वेणा नदी शोधयात्रेत प्राचीन लेणीला वेधची भेट (वेध प्रतिष्ठानच्या शोधयात्रेतील महत्त्वपूर्ण उपलब्धी)
Summary
कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित वेणा नदी शोध यात्रेत नदीचा अभ्यास करतांना शिरपूर भुयारी गावा नजीकच्या जंगलात एसवी सन चौथ्या पाचव्या शतकातील वाकाटक कालीन प्राचीन लेणीस भेट देऊन पुरातत्त्वीय दृष्ट्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेध प्रतिष्ठान […]

कोंढाळी -वार्ताहर-दुर्गाप्रसाद पांडे
वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित वेणा नदी शोध यात्रेत नदीचा अभ्यास करतांना शिरपूर भुयारी गावा नजीकच्या जंगलात एसवी सन चौथ्या पाचव्या शतकातील वाकाटक कालीन प्राचीन लेणीस भेट देऊन पुरातत्त्वीय दृष्ट्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वेध प्रतिष्ठान नागपूर ही विद्यार्थी, शिक्षक व समाजाकरीता चालविलेली शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी चळवळ असून २८ मे ते १ जून या कालावधीत काटोल तालुक्यातील चौकीगड येथून उगम पावणाऱ्या आणि हिंगणघाट तालुक्यातील सावंगी संगम येथे वर्धा नदीला मिळणाऱ्या वेणा नदीचा अभ्यास करण्यासाठी वेणा नदी शोधयात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोधयात्रे दरम्यान शिरपूर भुयारी परिसरात भग्न झालेल्या हेमाडपंथी मंदिरास भेट दिली. तेथील प्राचीन भग्न शिल्पे अभ्यासली. तसेच या परिसरातील जंगलात असलेली प्राचीन लेणीला भेट देऊन पुरातत्त्व अभ्यासक डॉ.मनोहर नरांजे यांनी या लेणीचे पुरातत्त्वीय महत्त्व विषद केले.
ही लेणी भूपृष्ठापासून खाली असून दोन तीन पायऱ्या उतरून आत मध्ये प्रवेश करावा लागतो. गर्भगृह आणि त्यापुढील ओसरी असे या लेणीचे स्वरूप आहे.ओसरीत प्रवेश करण्याचा मार्ग स्वतंत्र असून द्वार मंडपासारखा पुढे आहे. ओसरी पेक्षा गर्भगृह आणखी खोलात आहे. गर्भगृहच्या मध्यभागी एक आयताकार आकाराचे उंच पीठ आहे. त्यावर मूर्ती स्थापन करण्यासाठी खळगा केलेला आहे. ओसरी व गर्भगृहचे छत सपाट आहे. ओसरीच्या प्रवेशद्वाराचा उजव्या बाजूस छतानजीक एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. पण अक्षरे अस्पष्ट असल्यामुळे वाचणे अवघड ठरते. गर्भ गृहाचे प्रवेशद्वार अरुंद असून उंच आहे. ही लेणी पिवळ्या वालुकाष्म पाषाणात कोरलेली आहे. या शोधयात्रे दरम्यान प्रकशात आलेली या लेणी संदर्भातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे लेणीच्या ओसरीत छतावर केलेले रंगकाम हे होय. विदर्भात अशाप्रकारचे लेणी मध्ये रंगकाम आढळत नाही. कदाचित अशाप्रकारच्या लेणी मध्ये रंगकाम असण्याचा सर्वप्रथम पुरावा असावा असे मत पुरातत्त्व अभ्यासक डॉ. मनोहर नरांजे यांनी व्यक्त केले. ही लेणी वर्तमान शिरपूर म्हणजे प्राचीन श्रीपुर परिसरात एखादे प्राचीन नगर नांदत असताना बौद्ध श्रमाणांच्या वर्षाकालीन निवासासाठी या लेणीची निर्मिती झाली असावी असेही मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ.मनोहर नरांजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या शोधयात्रेत फूल पाखरू अभ्यासक डॉ.अश्विन किनारकर, पक्षी अभ्यासक डॉ.लोकेश तमगीरे, खुशाल कापसे, वसंत गोमासे, ओंकार पाटील, शंकर जीवनकर, कृष्णा चावके, घनश्याम भडांगे, कादंबरीकार कल्पना नरांजे, सृजन नरांजे प्रामुख्याने सहभागी आहेत.