ब्लॉग महाराष्ट्र मुंबई राजकीय संपादकीय हेडलाइन

बुधवार, ३ जानेवारी २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर. सत्तेसाठी काहीही…

Summary

          बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दल युनायटेड या त्यांच्या पक्षाचे अध्यक्षपद ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या असताना नितीश कुमार कमालीचे अस्वस्थ व अशांत दिसत आहेत. बिहारच्या राजकारणात ते पलटुराम म्हणून ओळखले […]

          बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दल युनायटेड या त्यांच्या पक्षाचे अध्यक्षपद ताब्यात घेतले आहे. लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्या असताना नितीश कुमार कमालीचे अस्वस्थ व अशांत दिसत आहेत. बिहारच्या राजकारणात ते पलटुराम म्हणून ओळखले जातात. काँग्रेस, राजद, भाजपा अशा सर्व पक्षांशी वेळोवेळी युती करून ते वर्षानुवर्षे सत्तेच्या परिघात राहिले आहेत. नितीश कुमार हे सत्तेच्या पदाशिवाय राहू शकत नाहीत आणि स्वबळावर त्यांना सत्ता मिळविता येत नाही, हेही तितकेच सत्य आहे. एकाच वेळी राज्याचे मुख्यमंत्रीपद व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आपल्याच ताब्यात ठेऊन त्यांना काय साध्य करायचे आहे? जनता दल युनायटेडच्या अध्यक्षपदावरून ललन सिंह यांना हटवून नितीश कुमार यांनी त्या पदावर कब्जा केला. याचा अर्थ ललन सिंह यांच्यावर नितीश कुमार यांचा विश्वास नव्हता का?, हे काही असे प्रथमच धडले नाही, यापूर्वीही नितीश कुमार यांनी पक्षाध्यक्षपदावर कब्जा केला होता.
जनता दल युनायटेडच्या अध्यक्षांवर यापूर्वीही अशी पाळी आली होतीच. आरसीपी सिंह, शरद यादव एवढेच नव्हे, तर समता दलानंतर जनता दलाचे आधारस्तंभ बनलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांनाही अध्यक्षपद सोडावे लागले होते. ललन सिंह किंवा अन्य कोणी, नितीश कुमार यांची कार्यपद्धती अशीच अहंकारी आहे, असे अनुभवावरून लक्षात येते. नितीश कुमार यांना जेव्हा राजकीय वादळ येणार अशी चाहुल लागते किंवा आपल्या हातून खेळी निसटणार याची माहिती होते, त्यावेळी ते असेच निर्णय घेतात व पक्षाचे संपूर्ण वर्चस्व आपल्या हातात कसे राहील याची दक्षता घेतात.
१९९४ मध्ये नितीश कुमार यांनी जनता दलापेक्षा आपला मार्ग वेगळा असल्याचे निश्चित केले तेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनीही त्यांना साथ दिली होती. प्रारंभी जनता दल (जॉर्ज) असा पक्ष काही काळ ओळखला जात होता. नंतर काही महिन्यांतच समता पार्टी बनली. १९९८ मध्ये केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये समता पार्टी सहभागी झाली होती. नितीश कुमार केंद्रीय मंत्री झाले होते. सन २००३ मध्ये नितीश कुमार, जॉर्ज फर्नांडिस व शरद यादव यांनी जनता दल युनायटेडची स्थापना केली. नंतर काही काळाने नितीश कुमार व जॉर्ज फर्नांडिस यांच्यात नाराजी वाढत गेली. तेव्हा भाजपाच्या वतीने अरुण जेटली यांनी मध्यस्थी करून नाराजी मिटविण्याचा प्रयत्न केला व नंतर भाजपानेच बिहारमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांना प्रकाशात आणले. तेव्हा जॉर्ज यांनी आमच्या पक्षाचा नेता आम्ही अजून ठरविलेला नाही, असे जाहीरपणे सांगून नितीश कुमार यांना खो देण्याचा प्रयत्न केला. मग भाजपानेच जॉर्ज यांची समजूत काढली. त्यानंतरही नितीश कुमार व जॉर्ज यांच्यातील कटुता कमी झाली नाही. सन २००९ च्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांना त्यांच्या तब्येतीचे कारण सांगून उमेदवारी नाकारली. तेव्हा फर्नांडिस यांनी मुजफ्फरपूरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली, पण त्यांचा पराभव झाला.
नितीश कुमार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांचा संधी मिळेल तेव्हा शक्य तेवढा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जॉर्ज यांना नालंदातून उमेदवारी नाकारली, पण त्या जागेवर कौशलेंद्र प्रसाद यांना तिकीट दिले की, जे कधी काळी जॉर्ज फर्नांडिस यांची बॅग सांभाळायचे काम करीत होते.
