BREAKING NEWS:
अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृहाची सुविधा निर्माण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Summary

अमरावती, दि. 17 : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे वसतिगृहाची गरज आहे, तिथे ते पूर्ण करून देण्यात येईल. जुलैमध्ये याबाबतचा आराखडा पूर्ण होईल. त्यामुळे जिल्ह्यातून आवश्यक प्रस्ताव द्यावेत, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी परतवाडा येथे सांगितले. परतवाडा येथे आदिवासी मुलांचे […]

अमरावती, दि. 17 : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जिथे जिथे वसतिगृहाची गरज आहे, तिथे ते पूर्ण करून देण्यात येईल. जुलैमध्ये याबाबतचा आराखडा पूर्ण होईल. त्यामुळे जिल्ह्यातून आवश्यक प्रस्ताव द्यावेत, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी परतवाडा येथे सांगितले.

परतवाडा येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह क्र. एकच्या इमारतीचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते झाले. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चुभाऊ कडू, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, अपर आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिकताना निवासाची सुविधा असावी म्हणून वसतिगृहे आवश्यक आहेत. त्यामुळे आवश्यक सर्व ठिकाणी वसतिगृह निर्माण करण्यात येतील. आमदार बच्चूभाऊ कडू यांनी अथक प्रयत्न करून या वसतिगृहासाठी जागा मिळवून दिली. त्यामुळे हे वसतिगृह पूर्णत्वास आले आहे. येथे

रस्त्याची सोयही केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रे, क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी  प्रकल्प निर्माण करण्यात येईल. घर नसलेल्या आदिवासी बांधवांना घर मिळवून दिले जाईल. येत्या दोन वर्षात सर्वांना घरे दिले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सैन्यदलातील अग्निवीर, तसेच इतरही स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने वसतिगृहांत मार्गदर्शन केंद्रे विकसित करावीत, तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणही मिळावे, असे खासदार डॉ. बोंडे यांनी सांगितले. मेळघाटातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षकांची भरती असावी जेणेकरून ते आपल्या परिसरातील मुलांना त्यांच्या भाषेत शिकवू शकतील. पर्यायाने शिक्षणाचीही गुणवत्ता वाढेल, असे खासदार श्रीमती राणा यांनी सांगितले.

आमदार श्री. कडू म्हणाले की, अनेक वसतिगृहे भाड्याच्या इमारतीत आहेत. हे लक्षात घेऊन कायमस्वरूपी वसतिगृहासाठी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला जागा मिळवण्यात अनेक प्रशासकीय अडथळे आले. ते दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. अखेरीस जागा मिळून काम पूर्ण झाले याचा आनंद आहे. आता शासनाने विभागीय स्तरावरही सर्व सुविधायुक्त वसतिगृहांची निर्मिती करावी. वसतिगृहापर्यंत चांगला रस्ता व वाचनालय व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मेळघाटात मुलां-मुलींसाठी धारणी व चिखलदरा येथे आणखी शासकीय वसतिगृहांची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. पटेल यांनी सांगितले. वनहक्क जमीन पट्टेवाटपही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

वसतिगृहाबाबत…

वसतिगृहाच्या इमारतीचे क्षेत्रफळ 1059.38 चौरस मीटर असून विद्यार्थ्यांसाठी वीस कक्ष उपलब्ध आहेत. वसतिगृहात वाचनालय, करमणूक कक्ष, स्वच्छतागृहे, गरम पाण्यासाठी सौर ऊर्जा उपकरणे, दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी, क्रीडा साहित्य आदी विविध सुविधा आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशानंतर पुस्तक खरेदी साठी साडेचार हजार रुपये रक्कम डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. गणवेशासाठी प्रति विद्यार्थी दोन हजार रुपये, सहलीसाठी दोन हजार रुपये व प्रकल्प किंवा प्रात्यक्षिकासाठी एक हजार रुपये तसेच निर्वाह भत्ता म्हणून प्रतिमाह 500 रुपये आधी सुविधा दिल्या जातात.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *