रासायनिक खतांची दरवाढ त्वरित मागे घ्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
गोंदिया :- चक्रधर मेश्राम.विभागीय प्रतिनिधी, दि. 17 मे. 2021:-
केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. खताच्या प्रति ५० किलोच्या बॅग मागे ६०० ते ७०० रुपयांची दरवाढ केल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खतांच्या वाढविलेल्या किमती त्वरित मागे घ्यावात, अन्यथा या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंतप्रधानांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
कोरोनामुळे मागील वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात आहे ही बाब माहिती असताना सुध्दा केंद्र सरकारने त्यात भर घालत रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड दरवाढ करुन केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट केले आहे. हे सरकार केवळ उद्योगपतींचे हित साधणारे असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांना काही देणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने वाढविलेल्या खताच्या किमतीमध्ये केलेली दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी. यासंदर्भातील निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले. शिष्टमंडळात आ. मनाहेर चंद्रिकापुरे, माजी आ.राजेंद्र जैन,आ. सहषराम कोरोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, डॉ. अविनाश काशीवार, यशवंत गणवीर यांचा समावेश होता.