महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कुमार विश्वकोश सर्वांसाठी उपयुक्त ठरेल – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण या पहिल्या खंडाच्या चौथ्या भागाचे प्रकाशन

Summary

मुंबई, दि. 14 : तंत्रज्ञानाच्या युगात आज जीवसृष्टी आणि पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणारे आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन अंकुरण ते ज्ञानेंद्रिय पर्यंत एकूण १,०२५ नोंदी समाविष्ट असलेला कुमार विश्वकोश जीवसृष्टीची विविधता आणि या विविधतेमागची एकता वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त […]

मुंबई, दि. 14 : तंत्रज्ञानाच्या युगात आज जीवसृष्टी आणि पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणारे आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन अंकुरण ते ज्ञानेंद्रिय पर्यंत एकूण १,०२५ नोंदी समाविष्ट असलेला कुमार विश्वकोश जीवसृष्टीची विविधता आणि या विविधतेमागची एकता वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कुमार विश्वकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण या पहिल्या खंडाच्या चौथ्या भागाचे प्रकाशन आज विश्वकोशाच्या संकेतस्थळावर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. श्यामकांत देवरे, मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांनी सुरू केलेली परंपरा मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांनी कायम ठेवल्याबद्दल मंत्री श्री. केसरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा खंड केवळ कुमारांनाच नव्हे तर, शिक्षक, प्राध्यापक आणि सर्वसामान्य वाचक यांना सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त करणारा आणि सामाजिक स्तरावरही पर्यावरणाविषयीची जागरूकता रुजविणारा ठरेल, असे मत मंत्री श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.

पहिल्या खंडाचे दोन भाग यापूर्वी छापील स्वरूपात उपलब्ध असून लवकरच पुढील भागही छापील स्वरूपात वाचकांच्या हाती येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हा भाग https://marathivishwakosh.org/tag/kvk1b4/ या संकेस्थळावर वाचता येणार असून महाराष्ट्रातील सर्व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीवर्ग तसेच जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी कुतूहल असणाऱ्या वाचकांसाठी हा कुमार विश्वकोश महत्वाचा ज्ञानऐवज ठरणार आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *