पोलादी नेतृत्वाची शोकांतिका… रविवार, ११ ऑगस्ट २०२४ स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
Summary
सतरा कोटी लोकसंख्येच्या बांगलादेशाचे सलग पंधरा वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेल्या शेख हसीना यांना देशभर निर्माण झालेल्या प्रक्षोभापुढे नमते घ्यावे लागले व स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पलायन करून भारताच्या आश्रयाला यावे लागले. बांगलादेशच्या निर्मितीचे संस्थापक असलेल्या शेख मुजीबूर रहेमान यांची कन्या चार वेळा […]
सतरा कोटी लोकसंख्येच्या बांगलादेशाचे सलग पंधरा वर्षे पंतप्रधानपदावर राहिलेल्या शेख हसीना यांना देशभर निर्माण झालेल्या प्रक्षोभापुढे नमते घ्यावे लागले व स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पलायन करून भारताच्या आश्रयाला यावे लागले. बांगलादेशच्या निर्मितीचे संस्थापक असलेल्या शेख मुजीबूर रहेमान यांची कन्या चार वेळा पंतप्रधानपदावर राहिल्या पण शेवटी चार सुटकेस घेऊन लष्करी विमानाने ढाका सोडून दिल्ली गाठावी लागली, ही मोठी शोकांतिका आहे.
शेख हसीना या बांगलादेशच्या वीस वर्षे पंतप्रधानपदावर होत्या. त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार त्यांनी अनुभवले. विरोधी पक्षांबरोबर संघर्ष केला आणि लष्करी राजवटीचाही जाच सहन केला. पण गेले काही महिने चालू असलेला हिंसाचार, रक्तपात, विशेषत: लक्षावधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याविरोधात राजधानी ढाकाकडे केलेला लाँग मार्च, झालेली जाळपोळ, गोळीबार, अश्रुधूर या सर्व चक्रव्युवहातून बाहेर पडण्यासाठी त्यांना राजीनामा दिल्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन करावे लागले, हा त्यांच्या राजकीय जीवनाचा दुर्दैवी अंत आहे असेच म्हणावे लागेल.
दि. १५ ऑगस्ट १९७५, या दिवशी लष्कराच्या एका गटाने केलेल्या उठावात बांगलादेशचे पहिले पंतप्रधान व उत्तुंग नेते शेख मुजीबूर रहेमान यांची ढाकामधील त्यांच्या निवासस्थानी हत्या झाली. एवढेच नव्हे तर त्यांची पत्नी, बंधू, तीन पुत्र, दोन सुना, काही नातेवाईक तसेच त्यांचे खासगी कर्मचारी, पोलीस अधिकारी, सेना दलातील एक ब्रिगेडियर जनरल अशा १८ जणांची निर्घृण हत्या झाली. आई-वडील व कुटुंबीयांची हत्या झाली तेव्हा शेख हसीना पश्चिम जर्मनीत होत्या. त्या व त्यांची बहीण रेहाना त्या भयानक नरसंहारातून बचावल्या. या हत्याकांडानंतर हसीना भारतात आश्रयासाठी आल्या व तेव्हा त्या सहा वर्षे भारतात वास्तव्याला होत्या. काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी व गांधी परिवाराशी त्यांची तेव्हा जवळीक निर्माण झाली.
