“आई-वडिलांच्या डोळ्यात पाहिल्यास आम्हाला फक्त वेदना दिसतात”: आनंद तेलतूंबडे यांच्या मुलींचे खुले पत्र
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 25 एप्रिल 2021
_(The Caravan या मासिकात गेल्यावर्षी दिनांक 27 मार्च 2020 रोजी प्रकाशित झालेल्या प्राची तेलतूंबडे आणि रश्मी तेलतूंबडे यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पत्राचा हा अनुवाद.)_
16 मार्चला, आमच्या वडिलांच्या आयुष्यातील पुढील काही वर्ष कशी जातील याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेवून टाकला. त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी राज्यसत्ता 6 एप्रिलची वाट पहात आहे – एक असं सत्य ज्याबाबत आम्हाला कधीकाळी लिहावं वा बोलावं लागेल याची कल्पनाच केली नव्हती. हा निकाल ऐकल्यावर, जीवन थांबल्यासारखं झालंय, प्रत्येक दिवस सहानुभूती दाखवून आधार देणाऱ्या शुभचिंतकांच्या भेटीने व फोन कॉल च्या महापुराने भरलेला असला तरी. झोप न लागणाऱ्या रात्री व थकलेले डोळे हा नित्यक्रम झालाय. समोर आलेल्या परिस्थितीशी झुंज देण्याचा आमचे कुटुंब अटीतटीने प्रयत्न करत असतानाच निराशा, अस्वस्थता व असहाय्यतेच्या भावनेनं मनात घर केलंय. एखाद्या निरपराध व्यक्तीची अटक त्याच्या कुटुंबियांची व निकटवर्तीय मित्रांची अशी गत करुन टाकते.
जे ऑगस्ट 2018 ला एका पत्रकार परिषदेत फक्त “कॉम्रेड आनंद”- इत्तर काहीही तपशील नसलेली – बनावट पत्रं न्यूज़ कँमेरा समोर दाखवून सुरू झालं ते आज आमच्या वडिलांच्या अटकेपर्यंत येवून ठेपलंय. घडलेल्या गोष्टींबाबत आम्ही पुन्हा मागे वळून पाहतो तर दोनच प्रश्न समोर दिसतात: पहिला, कुठल्यातरी व्यक्तीकडून मिळविलेल्या पत्रातील व्यक्तीचं पहिलं नाव आमच्या वडिलांच्या पहिल्या नावाशी मेळ खातं फक्त एव्हढ्याच कारणावरून आमच्या वडिलांना कसं गुंतवले जावू शकते ? “आनंद” चा उल्लेख हा आमचे वडील डॉ. आनंद तेलतूंबडे सोबत कसा जोडला जावू शकतो ? आम्हाला नैराश्य आणणारा दुसरा प्रश्न म्हणजे UAPA हा कायदा लावणे होय – एखादा व्यक्ती ज्याच्या विरोधात इवलासाही सत्य पुरावा नाही त्याला ‘जामीन’ मिळविण्याचा पर्याय न देता डांबून ठेवणे कितपत योग्य आहे ? आम्हाला चिंता याची आहे की एकीकडे आमचे वडील व इत्तर आरोपींचे संवैधानिक अधिकार व नागरी स्वातंत्र्य राज्यसत्ता निर्लज्जपणे छीनून घेवू शकते तर त्याचवेळी त्यांनी खरंच गुन्हा केलाय की नाही हे सिद्ध करणारा खटला वर्षानुवर्ष रेंगाळत राहणार.
ऑगस्ट 2018 मध्ये हे दिव्य आमच्या पाठी लागल्यापासून, कायदा पाळणारे नागरिक या नात्याने, आम्ही घरात नसतांनाही आमच्या घरावर टाकलेली धाड आम्ही शांतपणे होवू दिली; कित्येक तास सलग चालणाऱ्या चौकशीला आमचे वडील दोनदा सामोरं गेले; आणि त्यांनी त्यांच्यावर लावलेल्या सर्व आरोपांचे खंडन करणारे पुरेसे पुरावे सादर केले. तरीही आम्हाला शासनाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय, सोशल मिडियावर आमचे वडील व इत्तर आरोपींना बदनाम करणाऱ्या अपमानजनक पोस्ट्स बद्दल न बोललेलंच बरं, यांतील पुष्कळ पोस्ट्स अशा व्यक्तींच्या आहेत ज्यांना ते हल्ला करत असलेल्या लोकांच्या कामाबद्दल यत्किंचितही माहिती नाही.
आमच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत जेंव्हा आम्ही पाहतो, तेंव्हा त्यांत आम्हांला वेदनाच फक्त दिसतात. दोघांनीही पासष्टी ओलांडलीय. माझी आई डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची नात आहे. आमचे वडील अत्यंत कष्टाळू व्यक्ती आहेत ज्यांनी संघर्ष करुन एक निष्णात विध्यार्थी, एक विद्वान व कॉर्पोरेट क्षेत्रातील एक वजनदार व्यक्ती म्हणून नाव कमावलंय. देशांतील शोषित, दडपल्यागेलेल्या लोकांच्या आत्यंतिक प्रेमापोटी, त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्या हिताचं लिहिण्याचा मार्ग आमच्या वडिलांनी निवडला. जगभर कौतुक केल्या गेलेलं त्यांचे खंडीभर लिखाण हे या व्यवस्थेला मात्र अस्वस्थ करतं म्हणून केवळ हे फळ त्यांना मिळावं ?
सध्याचं कोविड 19 महामारीने जगातील करोडो करोडो लोकांचं जीवन आणि उपजीविकेवर प्रतिकूल परिणाम केला आहे. आमच्यासाठी पाहिलं तर आम्हाला भारतात येवून अटकेच्या आधी उरलेले बहुमोल दिवस कुटुंबासोबत घालवणं शक्य नाही, ते ही अशावेळी जेंव्हा आमच्या आई-वडिलांना आमची सर्वांत जास्त गरज असतांना. आमच्या जीवनातील प्रत्येक महत्वाच्या घटनेवेळी आमचे वडील आमच्या बाजूनं ठामपणे उभे राहिले, मात्र आज, आम्ही त्यांना मिठी मारण्यास वा त्यांचा हात धरण्यास त्यांच्या जवळ नाही आहोत याच्या यातना होतात. आम्हाला हे समजतच नाही की त्यांनी असा काय गुन्हा केला असावा की त्यांना हा छळ सोसावा लागतोय. मात्र, या केस मध्ये पुढे जात असतांना व अनिच्छेने येणाऱया प्रसंगांना तोंड देण्याची तैयारी करत असतांना आमच्या वडिलांचे सहकारी व त्यांच्या कार्याचे समर्थक, ज्यांनी आम्हाला या कठीण प्रसंगात ही मजबूत राहण्यासाठी मदत केलीय त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. या यातनामय प्रवासात पाय ठेवतांना आम्ही तुमच्या पुढे एक विचार ठेवू इच्छितो. कल्पना करा की तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला काहीही ठोस पुरावा नसतांना अटक केली गेली व त्यांना अपमानास्पद वागणूक देत तुरुंगात व्यवस्थित जेवण, कपडे, स्वच्छता व इत्तर सोयींचा अभाव असलेल्या स्थितीत डांबून ठेवले गेलंय – एकूण अशी परिस्थिती की ज्यात जगणं मुश्किल. मानवी हक्क व प्रतिष्ठेचं अशारितीने केलेलं उल्लंघन त्याच्या विरोधात आवाज उठविण्यास कोणालाही पुरेसे नाही का ?
( प्राची तेलतूंबडे रश्मी तेलतूंबडे
27 मार्च 2020 )
डॉ आनंद तेलतूंबडे यांच्या मुलींनी लिहिलेल्या वरील पत्राला एक वर्ष उलटून गेलंय…कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधी म्हणजे 13 एप्रिल 2020 रोजी आनंदने ही जनतेला उद्देशून _”तुमची पाळी येईपर्यंत गप्प राहू नका”अशी आर्जव करत एक खुलं पत्र लिहिलं होतं..
आनंदच्या अटकेला 14 एप्रिल रोजी एक वर्ष होईल…दरम्यान पुलाखालून व पुलावरूनही बरंच पाणी वाहून गेलंय… या केस मधिल एक आरोपी रोना विल्सनच्या कॉम्प्युटरमधिल ज्या तथाकथित पत्रांनी पंतप्रधान मोदीला मारण्याचा डाव उघड झाला असं म्हटलं गेलं ती *पत्रंच बनावट असल्याचा* हवाला अमेरिकेतील आर्सेनल या डिजिटल फॉरेन्सिक संस्थेनं नुकताच जाहीर केलाय…यामुळे *”पंतप्रधान मोदीला मारण्याचा कट”* ही भाजपा सरकारची थिअरीच आता संशयाच्या भोवऱ्यात आलीय…किंबहुना फोल ठरत आहे. या परिस्थितीत ज्या सोळा लोकांना या कटातील आरोपी म्हणून अटक केली गेलीय त्यांना ताबडतोब जामीनावर सोडणे व या केसचा खटला लवकरात लवकर सुरू करुन ‘खरं-खोटं’ जनते समोर आणणं क्रमप्राप्त आहे…परंतु, भाजपाचे ‘बनेल’ सरकार असं करण्याची सुतराम शक्यता नाही…अशा अवस्थेत लोकांनी आवाज उचलावा लागेल…ही केस धादांत खोटी असल्यामुळे यथावकाश सर्व आरोपी निर्दोष सुटणारच यात किंचितशीही शंका नाही मात्र त्यांत या निरपराध लोकांची 10-12 वर्ष अशीच वाया जाणार…कसलाही गुन्हा केला नसतांनाही ही एक प्रकारे शिक्षाच नव्हे का ? म्हणून, या केस ची सुनावणी लागलीच सुरू करण्यासाठी आपल्याला आवाज उचलावा लागेल…याला पर्याय नाही…बाबासाहेबांचं नाव, पुतळा अन स्मारकं यातच गुरफटलेल्या दलित तरुणांनी गोरगरिबांसाठी, दलित-श्रमिकांसाठी लढणाऱ्या व विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधात उभं ठाकलेल्या जिवंत व्यक्तींचा राज्यसत्ता दिवसा ढवळ्या कसा बळी घेतंय याकडे डोळेझाक करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारीच नव्हे का ? ( मिलिंद भवार , पँथर्स 9833830029)