BREAKING NEWS:
अमरावती महाराष्ट्र हेडलाइन

जि. प. इमारतीसाठी ४९ कोटी ८३ लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता-पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

Summary

अमरावती, दि. २२ : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४९ कोटी ८३ लाख रुपये निधीला ग्रामविकास विभागाने मान्यता दिली असून, जिल्हा परिषदेसाठी एक अद्ययावत इमारतीची निर्मीती होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी […]

अमरावती, दि. २२ : येथील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी ४९ कोटी ८३ लाख रुपये निधीला ग्रामविकास विभागाने मान्यता दिली असून, जिल्हा परिषदेसाठी एक अद्ययावत इमारतीची निर्मीती होणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनेक प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

आधीची इमारत ब्रिटिशकालीन

जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत ब्रिटिशकालीन आहे. या इमारतीचे बांधकाम १८८९ मध्ये झाले आहे. इमारत काहीशी जीर्ण व शिकस्त झाल्याने इमारतीचे नूतनीकरण करणे शक्य नाही. जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्लॉट क्रमांक ३१/४ च्या क्षेत्रावर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून २९ हजार ५०० चौरस मीटर जागा जिल्हा परिषदेकडे देण्यास मान्यता दिली आहे.

जी प्लस फोर बिल्डिंग

जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये आदींसाठी सद्य:स्थितीतील जागा अपुरी पडत असल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत तळमजला अधिक चार मजल्यांची बांधण्याचा निर्णय झाला आहे. या इमारतीचे बांधकाम १२ हजार १९१ चौरस मीटर असेल. इमारतीच्या आराखड्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्रज्ञ यांनी मान्यता दिली असून लेआऊट प्लॅन, स्थळदर्शक नकाशा आदी कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत.

इमारतीसाठी नगर रचना  प्राधिकरण व अग्निशमन यंत्रणेची मंजुरी आदी प्रक्रिया वेळेत पार पाडावी. महिला पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आवश्यक व्यवस्था असावी, असे आदेश आहेत.

‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेचा समावेश

संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना व वायुविजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनर्भरण व जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *