ब्लॉग महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीचे सुक्ष्म नियोजन करावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

Summary

जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे […]

जिल्ह्यात खरीपाच्या अनुषंगाने 14 टक्के पेरण्या झाल्या असून गत वर्षी आजच्या दिवसाला 64 टक्के पेरण्या झाल्या होत्या. तुलनेत 50 टक्के कमी पेरण्या झाल्या असल्या तरी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुक्ष्म नियोजन करत जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच पेरण्या करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा रशिद शेख, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, ॲड राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, सहायक प्रकल्प व्यवस्थापक राकेश वाणी, तंत्र अधिकारी जितेंद्र शहा आदि उपस्थित होते.

बियाणे, खते बीएपीच्या उपलब्ध साठ्याची माहिती जाणून घेतांना मंत्री श्री. पवार म्हणाले, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील मागणीच्या तुलनेत पुरेसा खते व बियाण्याचा साठा उपलब्ध असतांनाच बफर स्टॉक केल्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात  शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची टंचाई भासणार नाही. कृषी संजीवनी मोहिमेच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या संशोधनासह तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत चांगले काम झाल्याचे मंत्री श्री.पवार यांनी नमूद केले.

पिककर्ज वाटपाचा नियमीतपणे आढावा घेऊन उद्दिष्टपूर्तीसाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. जिल्हा बँकेला दिलेल्या 535 कोटी कर्ज वाटपाचा लक्षांक पूर्ण करावा. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील पिककर्ज वाटपासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री.पवार यांनी केले.

या वर्षी पीक कर्ज वाटपामध्ये आदिवासीबहुल तालुक्यांना देखील योग्य प्रमाणात कर्ज वितरण होईल याची विशेष दक्षता घेत असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले मागील वर्षीच्या तुलनेत आजपर्यंत 17 कोटी रुपये अधिक कर्ज वितरण या तालुक्यांना झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन 30 सप्टेंबर अखेर जिल्ह्याचा पिक कर्जाचा लक्षांक पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येईल, असे श्री.मांढरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *