गडचिरोली शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सुटेल काय ? प्रा. संध्या येलेकर
गडचिरोली शहरात दिवसेंदिवस अपघाताचे वाढत असलेले प्रमाण लक्षात घेऊन “अतिक्रमण हटाव मोहीम” हा शेवटचा उपाय म्हणून प्रशासन कामाला लागले. गडचिरोली शहरात हा विषय नेहमीच निर्माण होतो. अपघात झाल्यानंतर किंवा काही अडचणी आल्या की रस्त्यावरच्या दुकानांचे अतिक्रमण बाजूला करायचे आणि परत आठ दहा दिवसांनी जैसे थे परिस्थिती.
राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्ते तयार झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणामुळे सतत अपघाताचे प्रमाण वाढतच राहिल्यामुळे , न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेवर खापर फोडल्यामुळे, प्रशासनाला जाग आली व स्थानिक प्रशासन कामाला लागले. गेल्या दोन दिवसात इंदिरा गांधी चौक जरा जास्तच विस्तारला गेला आहे असे वाटते .अतिक्रमण नसावेच. कारण त्यामुळे गैरसोय होते हे जरी 100% खरं असलं तरी अतिक्रमण हटवल्यानंतर दैनंदिन रोजगार करणाऱ्यांचं काय? शाळेत जाताना गेल्या दोन दिवसात बरीच घर उध्वस्त होताना दृष्टीस पडली. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर परत नवीन संसार थाटावा तशी दुकान सजली होती. प्रत्येकाने आपल्या जुन्या दुकानांची नवीन दुकान करून आपल्या कामाला सुरुवात केली होती .पण तेच दुकान त्यांना काही दिवसात काढावे लागेल असे कदाचित वाटले नसेल. पण प्रशासनाच्या या मोहिमेमुळे काहींनी दुकानांची मोडतोड करून भंगारासाठी काढलं होतं .काहींनी दुकानाचा डोलारा ढकल गाडीवर मांडून ढकलत दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत होते. पाखरे जेव्हा एखाद्या घरात घरटी बांधतात व घरात कचरा होतो म्हणून आपण ती घरटी काढून फेकून देतो. तसं मला काहीसं वाटत होतं .त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय? हा ही प्रश्न मला पडला .गरीब लोकांची दुकान जरी प्रशासनाने हटवली असली तरी त्यांना काम मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी नाही का ?राष्ट्रीय महामार्ग बांधताना मात्र अनेक लोकांची घरं महामार्गाला अडथळा येत असताना सुद्धा जशीच्या तशी आहेत, हे अतिक्रमण कोण हटवणार ? असे अनेक प्रश्न मनात आले.
अतिक्रमण करणे हा गुन्हा आहेच .परंतु श्रीमंत आणि गरीब यांच्यासाठी सारखाच कायदा असायला नको का? दोन पदरी रस्ते झाले असले तरी एका पदरावर गाड्यांची पार्किंग असतेच .नुसते चौकातील अतिक्रमण हटवणे हाच त्यावरचा उपाय आहे का? आणि बाकीच्या रस्त्यांचं काय? अशी नानाविध प्रश्न भेडसावत गेली . म्हणूनच प्रशासनाने सगळीकडे जिथे अतिक्रमण झाले आहे तिथेही मोहीम सुरू केली पाहिजे असे मला वाटते. तेव्हाच कदाचित गडचिरोली राहण्यासाठी योग्य शहर होईल.
प्रा शेषराव येलेकर
सह. संपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क