BREAKING NEWS:
ब्लॉग

विशेष लेख

Summary

निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत […]

निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या ८,८५,६१,५३५ इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४,६३,१५,२५१ तर महिला मतदार ४,२२,४६,८७८ इतकी संख्या होती, तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या २,४०६ इतकी होती. यामध्ये  वाढ झालेली असून, दि. १८ मार्च २०२४ रोजी अद्ययावत मतदारांची एकूण संख्या ९,२०,५५,१९६ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदार संख्या ४,७८,६२,३३७ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४,४१,८७,३०१ तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५ हजार ५५८ इतकी आहे.

हजार पुरुष मतदारांमागे ९२३ महिला मतदार

सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन २०१९ साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे ९११ इतके होते. याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे २०२४ मध्ये या प्रमाणात ९२३ अशी लक्षणीय सुधारणा झाल्याचे बघायला मिळत आहे.

नवमतदारांचा, दिव्यांगाचा वाढता टक्का

मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंदणी सध्याच्या मतदार यादीत झालेली आहे. यामध्ये  १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची टक्केवारी  १.२७  तर २०-२९ वयोगटाची १८.१७ % आहे.  तसेच ३०-३९ वयोगटाची २२.५९ %, ४०-४९ वर्ष वयोगटाची २१.९८ %, तर ५०-५९ वयोगटाची  १६.६८ % आहे. तसेच  ६०-६९ वयोगटाची १०.६६ %, तर ७०-७९ वयोगटाची ५.८० % आणि  ८०-८९ वयोगटाची २.२८ %, नोंदणी झाली आहे.

इच्छुक ज्येष्ठ मतदारांना गृह मतदानाची सुविधा

अद्ययावत मतदार यादीमध्ये ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १३१३६२३ इतकी आहे.  यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.  मतदार यादीतील अद्ययावत आकडेवारीनुसार  ५२,७६९  मतदार  हे शंभर वर्षावरील आहेत.

याशिवाय ११८१९९ इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  या वर्षी दिव्यांग मतदारांची नोंदणी देखील मोठ्या संख्येने झाली असून  मतदार यादीमध्ये एकूण ५९९१६६ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत.  त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्या पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या – त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र.६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेतले जाणार आहेत.

तसेच मतदार यादी अद्ययावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत जुलै-ऑगस्ट २०२३ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून अर्ज प्राप्त करुन घेतले आहेत. तसेच भावी मतदारांची ही माहिती घेण्यात आली आहे. तसेच  ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.त्याचप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून ही शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत. स्वीप या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले असून इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहोचविण्यात आलेला आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मृत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुध्दीकरण करण्यात आले असून दि.२३ जानेवारी २०२४ रोजी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *