अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करा – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार विभागातील पूरपरिस्थिती व नुकसानीचा आढावा
Summary
कायम पुरामुळे बाधित गावांचे पुनर्वसन अतिवृष्टीमुळे रस्त्यांच्या नुकसानीचे प्रस्ताव पाठवा कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज नागपूर, दि. 01 : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील पंचनामे पूर्ण करताना शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन एकही शेतकरी सुटणार नाही, याची खबरदारी घेत त्यासंदर्भातील संपूर्ण […]
कायम पुरामुळे बाधित गावांचे पुनर्वसन
अतिवृष्टीमुळे रस्त्यांच्या नुकसानीचे प्रस्ताव पाठवा
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज
नागपूर, दि. 01 : अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील पंचनामे पूर्ण करताना शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन एकही शेतकरी सुटणार नाही, याची खबरदारी घेत त्यासंदर्भातील संपूर्ण अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिलेत.
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित गावांसोबतच रस्ते, शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषानुसार तयार करुन पाठविल्यास झालेल्या नुकसानीसंदर्भातील निधी संबंधित जिल्ह्याला तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीसंदर्भातील संपूर्ण अहवाल प्राधान्याने सादर करावेत, असे निर्देशही यावेळी श्री. वडेट्टीवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील पूरपरिस्थिती व झालेल्या नुकसानीचा जिल्हानिहाय आढावा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीस विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर., वर्धाच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडाऱ्याचे संदीप कदम, दूरदृष्य प्रणालीद्वारे गोंदियाच्या नयना गुंडे, गडचिरोलीचे दीपक सिंघला, चंद्रपूरचे अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महसूल उपायुक्त मिलींद साळवे, तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जीवित व वित्तहानी झाली असून शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या कुटुंबांना मदत देताना कोकणात तसेच इतर भागात करण्यात आलेल्या मदतीच्या निकषानुसारच विदर्भातील बाधित कुटुंब व शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीसंदर्भातील अहवाल तयार करुन शासनाला सादर करावेत, असे निर्देश श्री. वडेट्टीवार यांनी दिलेत. पुरामुळे कायमस्वरुपी बाधित होणाऱ्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यासाठी गावनिहाय प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतचे जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करुन यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांमार्फत करण्यात यावी. तसेच मागील वर्षीसुद्धा खराब झालेल्या रस्त्यांचा समावेश करावा. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातील प्रलंबित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
पुरामुळे बाधित होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव सादर करताना ‘एसडीआरएफ’च्या निकषाची पुर्तता करावी. या निकषानुसारच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूर विभागात पुरामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशा रस्त्यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. यामध्ये मागील वर्षी बाधित झालेल्या रस्त्यांचाही समावेश करावा. गावाजवळून वाहणा-या नदी व नाल्यांचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनासुद्धा बाधित होत असल्यामुळे सिंचन विभागामार्फत नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. पुरामुळे शेतक-यांच्या विहिरी गाळाने भरल्यामुळे त्यांची दुरुस्ती महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर विभागात सरासरी 55.94 टक्के पाऊस पडला असून सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात 72.36 टक्के, नागपूर 55.51, वर्धा 58.33, भंडारा 52.13, गडचिरोली 50.28 तर गोंदिया 47.02 टक्के पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी व पुरामुळे विभागातील 145 रस्ते तसेच त्यावरील पुलांमुळे वाहतूक विस्कळीत होते. विभागातील प्रमुख जलाशयांमध्ये 57.15 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. यामध्ये मोठ्या जलाशयांमध्ये नागपूर जिल्ह्यात 60.49, वर्धा जिल्ह्यात 64.83, भंडारा 39.39, गोंदिया 25.33, चंद्रपूर 97.23 तर गडचिरोली जिल्ह्यात 37.59 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे.
विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी स्वागत करुन नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टी व्यवस्थापनासाठी जिल्हा व तालुकास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण यंत्रणा सतर्क राहील, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यात आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेले शेतपिकांचे, घरांचे तसेच मनुष्य व पशुहानीसंदर्भात झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येत असल्याचे सांगितले.
कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा व त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली.