नि:क्षारीकरण प्रकल्प हे मुंबईसाठी क्रांतीकारी पाऊल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बृहन्मुंबई महानगरपालिका व मे.आयडीई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सामंजस्य करार
मुंबई, दि. २८ : मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प सुरु करणे हे महत्त्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे, असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, इस्त्राईलचे महावाणिज्यदूत याकोव फिनकेलस्टाईन, वकालतीमधील अन्य सदस्य, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीचे पदाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस श्रीनिवास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्याप्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतू त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असतांना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मूर्त रुपाला येत आहे, २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल. शेवटी विकास करतांना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी आज मालाड येथे उभ्या करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालय तसेच कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पणातून मुंबईकरांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.
नगर विकास विभागाचे पूर्ण सहकार्य
अवेळी पडणारा पाऊस, पाण्याची वाढती मागणी पाहता नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून आज महापालिकेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. ते म्हणाले की, यामुळे बऱ्याच दिवसांची मागणी यातून पूर्ण होईल. एसटीपी प्रकल्पातील रिसाकल केलेले पाणी बांधकाम क्षेत्रासह इतर बाबींसाठी उपलब्ध करून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आणखी मजबूत करता येईल. या प्रकल्पासाठी नगर विकास विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, असेही ते यावेळी म्हणाले.
किनारपट्टी भागात नि:क्षारीकरण प्रकल्प उभारावेत
राज्याच्या किनारपट्टी भागात समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचे छोटछोटे प्रकल्प उभे करावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करून मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मालाड येथील २०० दशलक्ष लिटर च्या नि:क्षारीकरण प्रकल्पाच्या डीपीआर साठी होणारा सामंजस्य करार हे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत याचा विस्तार करता येऊ शकेल. पाणी सुरक्षिततेमध्ये इस्त्राईलचे काम खूप मोठे आहे तसेच त्यांचे तंत्रज्ञानही जगविख्यात आहे. कृषी आणि पाण्याच्या क्षेत्रात त्यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प राज्यात आणि देशात सुरु आहेत. पावसाच्या पाण्याचे महत्त्व आपण सर्वजण जाणून आहेत, परंतू त्यातील अनिश्चितता, वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची मागणी पाहता पावसावर किती आणि कितीकाळ अवलंबून रहायचे याचा विचार करणे अगत्याचे ठरत असल्याने नि:क्षारीकरणासारख्या प्रकल्पाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते. उत्तम दर्जाच्या आणि परवडणाऱ्या नागरीसुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काम कौतुकास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रकल्पाचे स्वरूप, विस्ताराची क्षमता आणि वैशिष्ट्ये आपल्या प्रास्ताविकात मांडली
यावेळी आय.डी.ई वॉटर टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला त्यांनी नि:क्षारीकरण प्रक्रियेचे महत्त्व, इस्त्राईलचे आधुनिक तंत्रज्ञान आणि जगभर सुरु असलेल्या याक्षेत्रातील प्रगतीबाबत माहिती दिली. इस्त्राईलचे महावाणिज्य दूत याकोव फिनकेलस्टाईन यांनी जल ही जीवन है… असे म्हणत आपल्या भाषणाची हिंदीत सुरुवात केली आणि उपस्थितांची मने जिंकून घेतली. त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे सक्षमीकरण करण्याची गरज व्यक्त करतांना इस्त्राईल भारतात सामंजस्य कराराद्वारे करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. छोटी छोटी जल की बॅुंदे ही सागर को भर देती है… असे सांगतांना त्यांनी इस्त्राईलचे तंत्रज्ञान जगभर प्रसिद्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री आणि सर्व सहकारी करत असलेल्या प्रयत्नांचेही कौतूक केले.
…
मनोरी, मालाड येथे उभारण्यात येणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा भविष्यात ४०० दशलक्ष लिटर क्षमतेपर्यंत विस्तार करण्याची क्षमता
- मे २०२२ पर्यंत डीपीआर तर २०२५ मध्ये प्रकल्प सुरु होण्याची अपेक्षा. याद्वारे मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी
- अनियमित-लहरी पाऊस, वातावरणीय बदल यामुळे मुंबईकरांना दरवर्षी १५ ते २० टक्के पाणी कपातीस सामोरे जावे लागते या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णपणे विश्वासार्ह जलस्त्रोताचा विकास
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मनोरी, मलाड येथे उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रकल्पाची अंमलबजावणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून कमी जागेत प्रकल्प उभारणी
- मनोरी येथे पाण्याची गुणवत्ता तुलनात्मकदृष्टीने चांगली असून समुद्राचे पाणी उचलून नि:क्षारीकरण प्रकल्पात आणण्याकरिता तसेच प्रक्रियेनंतरच्या क्षाराच्या निर्गमनाकरिता खुल्या समुद्राची उपलब्धता असलेले हे ठिकाण कांदळवन विरहित आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रापासून दूर आहे. मानवी वस्ती, शेत जमीन, मासेमारी जेट्टी ही दूर असून सर्व निकषांवर पात्र ठरणारी ही जागा नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी योग्य आहे.
- करार झाल्यापासून १० महिन्याच्या कालावधीत सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त होईल. हा प्रकल्प अहवाल तयार करतांना समुद्रशास्त्रीय सर्वेक्षण, भूपृष्ठीय सर्वेक्षण, भूभौतिकशास्त्रीय सर्वेक्षण, पर्यावरण निर्धारण अभ्यास (सागरी व जमिनीवरील), डिफ्युजर, खाऱ्या पाण्याच्या निर्गमनाच्या रचनात्मक बाबींची गणितीक प्रतिकृती, समुद्राच्या पाण्याच्या आदान तसेच क्षाराच्या निर्गमनाचे स्थळ निश्चित करून संकल्प चित्रे तयार करणे, किनारपट्टी नियमन क्षेत्रीय अभ्यास व तद्अनुषंगिक परवानग्या प्राप्त करण्याची कामे हाती घेण्यात येतील.
सविस्तर प्रकल्प अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प बांधकामाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सविस्तर निविदा प्रक्रिया राबवून यथायोग्य कार्यवाही केली जाईल.