ऍडव्हान्स कोर्स ऑफ रेंजर लीडर- एक अनुभव
निमित्त होते….मध्यप्रदेश मधील राष्ट्रीय प्रशिक्षण सेंटर, पचमढी येथे आयोजित 1 ते 7 एप्रिल २०२३ चे *ॲडव्हांस कोर्स ऑफ रेंजर लिडर प्रशिक्षणाचे.
बेसिक रेंजर लीडरचे प्रशिक्षण 2014 मध्ये पचमढी येथे पूर्ण केले. तेव्हा सेवा देणे हेच आमचे प्रमुख कार्य आहे असे आम्ही गृहीत धरून चाललो होतो. त्यानंतर ॲडव्हान्स रेंजर लीडर कोर्स करायचा की नाही हे आम्ही ठरवलं नव्हतं. पण जेव्हा आम्हाला कळलं की, आमचे विद्यार्थी राज्य पुरस्कारासाठी आणि राष्ट्रपती पुरस्कारासाठी फक्त ॲडव्हान्स रेंजर लिडर ची ट्रेनिंग केल्यानंतरच बसवू शकतो तेव्हा विद्यार्थ्यांना समोर आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आम्हाला हा कोर्स करावासा वाटला आणि आम्ही विचार केला की आपण हा कोर्स करायचा. आणि तशी संधी चालून आली होती. आम्हाला फेब्रुवारी महिन्यातच प्रशिक्षणाचे पत्र प्राप्त झाल्यामुळे आमचे हे स्वप्न पूर्ण होणार होते.
मग काय आमच्या हालचाली सुरू झाल्या. प्रा.संध्या मॅडम आणि प्रा. विजया, आम्ही दोघी तयारीला लागलो.आमच्या जिल्ह्यातून आम्ही दोघी या कोर्स साठी रजिस्ट्रेशन केलं. पुढे जाऊन उत्साहाच्या भरात आम्ही रेल्वेचे रिझर्वेशन ही करून टाकले.आम्हाला 31 तारखेला निघायचं होतं गडचिरोली वरून नागपूर आणि तिथून रात्री 7. 40 ची ट्रेन.परंतु निघायच्या एक दिवस आधी अडचण आली ती म्हणजे आमचं कन्फर्मेशन लेटर आले नव्हते. मनामध्ये एक प्रकारची धाकधूक होती की आम्हाला रिझर्वेशन कॅन्सल करावे लागणार की काय?पण तरीही आम्ही आमचे प्रयत्न सोडले नाहीत. आमच्या जिल्हा संघटिका आदरणीय नीता आगलावे मॅडमशी आम्ही चर्चा केली आणि त्यांनीही इकडे तिकडे चौकशी करून आम्हाला शेवटी ते कन्फर्मेशन ऑर्डर मिळवून दिले आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला.
31 तारखेला सकाळी लवकर उठून तयारीला लागलो.दुपारी 1.00 वाजता ची बस पकडली आणि नागपूरला पोहोचलो. नागपूर बस स्टॉप वरून रेल्वे स्टेशनवर जायला ऑटो केला. ऑटोवाल्याने आम्हाला आठ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर नेऊन सोडलं, तेही रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला……
पण तिथे गेल्यानंतर माहीत पडलं की गाडी पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे. मग काय?आमची एकच तारांबळ उडाली.तिथून मग जिवाची कसरत करत पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर येवून उभे राहिलो. आम्हाला थोडी भीती वाटली की गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार….. इकडून की तिकडून…… असे नाना प्रकारचे विचार आमच्यासमोर उभे होते. कारण यापूर्वी आम्ही एकट्यांनी कधीच प्रवास केला नव्हता. आमच्यासोबत कोणी न् कोणी असायचे. 2018 मध्ये आम्ही ओरिसा येथे जांबोरीला जाऊन आलो पण तिथेही आमच्याबरोबर दहा मुली आणि चंद्रपूरचे काही स्काउट होते. पण आता आम्ही दोघीच आणि तीही रात्रीची ट्रेन.. त्यामुळे आम्ही मोठ्या हिमतीने रेल्वे स्टेशन वरती प्लॅटफॉर्म वर ट्रेनच्या प्रतीक्षेत उभे ठाकलो.
