BREAKING NEWS:
महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

नेम मशाल आणि तुतारीवर… रविवार, १९ जानेवारी २०२५ स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर

Summary

प्रदेश भाजपाचे अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे नुकतेच पार पडले. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला धुवांधार यश मिळाले. राज्यात भाजपाने १४९ मतदारसंघांत निवडणूक लढवली आणि मतदारांनी १३२ उमेदवार विजयी करून विधानसभेत पाठवले. महायुतीचे २८८ पैकी २३५ जागांवर आमदार […]

प्रदेश भाजपाचे अधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे नुकतेच पार पडले. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला धुवांधार यश मिळाले. राज्यात भाजपाने १४९ मतदारसंघांत निवडणूक लढवली आणि मतदारांनी १३२ उमेदवार विजयी करून विधानसभेत पाठवले. महायुतीचे २८८ पैकी २३५ जागांवर आमदार विजयी झाले. काँग्रेस, उबाठा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाआघाडीला पन्नास जागाही मिळाल्या नाहीत. आमदारांची किमान संख्या नसल्याने विधानसभेत विरोधी पक्ष नेताही महाआघाडीला मिळू शकत नाही.
विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व जनादेशानंतर प्रदेश भाजपाचे साईनगरीत वाजत-गाजत अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, पक्षाचे राज्यातील मंत्रीगण, माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे, तसेच पीयूष गोयल, मुरलीधर मोहळ, राहुल नार्वेकर, प्रा. राम शिंदे, रावसाहेब दानवे, नितेश राणे आदी दिग्गजांसह वीस हजार सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपाचे शिर्डीचे अधिवेशन म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या रोमारामांत उत्साह व जोश होता. भाजपाचे स्फूर्तिस्थान आणि देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक केली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व विजय संपादन करून पुन्हा सत्ता काबीज केली आणि आता एकच लक्ष्य म्हणजे राज्यातील महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर भाजपाचे कमळ फुलवायचे आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूरसह सर्व २९ महापालिकांवर शतप्रतिशत विजय संपादन करण्याचा संकल्प शिर्डी अधिवेशनात करण्यात आला. राज्यभर सर्वत्र भगवा फडकविण्याचा अजेंडा घेऊनच भाजपाचे कार्यकर्ते आपल्या मुक्कामी रवाना झाले.
साईनगरीतील भाजपाच्या अधिवेशनात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या केडरला ऊर्जा देण्यात आली तसे राज्यातील प्रमुख राजकीय शत्रू असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तेवढ्याच ताकदीने हल्ला चढविण्यात आला. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तर तुतारी व मशाल चिन्ह असलेल्या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाचे अक्षरश: वस्त्रहरण केले. त्यांच्या कावेबाज राजकारणीची चिरफाड केली. एकाला दगाबाज तर दुसऱ्याला गद्दार ठरवले. विधानसभा निवडणुकीत जसे त्यांचे राजकारण गाडले तसे आता महापालिका-जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना धडा शिकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शहा-फडणवीसांनी केले. अमित शहा यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला दगाबाज व विश्वासघातकी संबोधल्यामुळेच अधिवेशन तापले आणि गाजले असे म्हणावे लागेल.
पंचायत ते पार्लमेंट आणि शतप्रतिशत हे भाजपाच्या विस्ताराचे परवलीचे शब्द आहेत. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी हे दोन्ही शब्द यापूर्वी अनेकदा उच्चारले गेले आहेत. राज्य विधानसभा निडणुकीच्या देदीप्यमान विजयानंतर आता स्थानिक स्वराज संस्थांवर शंभर टक्के कमळ फुलविण्यासाठी शतप्रतिशतचा नारा देण्यात आला आहे. (१) २३ नोव्हेंबर २०२४ महाराष्ट्र भाजपाच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस म्हणून नोंद राहील. भाजपाने १४९ जागा लढवल्या व जनतेने १३२ आमदार जिंकून दिले. (२) १९७८ पासून शरद पवारांनी चालवलेले दगाबाजीचे राजकारण या निवडणुकीत जनतेने वीस फूट जमिनीत गाडले. (३) २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी द्रोह केला, बाळासाहेबांच्या सिद्धांताशी तडजोड केली, फसवणूक व लबाडी करून मुख्यमंत्री झाले म्हणून जनतेनेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. (४) भाजपाला राज्यात जनतेने प्रचंड बहुमताने सत्ता दिली व फडणवीस हे स्थिर सरकार देतील. (५) स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांना एकही जागा मिळवून देऊ नका. (६) इतके समर्थ ताकदवान व्हा की दगाबाजी करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही. – इति
अमित शहा…
अमित शहा बोलल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उबाठा सेनेच्या नेतृत्वाला मिरच्या झोंबणे स्वाभाविक होते. शरद पवार हे स्वत: कधी वैयक्तिक टीका टिप्पणी करीत नाहीत पण त्यांना दगलबाज म्हटल्याने त्यांनीही तेवढ्याच वेगाने पलटवार केला. १९७८ मध्ये शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोद सरकार महाराष्ट्रात स्थापन केले होते. तेव्हा वसंतदादांच्या पाठीत पवारांनी खंजीर खुपसला अशी टीका झाली होती. पण वसंतदादा पाटील-नाशिकराव तिरपुडे वादात अस्थिर सरकार पाडणे गरजेचे होते असे अनेकांचे मत होते. मुंबईतील एका मोठ्या वृत्तपत्राने तर वसंतदादांचे सरकार पडल्यावर ही तर श्रींची इच्छा, असा अग्रलेखाचा मथळा दिला होता. पुलोद सरकारमध्ये समाजवादी, शेका पक्ष, जनसंघाचेही मंत्री होते. जनसंघाचे उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिला टोपले यांच्याकडे महत्त्वाची खाती शरद पवारांनी सोपवली होती. हे सरकार पडले नाही, तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते बरखास्त केले.
शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. लातूरमधील किल्लारी येथे पहाटे ३ वाजता मोठा भूकंप झाल्यावर मुंबईत असणारे पवार सकाळी ७ वाजता स्वत: तिथे जातीने हजर झाले व सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत करून मदत कार्याला चालना दिली. गुजरातला कच्छला भूकंप झाला तेव्हा सत्तेवर असलेल्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पवार हे विरोधी पक्षात असतानाही आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद दिले व त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला होता. केंद्रातील मोदी सरकारनेच पवार यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. असे असताना शहा व फडणवीस शिर्डीच्या अधिवेशनात पवारांवर का तुटून पडले?
गेल्या दोन-अडीच वर्षांत ठाकरेंची शिवसेना फुटली आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. दोन्ही पक्षांतून बाहेर पडलेले ८० हून जास्त आमदार भाजपाचे समर्थन करीत महायुतीत दाखल झाले. दोन पक्षांत झालेली ही मोठी तोडफोड होती. त्याचे श्रेयही भाजपाच्या नेत्यांनी जाहीरपणे घेतले. लोकसभा निवडणुकीत पवार-ठाकरे यांच्या पक्षांनी भाजपाला धक्का जरूर दिला पण विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची स्थिती दयनीय झाली. तरीही महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या दोन पक्षांचे व त्यांच्या नेतृत्वाचे भाजपाला आव्हान का वाटावे? याचे एक प्रमुख कारणे म्हणजे भाजपाला नुसता विजय किंवा नुसते बहुमत मिळवायचे नाही, तर शतप्रतिशत विजय साध्य
करायचा आहे.
मोदी-शहा महाराष्ट्राला गुलामीत टाकू पाहत आहे, अफजल खानाच्या फौजा दिल्लीहून महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत, अब की बार भाजपा तडीपार, महाराष्ट्र द्रोही रावणाचे दहन करा, अशा वल्गना कोण करीत होते? त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली म्हटले तर संतापायचे कशासाठी? उबाठा सेनेच्या प्रमुखांच्या पुत्राने गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली, स्वत: पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना पुप्षगुच्छ देऊन शुभेच्या दिल्या, गडचिरोलीला नक्षलवादी शरण आले व त्या भागात बस सुरू झाली म्हणून मुखपत्राने मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. रोज भाजपा आणि मोदी-शहांच्या विरोधात लेखणी आणि वाणी झिजवत असताना हा बदल कशासाठी हे गूढ आहे. पुन्हा भाजपाशी जमवून घेण्याचे तर प्रयत्न नाहीत नाही? अशी चर्चाही सुरू झाली. पण शिर्डीच्या अधिवेशनात शहा, फडणवीस व बावनकुळे यांनी विश्वासघातकी राजकारणावर जी झोड उठवली त्यातून उबाठा सेनेला भाजपाने महायुतीचे दरवाजे बंद केले आहेत, हा स्पष्ट संदेश दिला आहे.
गुजरातने देशाला व त्या राज्याला अनेक चांगले नेते व प्रशासक दिले. केंद्रातही सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, असे अनेक दिग्गज नेते गृहमंत्री झाले पण त्यात कोणालाही राज्यात तडीपार केलेले नव्हते, असे उपहासात्मक भाष्य शरद पवारांनी करून शहांवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. केंद्रातील अन्य मोठ्या नेत्यांशी तुलना करताना कुठे इंद्राचा ऐरावत व कुठे श्याम भट्टाची तट्टाणी अशीही पवारांनी मराठी म्हण ऐकवली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रतिमा म्हणजे देशपातळीवर धडकी भरविणारे नेतृत्व अशी आहे. सर्वच राजकीय पक्षांना त्यांचा धाक वाटतो. भाजपाला सर्वत्र सत्ता हवी आहे, हे खरे आहे. पण पराभव झाला म्हणून भाजपा कधी रडत बसत नाही आणि विजय मिळाल्यावर कधी गाफील राहत नाही. शहा व पवार यांच्यातील वार-पलटवाराला माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. तडीपार की निर्वासित अशीही चर्चा झाली. अरे ला कारे झाल्याने देशही हादरला. पण तिसऱ्याच दिवशी पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले… भाजपाच्या शतप्रतिशत घोषणेमुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनाही मोदी-शहांच्या सुरात सूर मिसळूनच राजकारण करावे लागणार आहे, हा शिर्डी अधिवेशनाने संदेश दिला आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *