BREAKING NEWS:
राजकीय

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना

Summary

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान […]

धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान पथके मतदान साहित्यासह आपापल्या मतदान केंद्रांवर आज सकाळी रवाना झाले. या निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी तयारी पूर्णत्वास आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र असतील. एकूण दहा मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर आज सकाळी मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन भवनातून या मतदान पथकांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या मतदान पथकांमध्ये मतदान केंद्रांध्यक्ष, मतदान अधिकारी एक, दोन, तीन, शिपाई आणि बंदोबस्तासाठी एका पोलिसाचा समावेश आहे. एकूण दहा पथके असून एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदानासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदान पथकाजवळ सॅनेटायझर, मास्क, ग्लोव्हज, थर्मल गन, ऑक्सीमीटर, फेस शील्ड देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी व दोन सहाय्यकांचा समावेश आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोनिया सेठी निवडणूक निरीक्षक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोनिया सेठी (भा. प्र. से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोट निवडणूक-2020 च्या उर्वरीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती सोनिया सेठी (भा.प्र.से.) (MH-94) यांची नेमणूक केलेली आहे. निवडणूक निरीक्षक श्रीमती सोनिया सेठी (भा.प्र.से.) (MH-94) या  गुलमोहोर शासकीय विश्राम गृह (संतोषी माता मंदिराजवळ, धुळे) येथे वास्तव्यास असून, त्यांचा संपर्क क्रमांक 9545979423 हा आहे.

या निवडणुकीसंदर्भातील कामकाजासाठी अथवा उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधींना भेटीसाठी दुपारी 12  ते 1 वाजेपावेतो जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे उपलब्ध राहतील. याची सर्व उमेदवार, सर्व मतदार तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *