दिपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या – माजी न्या.बी जे कोळसे पाटील यांचे मत.
मुंबई विभागीय प्रतिनिधी दि. 26 एप्रिल 2021
दिपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचे माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी स्पष्ट मत आहे. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या बघितल्या. अगदी नजीकच्या काळातील सांगायचं झालं तर रोहित वेमुला, पायल तडवी, डेल्टा मेहवाल ही काही ठळक उदाहरणं देता येतील. या पिडीतांच्या यादीमध्ये दिपाली चे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. अत्यंत मागासलेल्या समाजातून येवून स्वतःचे एक स्थान निर्माण करणारी दिपाली ही समाजासाठी आदर्शच आहे. तिच्या कडून समाजातील सर्वच मुलींनी प्रेरणा घ्यावी, असा तिचा शेवट पर्यंतचा प्रवास लढवय्य राहीला आहे, हे येथे महत्त्वाचे आहे. समाजातील अशा आदर्श म्हणून उभ्या राहणाऱ्या लोकांना अशी पावले उचलण्यासाठी सतत भाग पाडले गेले आहे. आजवर अनेक मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या नाही तर सहकाऱ्यांच्या जाचासमोर हतबल होऊन शेवटचे पाऊल उचलले आहे. नोकरशाही मध्ये वरदहस्त नसणे, केवळ पगारावर जीवन अवलंबून असणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये हवी तशी एकी नसणे व जातिवाद्यांच्या बाजूला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे पाठबळ असणे ह्या त्याला खतपाणी घालणाऱ्या काही त्रोटक बाबी आहेत.
दिपाली सोबत जे घडलंय त्याची कल्पना आपल्या सगळ्यानाचं जगजाहीर माहिती झाली आहे. तिने लिहिलेले पत्र ही स्वयंस्पष्ट तर आहेच सोबतच मनात द्वेष निर्माण करणारे व अनेकांना नांगडे करणारे आहे. दिपाली ही मागासवर्गीय नसती आणि ती ब्राह्मण समाजाची असती तर परिस्थिति आज अत्यंत निराळी असती. एक तर तिच्यावर अशी वेळ आलीच नसती. दुसरं म्हणजे अस जर घडले असते, तर देशभर महिला कश्या असुरक्षित आहेत वगैरे मुद्दे मांडत उच्चवर्णीयांच्या महिला संघटना अत्यंत द्वेषाने सरसावल्या असत्या. खरतर दिपाली सोबत ही घडल्याचे कळल्यानंतर पहिले प्रथम ती नेमकी कोणत्या जातीची आहे याचाच शोध जास्त झाला. तिची जात कळल्या बरोबर ती केवळ एक महिला राहिली नाही. आता ती एक खालच्या जातीची महिला झाली होती. त्याचीच प्रचिती म्हणून आज दिपालीसाठी लढणाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी दिसते. केवळ एकच दिलासा आहे, तो म्हणजे जे लढतायत त्यांची अंतरआत्मा जागी आहे, आणि ते दिपालीचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत, ह्याची मला खात्री आहे.
दिपालीची आत्महत्या नसून तो एक संस्थात्मक खून आहे तसंच ते एक बलिदान एक शहीदत्व देखील आहे, हे आपण विसरता कामा नये. ते बलिदान, ते शहिदत्व हे एका स्त्री सोबत होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारे आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. सोबतच वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय ह्याची जाणीव करून देणारे हे बलिदान आहे.
दिपाली आपले डोळे उघडून गेली आहे, आता आपण कंबर कसून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. एक दीपाली गेली, पण इथून पुढे असे होता कामा नये, तिचे बलिदान वाया जाता कामा नये. संस्थात्मक अन्याय अत्याचारा विरुद्ध सुत्रबद्धरित्या लढून, आरोपींना अद्दल घडवलीच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वानी एकत्र येवून सर्व स्तरावरील लढाई लढली पाहिजे.
रेड्डी याला वाचवण्याचा प्रयत्न उच्च पदस्थ नोकरशाह पुरेपूर करीत आहेत, त्यांच्यावर केली जाणारी उच्च अधिकाऱ्यां मार्फतची चौकशी हा केवळ बनाव आहे, असा माझ्या अनुभव राहिलेला आहे असे स्पष्ट मत कोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. अत्यंत धूर्तपणे ही साक्षीदार आणि पुरावे बदलून प्रकरण कमजोर करतील व रेड्डीला सुटण्याचा मार्ग प्रशस्त करून देतील, हे होता कामा नये, व त्यासाठी कायदेशीर पावले उचलली पाहिजे असेही मत व्यक्त केले आहे.
दूसरा आरोपी शिवकुमार जरी तुरुंगात असला आणि त्याचा जामीन आज जरी नाकारला गेला असला तरी आपण बेसावध होता कामा नये, त्याला न्यायोचित शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यासाठीच निष्पक्ष तपास आणि दर्जेदार अभियोजन याची गरज आहे. अजून तरी होत असलेल्या तपासावर पूर्णपणे विश्वास नाही. अटक पूर्व जामीन नाकारलेला असताना देखील रेड्डी ला अटक करण्याचे टाळून राज्य सरकार व पोलिस यंत्रणेने आपला खरा रंग दाखवलेला आहे. तेंव्हा ह्या प्रकरणात विशेष तपास पथक नेमून त्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे व तशी मागणी पुरजोरपणे केली पाहिजे, आणि त्या अनुषंगाने सर्व मिळून जे काही न्याय पावले उचलावी. मग ते रस्त्यावरील आंदोलनाचे असो किंवा इतर कुठल्या लोकशाही प्रकारचे असो त्यात प्रत्यक्षपणे, परिणामांची चिंता न करता सोबत उभा राहणार असल्याचे बी. जे.कोळसे पाटील यांनी सांगितले आहे.
बी जे कोळसे पाटील
माजी न्यायमूर्ती
महाराष्ट्र