शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना आखाव्या – किशोर तिवारी
यवतमाळ दि. 08 सप्टेंबर : जिल्ह्यातील अल्प भुधारक, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजेनुसार त्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजनांची आखणी करावी, तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देवून मदत करावी, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत श्री. तिवारी यांनी शेतकरी आत्महत्या, पीक कर्जाचे वितरण, कोरोना आजार व इतर बाबींचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी ओंकारसिंग भोंड आदी यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांना शेत मालाचा योग्य हमीभाव व बँकांनी पीक कर्जासाठी आगाऊ कागदपत्रे न मागता सुलभतेने पीक कर्जाचे वितरण होणे आवश्यक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना अन्न सुरक्षा योजना, सुलभरित्या पीक कर्जाचे वाटप, आरोग्य सुविधेंचा लाभ, बी-बियाण्यांची उपलब्धता, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, अत्योंदय योजनेचा लाभ, विविध शासकीय योजनांचा लाभातून उत्पादन वाढीस मदत, कृषी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन, शेत मालाला हमीभाव, कृषी विभागाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांना सुलभरित्या होणे गरजेचे आहे.
किशोर तीवारी पुढे म्हणाले की, मुद्रा योजने अंतर्गत विधवा महिलांना प्राधाण्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी मदत करावी. आदिवासी बांधवांची उपासमार न होता त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी खावटी कर्जाचे लक्षांक पूर्ण करावे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार न करणाऱ्या खाजगी हॉस्पीटलचे ऑडिट करून ज्यादा पैसे उकळणाऱ्यांकडून वसूली करण्यात यावी. ग्रामीण भागातील सर्वसाधारण नागरिकांना वैद्यकीय उपचाराचा खर्च येवू नये यासाठी जिल्ह्यात आरोग्याच्या सोयी सुविधा अद्ययावत करण्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.