नियोजित वेळेपेक्षा गाडी थोडी उशिरा आली आणि शेवटी एकदाचं आम्ही गाडीत चढलो आणि आमचा प्रवास सुरू झाला.गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही जेवण केलं.. आणि मग आम्ही सकाळचे स्वप्न घेऊन झोपी गेलो.
पण तरीही सकाळी 3:40 ला गाडी पिपरिया रेल्वे स्टेशनला थांबणार होती आणि तीही दोन मिनिटांसाठी.तेव्हा आम्हाला नीट झोपही लागली नव्हती कारण रेल्वे स्टेशन केव्हा येईल आणि केव्हा निघून जाईल याची पण धाक धूक मनामध्ये असल्याने स्वस्थ झोपीही जाऊ शकत नव्हतो आणि अर्ध्या झोपेमध्येच आम्ही ती रात्र काढली. बरोबर साडेतीन वाजता आम्हाला जाग आली तेव्हा कळलं की पिपरिया रेल्वे स्टेशनच्या आपण जवळ आहोत. आम्ही सावध झालो.सामान व्यवस्थित काढून ठेवला.दारात आलो तेंव्हा आमच्या सोबत असणारे सहप्रवासी सुध्दा पिपरीया येथे उतरणारेच असल्यामुळे त्यांनी आम्हाला स्टेशनवर उतरण्यासाठी मदत केली.
आम्ही स्टेशन वरती उतरलो तर खरे ,पण आमच्यासाठी रेल्वे स्टेशन नवीन होते, कारण यापूर्वी आम्ही पचमढीला बसनी गेलो होतो. त्यामुळे आता पुढे काय करायचे? बसने जायचं की टॅक्सीने जायचं हे ठरलेलं नव्हतं. बसनी जायचं म्हटलं तर सहा वाजता शिवाय बस सुटणार नव्हती…. आम्ही चौकशी केली की बस डेपो कुठे आहे. आम्ही थोडे रेल्वे स्टेशनच्या समोर पण गेलो होतो पण नंतर कळलं की बस सहा वाजता सुटणार नव्हती. सकाळचे चार वाजले होते आता काय करायचं. जाण्यासाठी आम्ही गाडी शोधू लागलो तेवढ्यात कोणीतरी आवाज मारला “आना है क्या पचमढी? आम्ही पाहिलं आमच्या सारखेच कोणीतरी प्रशिक्षणार्थी गाडीत बसलेले होते आणि ते पचमढीला जाणारे होते.तेव्हा आम्ही अजिबात विचार न करता गाडीत बसलो आणि त्यांनी आम्हाला नॅशनल ट्रेनिंग सेंटर इथे नेऊन सोडले ..
सकाळी सहा वाजता आम्ही सेंटरला प्रवेश मध्ये केला . मागून एक प्रशिक्षक आले आणि आमच्या दोघिंच्याही बॅग उचलून सेंटर पर्यंत पोहचविन्यास मदत केली.Ranger motto is service ह्याची प्रचिती प्रवेश करताना झाली. आपलं सगळ सामान घेऊन मुख्य ठिकाणी जाऊन पोहोचलो.. नऊ वाजता रजिस्ट्रेशन सुरू झाले. रजिस्ट्रेशन मध्येही अडचणी आल्या, त्यामध्ये चार्टर नंबर ,अधिकार पत्र यांचा घोळ.आम्ही परत आमच्या जिल्हा संघटिका नीता आगलावे मॅडम यांना फोन केला, त्यांनी त्वरित आम्हाला आमचा चार्टर नंबर काढून दिला आणि आमचे रजिस्ट्रेशन सुरळीतपणे पार पडले.
त्यानंतर आम्हाला आमचे ठिकाण दाखवण्यात आले आणि ते बघतांना डोळ्यासमोर 2014 वर्ष तरळले. तेच स्थळ, तेच ठिकाण. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.आम्हाला संध्याकाळी पाच वाजता कॅम्पिंग क्षेत्रात हायकिंगला नेण्यात आले. प्रशासकीय ब्लॉक, सरदार लक्ष्मण सिंह स्मारक, डॉ. के. खंडेलवाल कक्ष, नॅशनल एडवेंचर इन्स्टिट्यूट, श्री दीनदयाल नायडू स्मारक, राजेंद्र गिरी उद्यान, विजय क्षेत्र विकास प्राधिकरण (साडा) पार्क, नागेजीया पार्क, विवियन पार्क,अशा कॅम्पिंग क्षेत्रांना पुन्हा भेटलो.त्यापैकी प्रशासकीय ब्लॉक (सेठ करोडीमल भवन) चे नाव एका परोपकारी सेठ किरोडीमल यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आम्हाला दिसले बी.पी. मेमोरियल गाईड भवन.भारताचे पहिले राष्ट्रपती स्व. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या भवनची आधारशिला ठेवली गेली आणि उद्घाटन 22 फेब्रुवारी 1961 मध्ये लेडी बेडन पॉवेल यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारती मध्ये सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक खोलीचे नाव त्या त्या राज्यांच्या नावाने ठेवले गेले आहे. यानंतर आम्ही भेट दिली कुंजरु हॉलला. या हॉलचे नाव पहिले राष्ट्रीय आयुक्त डॉ. हृदयनाथ कुंजरू यांच्या नावाने ठेवले गेले आहे. या हॉलमध्ये एकाच वेळी 400 स्काऊट आणि गाईड बसण्याची क्षमता आहे. बी.पी. भवन पहाडीच्या खाली निर्देशक, लीडर ट्रेनर, एडवेंचर प्रोग्राम ऑफिसर्स, ऑर्डर मास्टर सदस्यांना सुद्धा राहण्याची सोय आहे.त्यानंतर आम्ही गेलो *फेरिस लायब्ररी* कडे. क्विनी पार्क मध्ये असणाऱ्या या वाचनालयाचे नाव मॅडम आयरिश फेरिसच्या नावाने ठेवण्यात आले आहे. यामध्ये गाईड विंग शी संबंधित पुस्तकांचा खजिना आहे.
राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राचे एक वैशिष्ट्य हे आहे की, यातील अनेक क्षेत्रांची नावे स्वयंसेवकाच्या नावावर तथा त्यांच्या विशिष्ट सेवाकार्याच्या तसेच स्काऊट – गाईड चळवळीच्या प्रती प्रेम आणि कर्तव्याच्या आधारे ठेवण्यात आले आहे, जे दुसऱ्यांसाठी एक प्रेरणा स्त्रोत्र बनले आहेत. तर अशा अनेक कैंपेन क्षेत्रांना पुन्हा भेटलो आणि आपल्या तंबूकडे परतलो.
परत येताना वाटेत निलगिरी,लेडिया,कारधई असे अनेक प्रकार चे वृक्ष दृष्टीस पडले.निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही तंबूत परतलो.रात्रीचं जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी तंबूत विसावलो.परंतु झोप तर लागली नाहीच कारण थंडी मी मी म्हणत होती. नुकताच पाऊस येऊन गेल्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. हाडं गोठविणारी थंडी म्हणतात ना, अगदी तोच प्रकार. सकाळी लवकर उठायचं होतं. दैनिक रूटिन तयार होतं. आम्हीं एकत्र गेलो असलो तरी तिथे मात्र वेगवेगळ्या टीम मध्ये आम्ही विभागल्या गेलो होतो. सगळे अनोळखी. तरी सुद्धा हे टीम वर्क असल्याने एकमेकांना उठवावं लागलं. आणि अगदी त्या क्षणापासून आम्ही एकमेकांना समजून घ्यायला लागलो. त्यामुळे पहाटे ४.४५ ला उठून तयारी केली. सकाळीं 6.30 वाजता बी.पी. सिक्स साठी तयार झालोत. त्यानंतर आमचे दैनिक रूटिन पुन्हा सुरू ७.३० ला तंबू निरीक्षण,८.०० वाजता ध्वजारोहण. त्यानंतर नाश्ता.९.०० पासून पुढे सेशन सुरू झाले की रात्री कॅम्प फायर नंतर च थांबायचे.रात्री १०.०० वाजता समाप्ती.
पण आमचे खरे खुरे काम रात्री दहा नंतर च सुरू व्हायचे..आम्हाला मिळालेलं गृहकार्य, गॅझेट बनविणे, यामुळे झोपायला रोज बारा ते एक वाजायचे. सकाळी लवकर उठून परत तयारी . सुरुवातीला वाटलं की उगीचच आपण या ट्रेनिंगला आलो. अशाप्रकारे एक एक दिवस निघून जात होता. सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं. कुणी मुलींसारख्या, कुणी लहान तर कोणी मोठ्या बहिणींसारख्या प्रशिक्षणार्थी एकमेकांवर जीव लावत होते, काळजी घेत होत्या.यामध्ये आमचे महाराष्ट्र राज्य पण होते. तसेच गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, अशा विविध राज्यांमधून, जिल्ह्यांमधील प्रशिक्षणार्थी दाखल झाले होते. येथे येऊन जणू टीम इंडियाच तयार झाली होती.
आमच्या प्रशिक्षक छत्तीसगढ च्या स्टेट ट्रेनिंग कमिशनर सरिता पांडै मॅम,उत्तरा माणिकपुरी मॅम,उषा मॅम,बेबी मॅम यांचे सुद्धा आभार मानले पाहिजेत.कारण त्या प्रशिक्षक कमी आणि आम्हाला समजून घेणाऱ्या जास्त होत्या.
तर अशा खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षणाचे पाच दिवस केव्हा पार पडले हे कळलेच नाही. आणि 6 दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या कार्यात व्यस्त होतो .कोणी हट बनवण्यात व्यस्त होते तर कोणी डायनिंग टेबल. सर्वांनी आपले प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर एक सेल्फी काढण्यासाठी आपापल्या पर्स मध्ये हात घातला.पण नको ती घटना घडली.संध्याचा फोन काही हाताला लागला नाही. पाहता पाहता ही गोष्ट सर्वत्र पोहचली..आमच्या प्रशिक्षकांच्याही लक्षात ही बाब आली.सरिता मॅम नी मला सर्वांची पर्स ,बॅग तपासायला सांगितलं.तरी सुद्धा फोन मिळाला नाही. फोन ९२ टक्के चार्ज असतांना सुद्धा तो स्विच ऑफ दाखवत होता याचाच अर्थ कोणी तरी तो फोन चोरला होता ,हे स्पष्ट होते.तेव्हा प्रसंगावधनता ओळखून संध्या मॅम नी आपल्या मिस्टरांना सांगून फोनचे सर्व अकाउंट बंद केले. आमचा ज्यांच्यावर संशय होता, त्यांच्या बाबतीत मी थोडी अलर्ट झाले होते. आणि योग्य वेळ येताच संधी मिळाली.ज्या प्रमाणे शिकाऱ्याने शिकार करावी किंवा पाण्यामध्ये गळ टाकल्यानंतर अकस्मात गळाला मासा लागावा त्या प्रमाणे फोन हाती लागला. आणि आम्ही एकदम अवाक् झालो… स्तब्ध होऊन एकमेकांकडे फक्त पाहत होतो.
“स्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊल पुरेसे असते, त्याचप्रमाणे माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो”. या प्रसंगाने विश्वासघात कशाला म्हणतात याची खरी खुरी प्रचिती आली. घटना ही तशीच घडली होती.त्यादिवशी कळलं ज्यांच्यावर वर पूर्ण विश्वास टाकावा. जिला आपल्या मुलीसमान मानावे,तिने चक्क पाठीत सुरा खुपसला होता. आम्हाला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती.ती तर माफी मागून मोकळी झाली.
पण ही घटना आमच्या मनाला व्यथित करून गेली.मनाला झालेली ही जखम कधी भरून निघणारी नव्हती.फोन मिळाल्याचा आनंद होण्यापेक्षा विश्वासघात झाल्यामुळे अश्रुंनी आपली वाट मोकळी केली.
त्याच मनःस्थितीत तो दिवस पार पडला.
ट्रेनिंग चा शेवटचा दिवस उजाडला.. सगळ्यांना आपापल्या घरट्यात परतण्याची घाई.
