जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध – पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा
चंद्रपूर दि. 5 ऑक्टोबर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. शेतमालाची परिस्थितीसुध्दा अतिशय चांगली आहे. शेतीकरीता आवश्यक असलेला युरिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात असून खरीप आणि रब्बी मध्ये युरियाचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, पणन अधिकारी अनिल गोगिरवार, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी आदी उपस्थित होते.
यावर्षी खरीप हंगामात 59,508 टन तर रब्बी हंगामात 28,894 टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत युरियाची कमतरता होऊ नये, यासाठी कृषी विभागाला निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची खरेदी करण्यात आली आहे. पणन महासंघाकडून 2 7 हजार 870 शेतक-यांकडून एकूण 8 लक्ष 70 हजार क्विंटल तर आदिवासी सोसायटीकडून 3 लक्ष 20 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. तसेच धान खरेदी केंद्राबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असतील तर असे केंद्र रद्द करून नवीन केंद्रांना मंजूरी देण्यात यावी, अशा सुचना त्यांनी जिल्हा पणन अधिका-यांना दिल्या.
पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षानंतर जिल्ह्यातील शाळा पुन्हा सुरू झाल्या. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक मिळून 1350 शाळा सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी 1 लाख 5 हजार 611 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यामध्ये शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले असून 11551 शिक्षकांपैकी 11310 शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले. तसेच ज्यांच्याकडे ॲन्ड्राईड मोबाईल नव्हता, अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणपध्दतीमुळे नुकसान झाले. मात्र आता शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
संपूर्ण तालुकास्तरावर जिल्हा प्रशासनाच्या बैठका आयोजित करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविल्या जातील. 10 दिवसांपूर्वी विविध विभागांच्यावतीने नागरिकांकडून निवेदने मागविली जाणार असून त्यावर निर्णय घेण्यासाठी जिल्ह्याचे प्रशासन उपस्थित राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी धान खरेदी, रब्बी क्षेत्र वाढविण्याच्या उपाययोजनेसंदर्भात, घरकूल व डाटा एन्ट्री ऑपरेटर संदर्भात, वणी – वरोरा – माढेळी वळण रस्त्याकरीता भुसंपादनाबाबत आणि अंधश्रघ्दा निर्मुलनाबाबत आढावा घेतला. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.