BREAKING NEWS:
नंदुरबार महाराष्ट्र हेडलाइन

डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

Summary

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातील डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात येईल आणि त्यासाठी संशोधन केंद्रही उभारण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषि आणि माजी सैनिक […]

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 10 : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातील डोंगराळ भागासाठी उपयुक्त वाणांचे संशोधन कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने करण्यात येईल आणि त्यासाठी संशोधन केंद्रही उभारण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषि आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

 

तळोदा तालुक्यातील बोरद येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष, विभागीय कृषि सहसंचालक संजिव पडवळ,  जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, तहसिलदार गिरीष वखारे, उप विभागीय कृषी अधिकारी व्ही.बी. जोशी, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र महाले, किशोर हाळपे, विक्रांत मोरे, आमशा पाडवी  आदी उपस्थित होते.

 

मंत्री श्री.भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना पाठबळ देणे ही कृषि विभागाची जबाबदारी आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकरी एकत्रित आले शीतगृहांसाराख्या योजनांचा लाभ चांगल्याप्रकारे देता येईल. अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीला  प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी आणि कृषि योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यवाही करावी.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रास भेट देण्यात येत आहे. जिल्ह्यासह राज्यातील काही भागात पावसाची तूट आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे आणि खतांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारी पिके घेण्यावर भर द्यावा.

 

पिक विमा योजनेत सुधारणा करण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी  पिक विमा योजनेची माहिती घ्यावी. योजनेच्या अटी-शर्तीबाबत मराठीत माहिती देण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.  आता एकाच अर्जावर कृषि विभागाच्या सर्व योजना उपलब्ध आहेत. एका वर्षात योजनेचा लाभ मिळाला नाही तर तोच अर्ज पुढील वर्षासाठी  योजनेचा लाभ देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी दुसरा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

 

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ किती कालावधीपर्यंत मिळाला नाही याची माहिती घेण्यात येईल. शेतकऱ्यांना जाणिवपूर्वक योजनेचा लाभ दिला नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल. युरिया खताबाबत लिंकींग करणारे आणि अधिक किंमत घेणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. लवकरच युरिया खताचा आवश्यक पुरवठा करण्यात येईल. अवैधरित्या खतांची विक्री करणाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

श्री.भुसे म्हणाले, मागील वर्षी मनरेगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करण्यात आली. या योजनेचा शेतकऱ्यांनी अधिकाधीक लाभ घ्यावा.  फळबाग लागवडीच्या धर्तीवर शेताच्या बांधावर फळझाडांची लागवड करण्याबाबत विचार करण्यात येईल. कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची माहिती संकलीत करण्यात येत असून अशांना योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. कृषि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावागावात माती परिक्षण आणि त्याच्या फायद्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

 

प्रास्ताविकात श्री.भागेश्वर यांनी खरीप हंगामाच्या नियोजनबाबत कृर्षी विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तत्पूर्वी कृषिमंत्र्यांनी रिसोर्स बँक शेतकरी प्रतिनिधीं चर्चा केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पीक स्पर्धेत  सहभागी शेतकऱ्यांचा यावेळी कृषिमंत्र्याच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. त्यांनी बोरद येथील मिलिंद पाटील यांनी  रोजगार हमी योजने अंतर्गत तयार केलेल्या लिंबू आणि पेरू व तोडलीच्या बागेला भेट दिली. त्यांनी शहादा तालुक्यातील कलसाडी येथे कोरडवाहू शेतीला भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *