खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बियाण्यांचा काळा बाजार, खतांची भेसळ रोखण्याच्या सूचना
Summary
गडचिरोली,(जिमाका)दि.02 : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते गडचिरोली येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते. गडचिरोली […]
गडचिरोली,(जिमाका)दि.02 : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ते गडचिरोली येथे खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलत होते. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सादरीकरण केल्यानंतर ते उपस्थितांना उद्देशून बोलत होते. शेतकऱ्यांच्या धावपळीच्या मौसमात अनेक खते व बियाण्यांचे पुरवठादार फसवणूक करतात. यातील काळाबाजार व भेसळ रोखण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरवठादारांची बैठक घेऊन याबाबत त्यांना स्पष्ट सूचना देऊन काळाबाजार करणाऱ्या पुरवठादारांचे परवाने कायमस्वरूपी बंद करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक श्री.निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात 1.34 लक्ष शेतकरी खातेदार आहेत. एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वहिताखालील 2.54 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील 67000 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यात खरीप 2.09 लाख हेक्टर, 0.36 लाख हेक्टर रब्बी व उन्हाळी 0.09 लाख हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी गेल्या वर्षी झाली. यावर्षी एकूण 225940 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात पेरणी करण्याचे नियोजन आहे. यात भात 1.87 लाख हेक्टर, मका 3000 हेक्टर, तूर 8000 हेक्टर, सोयाबीन 1600 हेक्टर, तीळ 900 हेक्टर व कापूस 21120 हेक्टर वर करण्याचे नियोजन आहे.
पालकमंत्री फडणवीस यांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसार चढउतार होण्याची शक्यता असल्याने पिक वाचविण्यासाठी उपाययोजनांचे नियोजनही कृषि विभागाला करण्याचे सांगितले. तसेच जलयुक्त शिवार योजनेतून कामे हातात घेऊन पावसाचे पाणी जास्तीत जास्त कसे साठवून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. जर आपण पाणी अडवून जिरविले तर निश्चितच रब्बी पिकांनाही फायदेशीर ठरेल. यातून जिल्हयातील उत्पादकता वाढेल. कृषिविषयक योजनांच्या प्रसारासाठी कार्यशाळा, बैठकांचे आयोजन गावागावात करा. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद मोहिम वाढवा, यातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ गतीने मिळण्यास मदत मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात बागायती पिकांनाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. यासाठी चांगला आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक योजना तयार करण्याचा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र वाढले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना स्थैर्य प्राप्त होईल असे प्रतिपादन त्यांनी बैठकीत केले. त्यामुळे आता येणारा खरीप हंगाम यशस्वी करा असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. पिक कर्ज मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक असून शेतकऱ्यांचा पिक विमाही काढून त्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे व महिलांसाठीच्या शासकीय योजना या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.
स्मृती उद्यान व एकल केंद्राचे लोकार्पण-
गौण वन उत्पादनांच्या संबंधात ग्रामसभांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतांचा विकास एकल केंद्रातून केला जात आहे. आतापर्यंत 543 ग्रामसभांतून 218 ग्रामसभा प्रशिक्षित केल्या. यातील 1166 प्रतिनिधींनी प्रशिक्षण प्राप्त केले आहे. या एकल केंद्राच्या नव्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्मृती उद्यानाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. याचे लोकार्पण पालकमंत्री फडणवीस यांचे हस्ते संपन्न झाले. सदर उद्यान वन विभागामार्फत चालविले जाते. जिल्हा मुख्यालयी असलेले उद्यान आता सुरू झाल्याने नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.