BREAKING NEWS:
हेडलाइन

फड़नवीसांवर शिवसेनेचे टिकास्त्र

Summary

वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती व सुविधा योग्य वेळी निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आलीच असती, फडणवीसांवर शिवसेनेचे टीकास्त्र डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करण्याचे विरोधकांचे राजकीय धोरण असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. पत्रकार […]


वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती व सुविधा योग्य वेळी निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आलीच असती, फडणवीसांवर शिवसेनेचे टीकास्त्र


डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करण्याचे विरोधकांचे राजकीय धोरण असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे. पत्रकार पांडुरंग रायकर आणि पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्यांना जीव गमवावा लागला याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र साधले आहे.

‘मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते. विरोधी पक्षांच्या टीकेचा, आरोपांचा मुख्य भर हा जम्बो कोविड केंद्रांवरच आहे. ही केंद्रे धडपणे चालू द्यायची नाहीत, त्यात काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स यांच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करायची असे राजकीय धोरण राज्याच्या गंभीर स्थितीस धोकादायक आहे. पुण्यातील राजकारण्यांनी याचे भान ठेवले तर पांडुरंग रायकर, दत्ता एकबोटे यांना जे भोगावे लागले ते इतरांच्या नशिबी येणार नाही.’ असे म्हणत शिवसेनेने भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

पुण्यात वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रायकर हे कोरोना पॉझिटिव्ह होते. आधी त्यांनी कोपरगावमध्ये उपचार घेतले, नंतर त्यांना पुण्यात हलवले. पुण्याच्या कोविड सेंटरमधून त्यांना खासगी रुग्णालयात न्यायचे ठरले, पण वेळीच रुग्णवाहिका मिळू शकली नाही व या दिरंगाईत तरुण पत्रकारास प्राण गमवावे लागले.

रायकर यांच्या मृत्यूने पत्रकारांत चीड व संताप निर्माण होणे साहजिक आहे. इतक्या ओळखीपाळखी असताना पत्रकार आपल्या सहकाऱ्यास वेळीच मदत करू शकले नाहीत, तिथे इतर सामान्य जनांची काय पत्रास असे बोलले जात आहे व त्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.

दत्ता एकबोटे हे कष्टकरी, गोरगरीबांसाठी काम करणारे नेते होते. आतापर्यंत त्यांनी असंख्य गरीबांना उपचारांसाठी मदत केली असेल, पण एकबोटे यांना शेवटच्या क्षणी उपचार मिळाले नाहीत.

पुण्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे व सरकार किंवा महानगरपालिका अपयशी ठरत आहे असे रोज बोंबलण्याने काही पक्षांना राजकीय प्रसिद्धी मिळेल, पण अशाने कोरोना काळात जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या यंत्रणांचे खच्चीकरण होत असते.

पुण्यातील महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शहरात भाजपचे आमदार, खासदार आहेत. या सगळ्यांनी शहराच्या सुरक्षेसाठी एकदिलाने काम केले तरच कोरोनाशी नीट लढता येईल. राज्य सरकार, पी.एम.आर.डी.ए., महापालिका यांच्यात समन्वय असायला हवा.

जे कोरोनाला न घाबरता उपचार करीत आहेत असे डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्ग हे राजकीय टीका, संताप यातून निर्माण झालेल्या दहशतीने सेंटरमध्ये थांबायला तयार नाहीत. आधीच कोरोनाच्या वॉर्डात काम करायला कर्मचारी वर्ग मिळत नाही, जे आहेत त्यांची मानसिक शांतता टिकविणे आवश्यक आहे.

वैद्यकीय यंत्रणेवर ताण आहे याचे भान न ठेवता वैद्यकीय यंत्रणा, सुविधा केंद्रच मोडून टाकणे हा प्रकार शेकडो रुग्णांच्या जिवावर बेतू शकेल. फक्त पुणे, मुंबईतच नव्हे तर राज्यातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. महामारीचा इतका मोठा हल्ला होईल असे कधी कोणाला स्वप्नात तरी वाटले होते काय?

वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती व सुविधा योग्य वेळी निर्माण केल्या असत्या तर आजची परिस्थिती थोडीफार नियंत्रणात आलीच असती. मागच्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने आरोग्यविषयक काम केले असते तर आज ज्या तात्पुरत्या सुविधा ‘जम्बो’ म्हणून उभाराव्या लागल्या ते प्रमाण कमी झाले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *