातील उद्योग दालने आणि देशातील प्रत्येक राज्याची दालने मेळाव्याचे खास आकर्षण असते. मेळाव्याच्या माध्यमातून उत्पादकांना थेट ग्राहक व ग्राहकांनाही थेट उत्पादन मिळते. यावर्षी, ‘वसुधैव कुटुंबकम-युनिटी इन ट्रेड’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्र दालनही सजविण्यात आले आहे.
महाराष्ट्र दालनात एकूण 48 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर चप्पल, गूळ, मसाले, सांगलीची हळद, मनुका, चटई महाबळेश्वरचे मध, नागपूरची संत्री, पैठणी पर्स, नंदुरबारचे मसाले, पापड व चटण्या, सोलापूरचे टेरी टॉवेल, धारावीची बॅग, माथेरानची चप्पल, घर सुशोभीकरण्याच्या वस्तू, हँड पेंटिंग, विविध क्लस्टर व महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तू आदी वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.
सांगलीचे बापूसो शामराव चव्हाण यांनी त्यांच्या दालनात सर्व प्रकारच्या ज्यूट चटई, वॉल हॅगिंग, लेटरबॉक्स, बस्तर, द-या, सतरंज्या, टेबल मॅट आदी विक्रीसाठी ठेवल्या आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोलकत्याला जाऊन श्री. चव्हाण यांनी ज्यूटपासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांबद्दल सर्व आवश्यक माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी खानबाग येथे चटई बनविण्याला सुरुवात केली. सध्या त्यांच्या चरक स्वास्थ बहुउद्देशीय संस्थेमार्फत 60 महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, 30 महिला प्रशिक्षणानंतर पूर्णवेळ ज्यूटपासून विविध उत्पादने तयार करतात.
कोल्हापूरचा ‘वर्णे मसाले’ गाळा मेळ्यात लावण्यात आला आहे. या संस्थेच्या मीना वर्णे यांनी स्वत: तयार केलेले विविध प्रकारचे मसाले विक्रीस ठेवले आहेत. मेळ्यात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी सलग 10 दिवस 1000 किलो मसाले तयार केल्याचे सांगितले. या मसाल्यांना अस्सल चव असल्याची भावना व्यक्त करतात. त्यांच्या मुलाने अभियांत्रिकी पदवी मिळवूनही तो आईची मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या सहकार्यामुळे राजधानी पर्यंत पोहचल्याची व मालास चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना श्रीमती वर्णे यांनी व्यक्त केली.
या दालनात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाडून प्रामुख्याने सेंद्रीय मध विक्रीसाठी ठेवले आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जंगलात मधमाशांच्या मधपेट्या ठेऊन मध संकलन करण्यासाठी वन खात्याची मान्यता घेऊन सेंद्रीय मध तयार करत असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. संपूर्ण देशी तंत्रज्ञानाने व शास्त्रोक्त पध्दतीने मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात येते व रोजगार निर्मितीची उत्तम क्षमता असणारा उद्योग असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरचे प्रसिध्द कोल्हापूरी चप्पल मेळ्याचे खास आकर्षण ठरत आहे. या गाळ्याच्या सर्वोसर्वे श्रीमती मनीषा डोईफोडे यांनी त्यांच्या ‘रोहित फुटवेअर स्टॉल’ मध्ये विविध प्रकारचे कोल्हापूरी चप्पल ठेवले असून या स्टॉलवर भरपूर गर्दी दिसायला मिळते.
नागपूर येथील ‘माऊली क्रिएशन्स’ स्टॉल ला पैठणीचे आकर्षक पर्स, हँड बॅग, साड्या, दुप्पटा, डायरी सारख्या वस्तु श्रीमती मृणाल दाणी व अस्मिता यांनी विक्रिस ठेवल्या आहेत. पहिल्यांदाच एवढा मोठ्या व आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाल्याचा व त्यांच्या हस्तकलेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा त्यांनी आंनद व्यक्त केला व पुन्हा या मेळ्यात सहभागी होण्याची आशाही व्यक्त केली.
देशाच्या राजधानीत या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाकडून दालन उभारून राज्यातील ग्रामीण उद्योजकांना उत्तम संधी दिल्याची भावना व्यक्त करत, सर्व सहभागी कारागिरांनी शासनाचे आभार मानत, या पुढेही राज्यशासन असल्या संधी उपलब्ध करून देण्याविषयी आशा व्यक्त केली.
००००