महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास – रोहयोमंत्री संदिपानराव भुमरे. शासन निर्णय जारी
मुंबई, दि. 2 : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिली. याविषयी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.भुमरे म्हणाले, आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. महाराष्ट्रातील बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांतून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळांचा परिसरही सुंदर असणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि हिरवाईने नटलेल्या परिसरात शिकणे आणि शिकवणे या दोन्ही प्रक्रिया आनंददायी होतील. अशा परिसरात दिवसभर मन प्रसन्न राहील. मुले शाळेकडे पर्यायाने शिक्षणाकडे आकर्षित होतील. शाळांचा परिसर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुंदर बनवणे शक्य असल्याने जिल्हा परिषद शाळांचा भौतिक विकास करण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनुज्ञेय असणारी काही कामे उपयुक्त ठरू शकतात असे त्यांनी सांगितले.
श्री.भुमरे म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील जैतादेही गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गटविकास अधिकारी, चिखलदरा पंचायत समिती आणि जैतादेही शाळेच्या शिक्षकांनी याबाबतचे नियोजन केले आहे. ‘जैतादेही पॅटर्न’ च्या धर्तीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्य आहे. अमरावती जिल्ह्याने यात पुढाकार घेतला असून साधारण ४०% शाळांचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर प्राप्त झाले आहेत.
इतर जिल्ह्यांनी सुद्धा अशीच कामगिरी बजावल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक दर्जा आणि गुणवत्तेमध्ये नक्कीच वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच अशा सुंदर परिसरात शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होण्यासही मदत होईल. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेण्याची मानसिकता पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी हातभार लागू शकेल. याचप्रमाणे अंगणवाड्यांचा सुद्धा भौतिक विकास व सुशोभीकरण करणे शक्य असल्याचे श्री.भुमरे यावेळी म्हणाले.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अंगणवाडी, शाळेसाठी किचन शेड, इमारतीसाठी रेन वॉटर हारवेस्टींग संरचना, परिसरात शोषखड्डे, multi-unit शौचालय, खेळाचे मैदान, संरक्षक भिंत, वृक्ष लागवड (बिहार पॅटर्न) आवश्यकतेनुसार शाळा, अंगणवाडीच्या परिसरात पेविंग ब्लॉक, बाहेर काँक्रिट नाली बांधकाम, शाळा, अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे, बोअरवेल पुनर्भरण (बोअरवेल असल्यास) गांडूळ खत प्रकल्प (यामध्ये तयार होणारे गांडूळ खत शाळा/ अंगणवाडीच्या परिसरातील झाडांसाठी वापरता येईल.) नाडेप कंपोस्ट आदी कामे करणे शक्य असल्याचेही श्री.भुमरे यांनी सांगितले.