सन १९८१ मध्ये शेख हसीना बांगलादेशला परत गेल्या तेव्हा आवमी लीगने त्यांचे मोठे स्वागत केलेच, पण त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाच्या महासचिवपदावर त्यांची नेमणूक केली. शेख हसीना बांगला देशात परतल्या तेव्हा लष्करी शासक मोहम्मद इर्शाद यांनी सत्ता काबीज केली होती. लष्करी राजवटीविरोधात लढणे सोपे नव्हते. १० नोव्हेंबर १९८७ रोजी शेख हसीना यांच्यावरच हल्ला झाला. त्यात अवामी लीगचे तीन कार्यकर्ते ठार झाले. इर्शाद यांच्या लष्करी राजवटीविरोधात हसीना व त्यांची राजकीय विरोधक असलेल्या बेगम खलिदा जिया यांनी संयुक्तपणे आंदोलन केले. देशात लोकशाही आणावी अशी त्यांची मागणी होती. १९९० च्या अखेरीस हसीना व खलिदा या दोन महिलांच्या नेतृत्वाखाली राजधानी ढाकामध्ये हजारो आंदोलक घुसले. अखेर जनतेचा प्रक्षोभ रस्त्यावर उग्रपणे प्रकट होऊ लागल्याने ४ डिसेंबर १९९० रोजी इर्शाद यांना राजीनामा देणे भाग पडले. फेब्रुवारी १९९१ मध्ये झालेल्या निवडणुकीत बांगला देश नॅशनल पार्टीने विजय मिळवला आणि खलिदा जिया पंतप्रधान झाल्या. त्याच वर्षी ३० एप्रिल १९९१ रोजी बांगलादेशाला जबरदस्त चक्रीवादळाचा तडाखा बसला व राज्यात आलेल्या महापुराने १ लाख ४० हजार लोकांचे बळी घेतले. देशात हाहाकार उडाला. शेख हसीना यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. खलिदा झिया सरकारकडून वेळेवर मदत न पोहोचल्याने त्यांनी सरकारचा राजीनामा मागितला. चक्रीवादळ व महापुराच्या संकटाने हसीना यांना मोठे राजकीय बळ मिळाले. १९९६ च्या निवडणुकीत जनतेने हसीना यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवले. पाच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी भारताशी व अन्य देशांशी संबंध सुधारले. भारताबरोबर गंगा पाणी वाटपाचा ३० वर्षांचा करारही केला. पण २००१ मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले व ढाक्यात बेगम खलिदा जिया यांचा बीएनपी, जमात ए-इस्लामी, जातीय पार्टी इस्लामिक ओइक्यो जोटे असे संयुक्त सरकार स्थापन झाले. जिया यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतातील ईशान्येकडील राज्यातील उल्फासारख्या फुटीरतावादी संघटनांचे समर्थन केल्याने जगातील अनेक देशांनी नापसंती व्यक्त केली. पुढे या सरकारवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झाले व मोठे जनआंदोलनही झाले. सन २००७ मध्ये पुन्हा लष्करी राजवट स्थापन झाली व निवडणुका लांबणीवर पडल्या. लष्करी राजवटीने शेख हसीना यांना जेलमध्ये टाकल्यावर त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती वाढली. सन २००८ मध्ये झालेली निवडणूक शेख हसीना यांनी जिंकली व त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यानंतर बांगलादेशचे भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले. तिस्ता नदीच्या पाणी वाटपापासून ते सरहद्दीलगतच्या गावांच्या देवघेवीचा प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न त्यांनी मार्गी लावला. २०१४ मध्ये हसीना यांनी पुन्हा सत्ता काबीज केली व त्या शक्तिशाली बनल्या. विरोधी पक्षाला कमजोर करण्याचे काम हसीना करतात, असा आरोप करीत बांगलादेश नॅशनल पार्टीने २०१४ च्या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.
सन १९९६ मध्ये शेख हसीना यांचे सरकार स्थापन झाले पण त्यांच्या पक्षाला बहुमत नव्हते. संसदेत त्यांच्या पक्षाकडे १४० जागा होत्या, तर खलिदा जिया यांच्या पक्षाकडे ११६ जागा होत्या. संसदेत विरोधी पक्ष प्रबळ असल्याने हसीना यांना मनमानी कारभार करता आला नाही. सन २००९ पासून २०२३ पर्यंत त्यांच्या पक्षाकडे मोठे बहुमत होते, संसदेत प्रबळ विरोधी पक्ष नसल्याने त्यांनी संसदेचे रूपांतर एका रबर स्टॅम्पमध्ये केले होते. न्यायपालिका व प्रशासनावर त्यांची पूर्ण पकड होती. माध्यमांवर नियंत्रण होते. विरोधी नेते जेलमध्ये होते. गेली १५ वर्षे हसीना यांची बांगला देशात निरंकुश सत्ता होती. या वर्षी झालेल्या निवडणुकीवर बांगलादेश नॅशनल पार्टीने बहिष्कारच घोषित केला होता. म्हणून निवडणूक एकतर्फी झाली. हसीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत बांगलादेशात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या. महामार्ग, पूल, बंदरांचा विकास, मेट्रो रेल्वे परियोजना, परिणामकारक राबवली. व्यापारवृद्धी झाली. पण हसीना यांच्या काळात लोकशाहीचा संकोच झाला. राजकारणात विरोधी पक्षाला त्यांनी जागाच ठेवली नाही. आरक्षणाच्या टक्केवारी वाढविण्याच्या नादात त्या फसल्या. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष झाले व त्यांची देशात हुकूमशहा म्हणून प्रतिमा तयार झाली. सर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून राहिलेली महिला म्हणून त्यांनी जागतिक विक्रम निर्माण केला, पण आरक्षण कोट्याविरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने त्यांना सत्तेवरून हटवले. या आंदोलनात पाचशेहून अधिक बळी पडले. पोलिसांच्या गोळीबारात शेकडो जखमी झाले.
