औरंगाबाद महाराष्ट्र हेडलाइन

नैसर्गिक आपत्ती, पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी – विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड मान्सूनपूर्व तयारीबाबत छत्रपती संभाजीनगर विभागाचा आढावा

Summary

छत्रपती संभाजीनगर, दि. २० (विमाका) : यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून यापूर्वीची काही भागातील अतिवृष्टी व पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही, याची दक्षता […]

छत्रपती संभाजीनगर, दि. २० (विमाका) : यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असून यापूर्वीची काही भागातील अतिवृष्टी व पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा पुरामुळे जीवित व वित्तीय हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी दिले.

छत्रपती संभाजीनगर विभाग मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जालना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत, लातूर जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कर्नल ऋषिकेश सुर्यवंशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदिश मिनीयार, नयना बोंदार्डे, सुरेश वेदमुथा, ॲलीस पोरे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले की, पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने नागरिकांची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रीबाबत नियोजनपुर्वक व्यवस्था करावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने तत्परतेने नियोजन करावे. जिल्हा व तालुकास्तरावर असलेला नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावा. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, तसेच हे क्रमांक नेहमी सक्रीय असतील याची दक्षता घ्यावी. एसडीआरएफ तसेच एनडीआरएफची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घेण्यासोबतच जिल्हानिहाय या यंत्रणेत प्रत्येक वर्षी 100 ने वाढ करावी. महानगरात असलेले मोठे नाले, नदी यावर ये-जा करण्यासाठी असलेला लोखंडी मार्ग चांगला आहे किंवा कसे याबाबत तपासणी करावी, आवश्यकता असेल तिथे तातडीने बदल करावा. महानगरातील नाल्यांची सफाई कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबतही तत्परतेने तपासणी करावी. महानगरातील ज्या भागात पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्यासाठी तेथील नागरिकांचे स्थलांतर कुठे करावे याबाबत पूर्वतयारी करावी. अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी दिल्या.

घाटकोपर, मुंबई येथे जाहिरात फलक कोसळण्याची घटना घडली आहे. मान्सून पूर्व कालावधीत व अन्य कालावधीत होणाऱ्या दुर्घटनामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी शहरी भागातील व महामार्गावरील लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांची रचनात्मक तपासणी करण्यात यावी. तपासणीअंती आढळून आलेले अवैध जाहिरात फलकाबाबत संबधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. आपल्या अधिनस्त क्षेत्रात जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांची मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारीबाबत जिल्हानिहाय जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी बैठकीत माहिती दिली.

यावेळी आपत्ती विभागाशी सबंधित विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *