भारतरत्न रावांना, पोटशूळ काँग्रेसला. बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४. संपादकीय. इंडिया कॉलिंग डॉ. सुकृत खांडेकर
भारतरत्न रावांना, पोटशूळ काँग्रेसला
दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च सन्मान दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, तेव्हा काँग्रेसची अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी झाली. नेहरू – गांधी परिवार सोडून काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पक्षातील अशा अनेक नेत्यांची कधीच पर्वा केली नाही. पक्षासाठी त्याग आणि देशासाठी मोठे योगदान दिलेले काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते आजही आहेत, पण काँग्रेसने सत्तेवर असताना त्यांचा कधी उचित गौरव केला नाही. नेहरू – गांधी परिवाराच्या पलीकडे पक्षात आणि देशात आणखी मोठे कोणी असूच शकत नाहीत, अशा मानसिकतेत काँग्रेसचा कारभार आजही चालूच आहे.
सतराव्या लोकसभेच्या शेवटच्या सत्रात पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून काँग्रेसला आपल्या हल्ल्याचे टार्गेट केले, म्हणून काहींनी नाके जरूर मुरडली. पण काँग्रेसमधील घराणेशाही, काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार यावर पंतप्रधानांनी कठोर शब्दांत आसूड ओढले. भारतीय घटनेचे शिल्पकार व देशातील कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा काँग्रेसने कधी सत्तेवर असताना विचारही केला नाही. मात्र, नेहरू – गांधी परिवारातील नेत्यांना भारतरत्न आवर्जून दिले. देशातील हजारो रस्ते, पूल, उड्डाणपूल, चौक, बगीचे, सरकारी इमारती यांना एकाच परिवारातील नेत्यांची नावे दिली गेली. ज्यांनी नेहरू – गांधी परिवाराच्या पलीकडे कधी बघितले नाही ते मोदींच्या भारतरत्न घोषणेनंतर अस्वस्थ झाले आहेत.
या अगोदर मोदी सरकारने माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न सन्मान प्रदान केला होता. प्रणब मुखर्जी आणि पी. व्ही. नरसिंह राव हे दोघेही काँग्रेसचे दिग्गज नेते. पण त्यांना भारतरत्न देण्याचे औदार्य काँग्रेसने सत्तेवर असताना कधी दाखवले नाही. त्यांचे योगदान हे देशासाठी किती श्रेष्ठ होते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दाखवून दिले. मुखर्जी किंवा नरसिंह राव हे दोन्ही नेते काँग्रेस हायकमांडबाबत सावध होते. हायकमांडनेही त्यांना कधी मुक्त स्वातंत्र्य दिले नव्हते. गांधी परिवाराने या दोन्ही नेत्यांवर कधी पूर्ण विश्वास ठेवला नव्हता. तेलंगणातील करीमनगरमध्ये पंतप्रधान मोदींची नुकतीच सभा झाली, त्यात ते म्हणाले – काँग्रेसने सर्वोच्च महत्त्व हे नेहमीच घराणेशाहीला दिले. घराणेशाहीमुळे या पक्षात गुणवंतांची व गुणवत्तेची कधी कदर झाली नाही.
नरसिंह राव यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारर्किदीत देशाला नवीन दिशा दिली. जागतिकीकरण, उदारीकरण अशा आर्थिक सुधारणेला गती दिली. पण काँग्रेसच्या राजघराण्याने त्यांची नेहमीच उपेक्षा केली. त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतरही काँग्रेसने त्यांना कमी लेखले… नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर सोनिया गांधींनी त्याचे स्वागत केले, पण ते केवळ उपचार म्हणून होते. पी. व्ही. नरसिंह राव हे पंतप्रधान असताना दहा जनपथशी (सोनिया गांधींचे निवासस्थान) दोघांत शीतयुद्धच चालू होते. सोनियांनी आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांचा खुल्या मनाने कधी आदर-
सन्मान केला नाही.
अयोध्येत रान्मजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारावे यासाठी रथयात्रा काढून आंदोलन करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना मोदी सरकारने याच वर्षी भारतरत्न सन्मान जाहीर केला. आंदोलनाच्या वेळी लालकृष्ण अडवाणी हे विरोधी पक्षात होते व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली, त्यावेळी नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान होते. अडवाणी व नरसिंह राव या दोघांनाही देशाचा सर्वोच्च पुसस्कार देण्याची किमया मोदींनी करून दाखवली आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असताना व राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेत असताना नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर होणे ही काँग्रेसची कोंडी करणारी घटना आहे. राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेत रोज भाजपा व संघ परिवारावर सडकून टीका करीत आहेत, पण मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने काँग्रेसने दिलेल्या पंतप्रधानांना भारतरत्न सन्मान दिल्याने राहुल यांच्या टीकेची धारही बोथट झाली. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काय होणार आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही. इंडिया आघाडीतील एकेक घटक पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत असताना पंतप्रधान मोदींनी नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर केल्याने काँग्रेसचे खच्चीकरण झाले आहे.
खरं तर नरसिंह राव हे नेहरू – गांधी परिवाराबाहेरचे पंतप्रधान होते. त्यांनी पंतप्रधान म्हणून पाच वर्षांची टर्म पूर्ण केली. पण डिसेंबर २००४ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे राजधानी दिल्लीत साधे स्मारकही काँग्रेसने होऊ दिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात आणण्यासाठीही हायकमांडने परवानगी दिली नव्हती. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार झाले नाहीत.
१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्याचे खापर काँग्रेसने नरसिंह राव यांच्यावर फोडले होते. या पराभवानंतर राव यांना काँग्रेसने महत्त्व दिले नाही. खरं तर नरसिंह राव हे राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीत राहायचे नाही, असे त्यांनी ठरवले होते. सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची त्यांनी तयारी ठेवली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ते हैदराबादला निघून गेले, पण राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशाचे चित्रच बदलले. राजीव गांधींनंतर पंतप्रधानपदासाठी कोण?, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा नारायण दत्त तिवारी, अर्जुन सिंह आणि शरद पवार अशा तीन नावांची चर्चा होती. त्यातच राजीव गांधींच्या हत्येनंतर पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारायला सोनिया गांधींनी नकार दिला. गांधी परिवाराचे सल्लागार एम. एल. फोतेदार आणि आर. के. धवन हे एन. डी. तिवारी, अर्जुन सिंह किंवा शरद पवार यांपैकी कोणत्याच नावाची शिफारस करीत नव्हते. नरसिंह राव बरे, असे त्यांना वाटू लागले. अर्जुन सिंह यांनी नंतर शर्यतीतून माघार घेतली. सोनिया गांधींची पहिली निवड ही काही नरसिंह राव नव्हती. पण इतरांची नावे मागे पडली म्हणून राव यांचे नाव पुढे आले. नंतर राव यांच्या नावाला सोनियांनीही आक्षेप घेतला नाही.
दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर अर्जुन सिंह व तिवारी यांना देशाचे पंतप्रधान असलेल्या नरसिंह राव यांना दोषी ठरवायला संधीच मिळाली. सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सिंग व तिवारी यांनी दहा जनपथवर जाऊन सोनिया गांधींची भेट घेऊन आपल्या विरोधात तक्रारी केल्या, हे समजताच राव अस्वस्थ झाले. त्यातच राजीव गांधींच्या हत्येचा तपास संथ गतीने चालू आहे, म्हणून सोनिया गांधी नरसिंह रावांवर नाराज झाल्याची कुजबूज सुरू झाली. दरम्यानच्या काळात श्रीलंकेच्या अध्यक्षा चंद्रिका कुमारतुंगे यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तेव्हा सोनिया यांनी राजीव गांधींचे खुनी श्रीलंकेत मोकाट आहेत, असे त्यांना म्हटले. त्यावर श्रीमती कुमरातुंगे म्हणाल्या, त्यांना ताब्यात द्या, अशी मागणी भारत सरकारने अद्याप केलेली नाही…
सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हाही नरसिंह राव यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत राव यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. तेव्हा सीताराम केसरी म्हणाले – राव पंतप्रधानपदावर असताना बाबरी मशिदीचे संरक्षण करता आले नाही, म्हणून त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली… १९९८ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात नरसिंह राव यांचा माजी अध्यक्ष व माजी पंतप्रधान म्हणून साधा फोटोही लावला नव्हता. ही कटुता त्यांच्या मृत्यूनंतरही कायम राहिली.
दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदींनी दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव (कार्यकाळ १९९१ ते १९९६), दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंह (जुलै १९७९ ते जानेवारी १९८०) आणि हरित क्रांती जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर केले. दि. ३ फेब्रुवारीला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना, तर त्या अगोदर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर केल्यावर दोन दिवसांतच नीतीश कुमार यांनी काँग्रेस – राजदशी साथ सोडली व भाजपाप्रणीत एनडीएमध्ये दाखल झाले. चरण सिंग यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांचे नातू राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी ‘दिल जीत लिया’ असे ट्वीट करून मोदींविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तेही आता इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीएकडे येण्याच्या वाटेवर आहेत.
नरसिंह राव यांना सर्वोच्च सन्मान दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी चलबिचल झाली व अनेक जण एनडीएच्या वाटेवर निघाले आहेत. देशातील एकूण ५३ नामवंत भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. २०२३ मध्ये गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत जे घडले, ते मोदीजींना २०२४ मध्ये देशपातळीवर घडवून दाखवायचे आहे. अब की बार ४०० पार…
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in