नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षापासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
Summary
मुंबई, दि.12 : विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी सलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय […]
मुंबई, दि.12 : विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नाविन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई मान्यताप्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाशी सलग्नित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल करुन शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासून सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविण्यासाठी अभियांत्रिकी शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. राज्यात तंत्रशिक्षण विभाग नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. सध्याच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करुन शैक्षणिक वर्ष 2023 -24 पासून प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सुधारित अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम लागू करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम डिसेंबर 2025 पर्यंत टप्या-टप्प्या पूर्णपणे विकसित करण्यात येईल.
तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तंत्र शिक्षण अभ्यासक्रमात करण्यात येत असून एकूण 49 एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमाकरिता प्रथम सत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. तसेच या अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने “K” Scheme या नावाने संबोधले जाणार आहे. हा अभ्यासक्रम परिणाम आधारित (Outcome Based) क्रेडिट सिस्टमवर आधारित असणार आहे. यामध्ये प्रत्येक सत्र हे 20-22 क्रेडिटचे असून एकूण सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम हा 120-132 क्रेडिटचा असणार आहे. तसेच औद्योगिक प्रशिक्षणामध्ये पूर्वीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ६ आठवड्यांचा कालावधी वाढवून आता 12 आठवड्यांचा करण्यात येत आहे, डिजिटल मीडिया MOOCs चा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमात अंतर्भाव असणार आहे, विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाकरिता योग आणि ध्यानसाधना” या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge System) विविध विषयांमध्ये अंतर्भुत करण्यात आली आहे,या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधान (Indian Constitution) या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्याकरीता स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन (Self Learning Assessment) होणार आहे, तसेच
मल्टीपल एन्ट्री – मल्टीपल एक्झिट ची तरतूद करण्यात येत असून प्रथम वर्षाअंती एक्झिट करणाऱ्या विद्यार्थ्यांना Certificate of Vocation, व्दितीय वर्षांअंती एक्झिट करणाऱ्या विद्यार्थ्यांना Diploma in Vocation व तृतीय वर्षांअंती Diploma in Engineering ची तरतूद करण्यात आलेली आहे. व्दितीय व तृतीय वर्षांच्या प्रवेशाकरिता मल्टीपल एन्ट्रीची तरतूद करण्यात येणार आहे.याच बरोबर उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार प्रादेशिक गरजांचा अभ्यास करून तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या दृष्टीने अभ्याक्रमात विशेष समावेश करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापर्ण शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी सुद्धा अधिक उपलब्ध होतील, असे तंत्र शिक्षण संचालक डॉ. मोहितकर यांनी माहिती देताना सांगितले.
0000