त्या दिवशी आम्ही सामानाची बांधणी केली. शिबिरातून घेतलेले जे काही सामान होते ते आम्ही परत केले. जो गृप फोटो काढून घेतलेला होता तो फोटो आम्हाला मिळाला .. सगळे एकमेकांचा निरोप घेत होते.आमच्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी कविता आंबेकर मॅम आणि संध्या यादव मॅम यांचे सुद्धा आम्हाला खूप सहकार्य लाभले… आम्ही सर्व मिळून पिपरिया रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी कॅब केली. आणि सहा वाजता आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. आम्ही पिपरिया येथील अल्का हॉटेल मध्ये एकत्र जेवण घेतलं. आमच्या गाडीला वेळ होता.. आमची गाडी रात्री 11.50 ची होती तर मुंबई करांची गाडी 9.30 वाजताची होती.त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो.. तिथे पुन्हा आमचे सहप्रवासी आम्हाला भेटले… कोणी आठच्या गाडीने निघून गेले तर कोणाचे दुसऱ्या दिवशी सकाळी रिझर्व्हेशन होते. आम्ही गाडीची वाट पाहत त्या ठिकाणी थांबलो.. नियोजित वेळेपेक्षा
गाडी पंधरा-वीस मिनिटे उशिरा आली.बारा वाजून वीस मिनिटांनी गाडी आली आणि आम्ही गाडीमध्ये प्रवेश केला.आपल्या तिथेही आमच्या गाडीच्या डब्यामध्ये एकही प्रवासी नव्हता पूर्ण बोगीमध्ये फक्त आम्ही दोघी.तरी सुद्धा मोठ्या हिंमतीने त्या ठिकाणी ती रात्र काढली.. दुसऱ्या दिवशी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी नागपूर रेल्वे स्टेशन आम्हाला उतरायचं होतं. त्यामुळे त्या दिवशीही पूर्णपणे आम्ही झोपू शकलो नव्हतो.. मग एकदाचं आम्ही नागपूर रेल्वे स्टेशनला आलो, तिथे आम्ही आमचा सामान उतरवला आणि बस स्टॉप कडे जाण्यासाठी रवाना झालो… गडचिरोलीची बस पकडण्यासाठी…. पण आणखी एक गंमत झाली जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशन वरून बस स्टॉप कडे जायला निघालो होतो त्यावेळेस आम्ही नाश्ता करण्यासाठी विचार केला… तेव्हा एक ऑटोवाला तिथं आला आणि म्हणाला, “इथं काय नाश्ता करताय तुम्हाला मी बस स्टॉप वर सोडून देतो तिथेच तुम्ही नाश्ता करा ” ठरलं. आम्ही ऑटो मध्ये बसलो.. आणि थोड्याच अंतरावर ऑटो बंद पडला… आम्ही त्याला विचारलं की आटो का बंद पडला तर त्याने सांगितलं पेट्रोल संपला असेल …. परत त्याचा ऑटो सुरू झाला. इकडे पाऊस पडायला सुरुवात झाली होती… परत दुसऱ्यांदा ऑटो बंद पडला.. त्याने थोडा दूर धक्का दिला तो म्हणाला की काही नाही गाडी सुरू होते थोडा दूर गेल्यानंतर परत बंद पडला…. पाऊस सुरू झाला ..आम्ही इथेच अडकतो की काय असं वाटायला लागलं… पुढे मग त्याने एक दोन ऑटोवाल्यांची मदत घेतली आणि मग पेट्रोल पंपवर जाऊन ऑटो मध्ये पेट्रोल भरले आणि शेवटी आम्हाला बस स्टॉप वरती नेऊन सोडले..
तिथे उतरल्यानंतर आम्ही बस गाठली..
बस लागलेलीच होती…. बस बरोबर दहा मिनिटांनी सुटली आणि ज्याप्रमाणे आकाशात उडालेल्या पक्ष्यांना आपल्या घरट्यांकडे परतण्याची ओढ लागावी, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आमच्या घराकडे परतण्याची ओढ लागलेली होती…. याची जाणीव जणू ड्रायव्हरला होती म्हणून की काय चार तासात पोहचवणारी बस केवळ तीन तासांमध्ये गडचिरोलीला पोहोचवली.. अशाप्रकारे आमचा हा प्रवास कडूगोड आठवणी घेऊन संपन्न झाला..
प्रा. संध्या शेषराव येलेकर