बांगलादेश १९७१ मध्ये स्वतंत्र देश म्हणून उदयाला आला. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींच्या मुलांना सरकारी नोकरीत ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या. हसीना यांच्या आवामी लीगने त्याचे सुरुवातीपासून समर्थन केले होते. नंतर असा कोटा रद्द करावा अशी मागणी विद्यार्थी संघटना करू लागल्या व आंदोलने सुरू झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये हसीना यांनी नोकरीमध्ये आरक्षण देणारा सर्वच कोटा रद्द करण्याच्या मागणीला सहमती दर्शवली. मात्र ढाका उच्च न्यायालयाने ५ जून २०२४ रोजी आरक्षणाचा कोटा बहाल करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थी रस्त्यावर आले व आंदोलन सुरू झाले. आरक्षण हटावपेक्षा हसीना हटाव, या मागणीला जोर चढला. ज्या राजकीय पक्षांनी २०२४ मध्ये निवडणुकीवर बहिष्कार घातला होता त्यांना विद्यार्थी आंदोलनाने नवे चैतन्य मिळाले.
शेख हसीना यांची गेल्या काही वर्षांत हुकूमशहा म्हणून प्रतिमा तयार झाली. २०१४ व २०१८ च्या निवडणुकीत अनेक गैरप्रकार घडले. मतपेट्यांशी छेडछाड झाली. या वर्षी झालेली निवडणूक म्हणजे मोठा घोटाळाच होता. मुक्त व नि:ष्पक्ष वातावरणात तेथे निवडणुका झाल्या नाहीत. १९९६ मध्ये हसीना यांच्या अवामी लीगला १४६, २००१-६२, २००८- २३०, २०१४- २३४, २०१८- २५७ व २०१४ मध्ये २२४ जागा मिळाल्या. बांगलादेशच्या संसदेत ३०० जागा असून बहुमतासाठी १५१ जागा आवश्यक असतात. हसीना यांच्या कारकिर्दीत बेगम जिया यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तब्बल दोन वेळा नजरकैदेत ठेवण्यात आले होते. विरोधी पक्षांच्या लाखो कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्यात आले. बीएनपीच्या असंख्य नेत्यांचा सरकारी यंत्रणांचा वापर करून छळ केला गेला. जमाते ए-इस्लामी पक्षावर बंदी घालण्यात आली.
हंगामी सरकारचे प्रमुख व नोबेल पुरस्कार विजेते ग्रामीण बँकेचे संस्थापक मोहम्मद युनूस यांनाही हसीना यांनी रक्तपिपासू म्हटले होते. त्यांना सहा महिने जेलमध्ये ठेवले होते. नोकऱ्यांमध्ये ३० टक्के आरक्षणाचा लाभ देताना हसीना यांच्या पक्षातील अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. गुणवत्ताधारकांवर अन्याय होतो म्हणून बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी आरक्षणाला विरोध केला व आंदोलन केले. हसीना यांच्या काळात भ्रष्टाचार व घराणेशाही वाढली, त्यांच्या कुटुंबातील १७ जण संसदेत होते व त्यांच्या नोकराकडे २८४ कोटींची संपत्ती होती. हसीना यांच्या काळात ६०० लोक बेपत्ता झाले, शेकडो जणांची हत्या झाली असाही आरोप केला जातो आहे. विद्यार्थी आंदोलनाने हसीना यांच्या लोकप्रियतेला ओहटी लागली, दबदबा संपला. सारा देश विरोधात गेला असे वातावरण निर्माण झाले. प्रक्षोभ आवरता येत नाही, विद्यार्थ्यांना रोखता येत नाही, जाळपोळ थांबवता येत नाही, आंदोलकांवर गोळीबार करणे शक्य नाही, लाखो विद्यार्थी ढाका राजधानीत घुसले, तर गृहयुद्ध शिगेला पेटेल असा लष्कराने इशारा दिला व हसीना यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला. बांगलादेशची आयरन लेडी शेख हसीना यांचा ५ ऑगस्ट २०२४ रोजी राजकीय क्षितीजावर अस्त झाला.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in