जनता दल युनायटेड पक्षाच्या कारभारात शरद यादव यांचेही योगदान मोठे होते, पण त्यांना पक्षातून हटविण्यात नितीश कुमार यशस्वी ठरले. शरद यादव यांनी त्यांच्या पक्षाचे सन २००३ मध्ये जनता दल युनायटेडमध्ये विलीनीकरण केले. तेव्हापासून सन २०१६ पर्यंत तेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. त्या अगोदर तीन वर्षांपासूनच म्हणजे २०१३ पासून नितीश कुमार व शरद यादव यांच्यात कटुता निर्माण झाली. सन २०१३ मध्ये भाजपाने पंतप्रधानपदाचा निवडणुकीतील चेहरा नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली, ही बाब नितीश कुमार यांना पसंत पडली नाही. नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी एनडीएचा राजीनामा दिला, अर्थातच ही बाब शरद यादव यांना पसंत पडली नाही. जनता दल यु.ने एनडीएतून बाहेर पडावे हे शरद यादव यांना मान्य नव्हते. नंतर म्हणजे सन २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपाशी जमवून घेतले व एनडीएचा ते मित्रपक्ष बनले. अर्थातच ही बाबही शरद यादव यांना मुळीच आवडली नव्हती. त्यांनी पक्षातच नितीश कुमार यांना विरोध केला, त्याचा परिणाम नितीश कुमार यांनी शरद यादव यांना अली अन्वर यांच्यासह पक्षातून काढून टाकले.
सन २०२० मध्ये आरसीपी सिंह हे जनता दल यु.चे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. जेव्हा मोदी सरकारमध्ये आरसीपी सिंह यांना मंत्रीपद देण्यात आले, तेव्हा नितीश कुमार व आरपीसी सिंह यांच्यात दरी वाढत गेली. सन २०२० मध्ये केंद्रातील मोदी सरकारचा विस्तार होणार होता, तेव्हा जनता दल यु.ला चांगली दोन खाती मिळावित म्हणून भाजपाशी बोलणी करण्याची जबाबदारी नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर दिली होती. नितीश कुमार हे केंद्रात त्यांच्या पक्षाला दोन मंत्रीपदे मिळावित म्हणून हटून बसले होते. भाजपा केवळ एकच मंत्रीपद देणार असल्याने जनता दल यु. सरकारमध्ये सामील होत नव्हते, पण आरसीपी सिंह हे स्वत:च केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील झाले, याचा राग नितीश कुमार यांना आला. आरसीपी सिंह यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत २०२१ मध्ये संपणार होती, पण नितीश कुमार यांना त्यांनी राज्यसभेवर परत पाठविले नाही, त्यांना उमेदवारी
दिलीच नाही.साहजिकच त्यांना आपले मंत्रीपद सोडावे लागले. नंतर आरसीपी सिंह यांनी जनता दल यु.चा राजीनामा दिला व ते भाजपामध्ये सामील झाले. नितीश कुमार व ललन सिंह यांचे नाते राजकारणात चार दशकांहून अधिक आहे, पण ललन सिंह यांचा झुकाव लालू प्रसाद यादव यांच्याकडे अधिक आहे हे समजल्यापासून नितीश कुमार त्यांच्यावर कमालीचे नाराज झाले.
बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदाबरोबर गृहखातेही नितीश कुमार यांच्याकडे आहे, त्यामुळे ललन सिंह यांचे राजदशी संबंध कसे वाढत आहेत, याची माहिती नितीश कुमार यांना वेळोवेळी मिळत होती. ललन सिंह हे जनता दल यु.चे अध्यक्ष, पण त्यांची सहानुभूती राजद व लालू प्रसाद यादव यांना आहे, हे नितीश कुमार यांच्या लक्षात आले. म्हणूनच त्यांची उचलबांगडी करून नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही स्वत:कडे ठेवले. राष्ट्रीय पातळीवर त्यांना भाजपाशी लढायचे आहे. पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रकाशात राहायचे आहे, पण इंडिया या भाजपा विरोधी आघाडीत नितीश कुमार यांचे महत्त्व कमी झाले आहे.
जनता दल युनायटेडची स्थापना जनता दल, लोकशक्ती व समता पार्टी या तीनही पक्षांचे विलीनीकरणातून झाली आहे. सन २००४ ते २०१६ या काळात शरद यादव हे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राहिले. त्यानंतर २०१६ ते २०२० नितीश कुमार यांनी अध्यक्षपद सांभाळले. २०२० – २०२१ रामचंद्र प्रसाद सिंह हे अध्यक्ष राहिले व नंतर ललन सिंह यांनी ही जबाबदारी स्वीकारली व गेल्याच आठवड्यात त्यांना राजीनामा देणे भाग पडले.
बिहारमध्ये सन २००५ पासून जनता दल युनायटेड हा पक्ष सतत सत्तेवर आहे. बिहारशिवाय झारखंड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांतही जनता दल यु.चे लोकप्रतिनिधी आहेत. मात्र, ते पक्षात कायम राहतील याची शक्यता कमी असते. मणिपूरमध्ये जनता दल यु.ने ३८ जागा लढविल्या, सहा जिंकल्या, यांपैकी पाच आमदार नंतर भाजपामध्ये सामील झाले. अरुणाचल प्रदेशातही पक्षाचे ७ आमदार सोडून गेले. बिहारमध्ये जनता दल यु.चे विधानसभेत ४५, तर विधान परिषदेत २४ आमदार आहेत.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *