भारतीय कंपनी सचिव संस्थानामुळे नागपूरच्या शैक्षणिक समृद्धीत भर – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
Summary
नागपूर, दि. 4 : भारतीय कंपनी सचिव संस्थान ही राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमार्फत कंपनी सचिव अभ्यासक्रमाचा लाभ येथील विद्यार्थ्यांना मिळत असून शहराच्या समृद्धीतही भर पडली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. वर्धा रोडवरील हॉटेल ली मेरिडीयन येथे […]
नागपूर, दि. 4 : भारतीय कंपनी सचिव संस्थान ही राष्ट्रीय शिक्षण संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेमार्फत कंपनी सचिव अभ्यासक्रमाचा लाभ येथील विद्यार्थ्यांना मिळत असून शहराच्या समृद्धीतही भर पडली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
वर्धा रोडवरील हॉटेल ली मेरिडीयन येथे भारतीय कंपनी सचिव संस्थानातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना डॉ.राऊत बोलत होते. माजी न्यायाधीश विजय डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय कंपनी सचिव संस्थानाचे राष्ट्रीय अध्यक्ष नागेंद्र राव, राष्ट्रीय उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे, विभागीय अध्यक्ष पवन चांडक, नागपूर विभागाच्या अध्यक्षा खुशबू पसारी, सचिव रेश्मा मिटकरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉ.राऊत म्हणाले, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत विविध उद्योगधंद्याना शासनामार्फत प्रोत्साहन दिले जात आहे. कोणताही उद्योग व्यवसाय विकसित करतांना कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. भारतीय कंपनी सचिव संस्थानाचा अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शहरात उपलब्ध झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होणार आहे. या शिक्षण संस्थेत देशभरातील तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून 55 हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. तर नागपूर शहरात दोन हजार विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असून 350 नोंदणीकृत सदस्य आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी अशा शिक्षण संस्थाचे महत्त्व वादातीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतांना कोरोना मार्गदर्शक नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाचे संकट अजून गेलेले नसून विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त प्रमाणावर कोरोनाचे लसीकरण करुन घ्यावे, असेही ते म्हणाले.
न्यायाधीश डागा म्हणाले, उद्योग अधिक विकसित होण्यासाठी कंपनी सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. उद्योग उभारणी आणि ते चालविण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. त्यावर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. यासाठी कंपनी सचिवाचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय कंपनी सचिव संस्थानातर्फे पालकमंत्र्यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तुषार पहाडे, दिप्ती जोशी, रोहन मेहरा, शांतनू जोग आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय कंपनी सचिव या संस्थेच्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयातील तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका श्रीवास्तव तर आभार सचिव रेश्मा मिटकरी यांनी मानले.